लाखो मानवी जीव वाचवणारा आणि त्यांचे जीवन सुसह्य करणारा वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा शोध म्हणजे अवयव प्रत्यारोपण. अनेक वर्षांपासून जगभरातील सरकारे अवयवदानाच्या चळवळीला प्रोत्साहन देत आहेत. याचे कारण म्हणजे विविध अवयवांच्या प्रत्यार्पणासाठी अनेक रुग्ण वर्षानुवर्षे रांगेत आहेत. त्यांना जर वेळेत अवयव मिळाले, तर त्यांचे प्राण वाचू शकतात. मात्र, अवयवदान आणि अवयवांची गरज यात मोठी तफावत दिसते. अमेरिकेतील एनवाययू लँगोन हेल्थ संस्थेला या क्षेत्रात एक मोठे यश प्राप्त झाले आहे. लँगोनमधील शल्यचिकित्सकांनी एका डुकराच्या किडनीचे (मूत्रपिंड) प्रत्यार्पण ब्रेन डेड झालेल्या जिवंत रुग्णाच्या शरीरात केले. ही किडनी त्या रुग्णाच्या शरीरात व्यवस्थित काम करीत असल्यामुळे हा शोध वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी देणारा ठरू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हे प्रत्यारोपण नेमके कसे पार पडले? ब्रेन डेड झालेला रुग्ण कोण आहे? याबाबत घेतलेला हा आढावा …
प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपण करण्याचा निर्णय
मेरी मिलर डफी यांचा भाऊ मोरिस मो मिलर एके दिवशी अचानक कोसळला आणि दुसऱ्याच दिवशी त्याचा ब्रेन डेड (मेंदू मृत) झाल्याचे सांगण्यात आले. मेरीसमोर प्रश्न होता की, मिलरचे शरीर वैद्यकीय संशोधनासाठी वापरू द्यावे का? अखेर मेरी डफीने निर्णय घेतला आणि मिलरचे शरीर एनवाययू लँगोन हेल्थ इंटेसिव्ह युनिटमध्ये आणण्यात आले. आता मिलरचे शरीर अवयव प्रत्यारोपणाची कमतरता दूर करण्यासाठी प्राण्यांचे अवयव प्रत्यारोपित करण्याच्या प्रयोगाचा भाग बनले आहे.
मेरी मिलर डफीने सांगितले, “मोरिसला आधीपासूनच लोकांची मदत करण्याची सवय होती. आता त्याचा मेंदू मृत असला तरी तो त्याच्या शरीरासोबत जे काही करू देतोय, त्याचा मला अभिमान वाटतो. त्याचा मृत्यू निश्चित आहेच; पण या प्रयोगातून जर काही चांगले घडत असेल, तर त्याचा आनंदच आहे.” ‘लँगोन’मधील शल्यचिकित्सकांनी १४ जुलै रोजी मिलरच्या शरीरात जनुकीय सुधारित डुकराची किडनी प्रत्यारोपित केली. १४ जुलैपासून डॉक्टर आणि नर्सेस मेंदू मृत झालेल्या मिलरची जिवंत रुग्णाप्रमाणे काळजी घेत आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यानंतरही प्राण्याची किडनी मिलरच्या शरीरात उत्तमरीत्या काम करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. आतापर्यंत अशा प्रकारचा प्रयोग चार ते पाच वेळा झाला आहे. पण, या प्रकरणात किडनीने एक महिन्याहून अधिक काळ व्यवस्थित काम केल्यामुळे अवयव प्रत्यार्पणाच्या दृष्टीने मोठे यश मिळाल्याचे बोलले जाते. आता सप्टेंबर महिन्यातही ही किडनी कसे काम करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे वाचा >> जागतिक अवयव दान दिन २०२१: जाणून घ्या, पहिले अवयव दान कधी झाले?
अवयवदान महत्त्वाचे का?
अवयव प्रत्यारोपणासाठी अवयव मिळणे आज महाकठीण काम झाले आहे. अमेरिकेत जवळपास एक लाख लोक अवयवांच्या प्रतीक्षा यादीत आहेत. अनेकांना किडनीची आवश्यकता आहे. हजारो रुग्ण अवयवाची प्रतीक्षा करताना प्राण सोडतात. तसेच हजारो लोकांची नावे प्रत्यारोपणासाठीच्या यादीत टाकलेलीच नाहीत. त्यामुळे त्यांना अवयव मिळण्याचा प्रश्नच येत नाही. भारतातही फार वेगळी परिस्थिती नाही. लाखो लोक विविध अवयवांच्या प्रतीक्षा यादीत आहेत. अवयवदानाची चळवळ जसजशी फोफावेल, तशी ही समस्या सुटू शकते; पण त्यालाही काही मर्यादा आहेत.
