जीआय टॅगच्या माध्यमातून एखाद्या वस्तूचे उत्पादन नक्की कुठल्या भौगोलिक प्रांतात झाले हे समजण्यास सोपे होते. जीआय मानांकन हे ट्रेडमार्क सारखे काम करते. हल्लीच केंद्र सरकारकडून ओडिशाच्या कटक येथील प्रसिद्ध रुपा तारकासी, किंवा सिल्वर फिलीग्री (silver filigree) कलेला GI टॅग देण्यात आला. ओडिशा स्टेट कोऑपरेटिव्ह हॅन्डिक्राफ्ट्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (उत्कालिका) टॅगसाठी अर्ज करण्यात आला होता.
रुपा तारकासी
ओडिशाचे कटक हे चांदीच्या फिलीग्री कामासाठी म्हणजेच रुपा तारकासीसाठी ओळखले जाते. बारीक नक्षीकाम आणि उत्कृष्ट कारागिरी ही या कलेची वैशिष्ट्ये आहेत. ओडिया भाषेत,”तारा” म्हणजे बारीक तार आणि “कासी” म्हणजे नक्षीकाम करणे. या कलेत चांदी वितळवून तिचे बारीक तारांमध्ये रूपांतर केले जाते. आणि या तारांचा वापर करून दागिने किंवा शोभेच्या वस्तू तयार करण्यात येतात.
अधिक वाचा: Hikayat Seri Ram मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय?
मूळ
कटकमधील फिलिग्री या कलेची उत्पत्ती कधी झाली याविषयी नेमकी माहिती उपलब्ध नसली, तरी १२ व्या शतकापासून ही कला अस्तित्वात असल्याचे मानले जाते. मुघलांच्या काळात या कलेला राजाश्रय मिळाला. कटक या प्रदेशावर इतिहासात वेगवेगळया राजवंशांनी राज्य केले. त्यामुळे कालानुरूप फिलिग्री या कलेच्या स्वरूपात परिवर्तन होताना दिसते. प्रत्येक कालखंडात या कलेने नवीन रूप धारण केले.
इतिहास
ओडिशा सरकारकडून जीआय रजिस्ट्रीसाठी सादर करण्यात आलेल्या अर्जात या कलेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीविषयी नमूद करण्यात आले आहे. यात म्हटल्याप्रमाणे कटकमध्ये अस्तित्त्वात असलेल्या चांदीच्या फिलिग्री हस्तकलेत आणि अरबस्तान, माल्टा, जेनोवा, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्कमध्ये करण्यात येणाऱ्या फिलिग्री हस्तकलेत साम्य आहे. हेच साम्य प्राचीन ग्रीस, बायझँटियम आणि एट्रुरियायेथील फिलिग्री हस्तकलेतही आढळते. ही कला फिनिशियन आणि अरब व्यापाऱ्यांनी मध्ययुगीन कालखंडात तुर्कस्तान आणि रशिया यांच्यातील व्यापारा दरम्यान पश्चिमेकडे नेली, असे नमूद करण्यात आले आहे.
कटकमध्ये हे काम सामान्यतः मुलगे करतात. या कामासाठी लागणारी तीक्ष्ण नजर आणि नाजुक बोटं यासाठी तरुण मुलांचा वर्ग यात कार्यरत असतो. देशात तयार होणाऱ्या इतर चांदीच्या दागिन्यांच्या तुलनेत फिलिग्री कला अधिक वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते.
अधिक वाचा: नेपोलियनला भारत का जिंकायचा होता?
लोकप्रिय उत्पादन श्रेणी
या कलेचा वापर करून तयार करण्यात येणाऱ्या काही लोकप्रिय उत्पादनांमध्ये सध्या सजावटीच्या कलाकृती, विविध उपकरणे, गृहसजावट आणि धार्मिक/ सांस्कृतिक वस्तू, दुर्गा पूजेसाठी लागणारी चांदीची सजावट,ओडिसी दागिने- दामा शृंखला, थेट ओडिशाच्या चालीरीतींशी संबंधित धार्मिक/सांस्कृतिक वस्तू इत्यादींचा समावेश होतो. या वस्तूंच्या उत्पादनासाठी कटक प्रसिद्ध आहे.
बदल आणि वाढ
सिल्व्हर फिलिग्री हस्तकलेत कालानुरूप बदल झालेले असले तरी त्याची मूळ प्रक्रिया शतकानुशतके तशीच राहिली आहे, बदल हा हस्तकलेसाठी लागणारी साधने आणि सामुग्रीमध्ये झाला आहे. प्रामुख्याने नक्षीकामातही हा बदल झालेला आढळतो. हल्ली मुख्य चांदी या धातू बरोबर इतर मिश्र धातूंच्या मिश्रणाचाही वापर केला जातो. कारागीर तांबे, जस्त, कॅडमियम आणि कथील यांसारख्या इतर धातूंचाही वापर करतात.