ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी डासांमुळे होणाऱ्या प्राणघातक रोगांविरुद्ध एक नवीन शस्त्र विकसित केले आहे. ते शस्त्र म्हणजे विषारी वीर्याने अनुवांशिकरित्या तयार केलेले डास. जरी ही संकल्पना असामान्य वाटत असली तरी हे तंत्र मलेरिया, झिका आणि डेंग्यू ताप यांसारख्या जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी करून जागतिक सार्वजनिक आरोग्यामध्ये क्रांती घडवून आणू शकते. या रोगांमुळे दरवर्षी असंख्य लोकांचा मृत्यू होतो. “हे नाविन्यपूर्ण उपाय किटकांच्या व्यवस्थापनात बदल घडवून निरोगी समुदायांची आणि अधिक शाश्वत भविष्याची आशा निर्माण करू शकते,” असे ऑस्ट्रेलियाच्या मॅक्वेरी विद्यापीठातील अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि शास्त्रज्ञ सॅम बीच यांनी ‘सीबीएस न्यूज’ला सांगितले. पण, ही ‘टॉक्सीक मेल टेक्निक’ काय आहे? ते कसे कार्य करणार? यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण कसे कमी होऊ शकते? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टॉक्सीक मेल टेक्निक’ काय आहे?

‘टॉक्सीक मेल टेक्निक’मध्ये डासांचे प्रजनन करणे समाविष्ट आहे. या तंत्रात डासांच्या वीर्यामध्ये विषारी प्रथिनांचा समावेश केला जातो. जेव्हा हे अनुवांशिकरित्या सुधारित नर डास मादींबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करतात, तेव्हा विषारी वीर्य मादी डासांमध्ये जाते, ज्यामुळे त्यांचे आयुष्य लक्षणीयरीत्या कमी होते. “एका नर डासाने मादी डासाशी संबंध प्रस्थापित केल्यास, तिचा लगेच मृत्यू होणे हेच आम्हाला अपेक्षित आहे,” असे बीच यांनी सांगितले. ही पद्धत विशेषतः मादी डासांना लक्ष्य करते, कारण मादी डासच माणसांना चावतात आणि रक्त पितात. मादी डास सामान्यत: अनेक आठवडे जगू शकतात, त्या काळात रोगांचा प्रसार करत राहतात. शास्त्रज्ञांनी हेदेखील स्पष्ट केले की, हे तंत्र डासांमुळे होणारे रोगांचा प्रादुर्भाव त्वरीत कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांच्या वापरावर अवलंबून न राहता या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. नेचर कम्युनिकेशन्स या पीअर-रिव्ह्यू केलेल्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ‘टॉक्सीक मेल टेक्निक’मुळे मादी डासांचे रक्त पिण्याचे प्रमाण ४० ते ६० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

‘टॉक्सीक मेल टेक्निक’मध्ये डासांचे प्रजनन करणे समाविष्ट आहे. या तंत्रात डासांच्या वीर्यामध्ये विषारी प्रथिनांचा समावेश केला जातो. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी ‘युरिन टेस्ट’ करण्याचे आदेश; मलेशियन सरकारच्या या निर्णयामागील कारण काय?

सुरुवातीच्या चाचण्यांमधून काय निष्कर्ष समोर आले?