एनवाययू लँगोन प्रत्यारोपण संस्थेमधील किडनी प्रत्यारोपण करणारे शल्यचिकित्सक डॉ. रॉबर्ट माँटगोमेरी यांनाच २०१८ साली दुसरे हृदय देण्यात आले आहे. डॉ. रॉबर्ट म्हणाले की, मला सात वेळा हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) येऊन गेला. हृदय मिळवण्यासाठी जे निकष आहेत, तेवढा तरी मी नक्कीच आजारी होतो. त्यामुळेच नशीबवान ठरलो आणि मला वेळेत हृदय मिळाले. प्राण्यांचे अवयव मानवाला देण्याबाबत ते म्हणाले की, अवयव मिळण्याची जी कमतरता आहे, ती भरून काढण्यासाठी या पर्यायाची चाचपणी केली जात आहे.
दशकभरापासून प्राण्यांचे अवयव मानवांमध्ये प्रत्यारोपित करण्याचे प्रयोग सुरू असून, अनेकदा त्यात अपयशच आले होते. अखेर जनुकीय सुधारित डुकराच्या जातीमुळे आता त्यांच्यातील अवयव हे मानवी वापरायोग्य झाले आहेत. प्राण्यांचे अवयव मानवामध्ये प्रत्यारोपण करण्याच्या क्रियेला झेनोट्रान्सप्लांटेशन (xenotransplantation) असे म्हणतात. मागच्या वर्षी मेरीलँड विद्यापीठाच्या शल्यचिकित्सकांनी मरणाच्या दारात असलेल्या एका रुग्णाला डुकराचे हृदय प्रत्यारोपित केले होते. या प्रयोगानंतर हा रुग्ण दोन महिने जगला.
जिवंत रुग्णांवर प्रयोग करण्याआधी डॉ. रॉबर्ट माँटगोमेरी हे मेंदू मृत झालेल्या रुग्णांवर प्रयोग करण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. एनवाययू संस्था आणि बर्मिंगहॅम येथील अलाबामा विद्यापीठातील शल्यचिकित्सकांनी डुकराच्या किडनी आणि हृदयाला मृत रुग्णांच्या शरीरात प्रत्यारोपित करून प्रयोग केला होता. त्यात काही दिवस आणि काही आठवडे हा अवयव कार्यरत राहिल्याचे दिसून आले. मेंदू मृत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडून अशा प्रयोगांना थेट नकार मिळू नये, यासाठी आधी मृत रुग्णांवर याचे प्रयोग झाले.
किडनी प्रत्यारोपण कसे झाले?
मोरिस मो मिलरचा मेंदू मृत झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची बहीण मेरी मिलर डफीशी डॉक्टरांनी संवाद साधून अवयवदानाच्या प्रयोगासाठी तिची संमती घेतली. हा प्रयोग करीत असताना खऱ्याखुऱ्या जिवंत रुग्णावर अवयव प्रत्यारोपणासारखीच रंगीत तालीम करण्यात आली. रुग्णालयाच्या हेलिपॅडवर जशी डुकारची किडनी आणण्यात आली, तसे डॉ. रॉबर्ट माँटगोमेरी यांनी मोरिस मो मिलरच्या शरीरातून त्याची स्वतःची किडनी काढून घेतली. व्हर्जिनिया येथील रेव्हिविकोर या संस्थेत जनुकीय सुधारित डुकरांची कृत्रिम पैदास करण्यात येते. इथूनच इतर राज्यांत अवयव पोहोचवले जातात. ‘एनवाययू’मधील शल्यचिकित्सक डॉ. जेफरी स्टर्न व डॉ. ॲडम ग्रिसीमर यांनी रेव्हिविकोर येथील एका डुकराच्या शरीरातील किडनीला हेलिकॉप्टरने रुग्णालयात आणले.
डॉ. स्टर्न म्हणाले की, डुकराची किडनी मनुष्याच्या शरीरात प्रत्यारोपित करणे ही प्रक्रिया नेहमीच्या अवयव प्रत्यारोपणासारखीच पार पाडावी लागते. तसेच शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णाला रोगप्रतिकारक औषधांचा डोस द्यावा लागतो, तसे आंतरराष्ट्रीय मानक आहेत. शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतरही अनेक टप्पे पूर्ण करावे लागतात, असेही ते म्हणाले.