पहिल्या प्रूफ-ऑफ-संकल्पनेच्या चाचण्या फ्रूट फ्लाय वापरून करण्यात आल्या. ही प्रजाती त्यांच्या दोन आठवड्यांच्या लहान जीवन चक्रामुळे प्रयोगशाळांमध्ये सामान्यतः वापरली जाते. परिणामांवरून असे दिसून आले की, विषारी नरांबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या मादी माशांचे आयुष्य लक्षणीयरीत्या कमी झाले. मॅसीज मासेल्को या संशोधकाने सीबीएस न्यूजला स्पष्ट केले की, पुढील पायरी म्हणजे डासांमध्ये या पद्धतीची चाचणी घेणे. परंतु, अनुवांशिकरित्या सुधारित डासांना जंगलात सोडण्यापूर्वी, सुरक्षितता चाचणी महत्त्वपूर्ण आहे. मासेल्को म्हणाले, “आम्हाला अजूनही डासांमधील प्रभावाची आणि मानवांना किंवा इतर लक्ष्य नसलेल्या प्रजातींना कोणताही धोका नाही याची खात्री करण्यासाठी कठोर सुरक्षा चाचणी करणे आवश्यक आहे. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट जनुकांना केवळ विशिष्ट परिस्थितींमध्ये सक्रिय करण्याची परवानगी देणाऱ्या तंत्राचा शोध घेतला जात आहे, त्यामुळे हे सुनिश्चित करेल की, जेव्हा आवश्यकता असेल तेव्हाच विषारी गुणधर्म ट्रिगर केले जातील.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, जनुकीय अभियांत्रिकी दीर्घकाळापासून रोग पसरवणाऱ्या डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी वापरली जात आहे. पारंपरिकपणे, यामध्ये पुनरुत्पादन कमी करण्यासाठी मोठ्या संख्येने निर्जंतुकीकृत नर कीटक सोडणे समाविष्ट आहे. परंतु, संशोधक संघाने नमूद केले की, संगणक मॉडेल असे तंत्र सुचवतात जे सक्रियपणे मादी डासांना मारतात आणि ते अधिक प्रभावी असू शकतात. “या पद्धतीने, आम्ही मादी डासांची संख्या त्वरित कमी करू शकतो आणि त्यामुळेच आशा आहे की, या वेक्टर-जनित आजारांच्या प्रसारामध्ये खरोखर लवकरात लवकर घट होईल,” असे बीचने ‘द गार्डियन’ला सांगितले.

जनुकीय अभियांत्रिकी दीर्घकाळापासून रोग पसरवणाऱ्या डासांची संख्या नियंत्रित करण्यासाठी वापरली जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

या संशोधनाचे महत्त्व काय?

ही वैज्ञानिक प्रगती विशेषतः महत्त्वाची आहे, कारण मलेरिया, डेंग्यू, ईस्टर्न इक्विन एन्सेफलायटीस (ईईई) आणि झिका यांसारख्या डासांमुळे पसरणारे रोग जगभरातील सार्वजनिक आरोग्याबाबत महत्त्वपूर्ण आव्हाने निर्माण करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सर्व संसर्गजन्य रोगांपैकी १७ टक्क्यांहून अधिक रोग डासांमुळे होतात, ज्यामुळे दरवर्षी सात लाख मृत्यू होतात. गेल्या वर्षी, चंडीपुरा व्हायरस (CHPV) नावाच्या एन्सेफलायटीस-उद्भवणाऱ्या विषाणूचा प्रादुर्भाव गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झाला; ज्यामध्ये ५१ लोकांचा मृत्यू झाला. जागतिक स्तरावर मलेरिया हा डासांपासून पसरणारा सर्वात घातक आजार आहे, ज्यामध्ये लहान मुले सर्वात असुरक्षित आहेत. या प्राणघातक रोगांचा प्रसार करणाऱ्या डासांवर लक्ष केंद्रित करून, ही नवीन पद्धत निरोगी समुदायांची आणि भविष्याची आशा देते; जिथे आजारांचे प्रमाण फार कमी होऊ शकते.

हेही वाचा : १६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?

डास सर्वत्र आढळतात. डेंग्यू, मलेरिया, अरबोव्हायरस, इंसेफॅलिटिस, चिकनगुनिया, झिका ताप ही डासांमुळे पसरणाऱ्या आजारांची यादी मोठी आहे. डासांच्या तब्बल ३५०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत आणि त्यांच्यापैकी काही प्रजाती जीवघेण्या ठरू शकतात. काही प्रकारचे डास पक्षी, उभयचर प्राणी, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या रक्तावर जगतात तर काही डास माणसांच्या रक्तावर. अनोफेलेस डासाच्या एका चाव्यामुळे मलेरिया होऊ शकतो तर एडिस डास डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका विषाणू पसरवण्यास कारणीभूत ठरतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toxic semen could kill female mosquitoes and help curb spread of disease rac