हे वाचा >> अवयवदान : नियमावली नि प्रक्रिया
पहिला टप्पा म्हणजे प्रत्यारोपणासाठी कोणत्या डुकराची निवड करायची. काही डुकरांच्या अवयवांवर १० प्रकारचे जनुकीय बदल करावे लागतात. मात्र, या प्रकरणात डॉ. रॉबर्ट यांनी केवळ एकच जनुकीय बदल सुचविला आणि शस्त्रक्रिया पार पाडली.
तसेच डुकरांना जंतुमुक्त सुविधेत ठेवलेला असतानाही त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला तर नाही ना? याची खबरदारी घेण्यासाठी अतिरिक्त चाचण्या घेण्यात येतात. शल्यचिकित्सा करीत असताना तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे विशिष्ट लसीकरण करणे बंधनकारक आहे आणि त्यांच्या रक्ताच्या चाचण्याही केल्या जातात.
मोरिस मो मिलरवर किडनीचे प्रत्यारोपण केल्यानंतर डॉ. रॉबर्ट यांनी त्याची रवानगी त्याच आयसीयू दालनात केली, जिथे (हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर) पाच वर्षांपूर्वी ते स्वतःच दाखल होते आणि बरे झाले होते.
यशस्वी प्रत्यारोपणानंतर एनवाययू संस्थेचे सर्व डॉक्टर आणि नर्सेस डोळ्यांत तेल घालून मिलर यांची काळजी घेत आहेत. डॉक्टरांकडून प्रत्येक आठवड्याला किडनीची बायोप्सी (छोटासा तुकडा काढून सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने तपासणी करण्याची पद्धत) केली जात आहे. रक्त आणि इतर तपासण्या करीत असतानाच नर्सेस यांचे व्हेंटिलेटरवर सतत लक्ष असते. पहिले काही आठवडे डॉ. ॲडम ग्रिसीमर हे दिवसातून अनेकदा मोरिस यांच्या शरीरावर होत असलेल्या परिणामांवर लक्ष ठेवून होते. सर्व काही ठीक आहे की नाही? याची काळजी रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याला लागलेली आहे. एनवाययूमधील नर्स एलिना वेल्डन म्हणाल्या की, आम्ही पूर्णवेळ झोपतही नाही. प्रत्येक आठवड्यागणिक आमच्या आशा आणखी पल्लवीत होत आहेत. हा प्रयोग जास्तीत जास्त दिवस टिकावा; जेणेकरून सर्वांनाच याचा लाभ होईल, असा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
एनवाययू संस्थेकडून किडनीच्या बायोप्सी चाचणीचे रिपोर्ट जगभरातील इतर रुग्णालयांना पाठविण्यात येत आहेत. अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात जे जे संशोधक सहकारी आहेत, त्यांच्यापर्यंत याची माहिती पोहोचवली जात आहे.
या प्रयोगानंतर डॉ. रॉबर्ट यांच्याकडे आता अनेक जणांनी हा प्रयोग जिवंत व्यक्तींवर करण्याची विनंती केली आहे. त्यासाठी पत्रे पाठवली जात आहेत; पण डॉ. रॉबर्ट यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे बोट दाखविले आहे. प्रशासन जेव्हा मंजुरी देईल, तेव्हाच असे प्रयोग केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिलरच्या कुटुंबीयांचे मानले आभार
डॉ. रॉबर्ट यांनी मेरी मिलर डफी यांच्याकडे तिच्या भावाचे शरीर एक महिन्यासाठी मिळावे, अशी विनंती केली होती. त्याप्रमाणे हा प्रयोग आता एक महिन्याहून अधिक काळ सुरू आहे. सकारात्मक परिणाम दिसल्यामुळे एनवाययू संस्थेने आता डफी यांच्याकडे दुसऱ्या महिन्यासाठीही शरीर इथेच राहू द्यावे, अशी विनंती केली आहे. तसेच डफी आणि इतर नातेवाइकांना वेळोवेळी या प्रयोगाबाबतची माहिती पुरविण्यात येत असते. डफी यांनी दुसऱ्या महिन्यासाठीही मिलरचे शरीर ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. तसेच जेव्हा तिच्या भावाचे व्हेंटिलेटर काढले जाईल, तेव्हा तिला तिथे उपस्थित राहण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंतीही तिने केली आहे.
या प्रयोगामुळे मेरी डफी यांचाही अवयवदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते. त्या म्हणाल्या, “मी स्वर्गात जाणार असेन, तर मला माझ्या सर्व अवयवांची नक्कीच गरज नाही. डफी यांचे हे विधान सर्वच अवयवदात्यांसाठी प्रेरणादायी असे आहे.