जम्मू-काश्मीर आणखी एका दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या पहलगाम येथे पर्यटकांवर हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. आता या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ने घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा एक चेहरा आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध करीत ‘एक्स’वर लिहिले, “या घटनेने मला धक्का बसला आहे. पर्यटकांवरील हल्ल्याचे हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. या हल्ल्याचे गुन्हेगार जनावर आहेत, अमानुष आहेत आणि त्यांचा तिरस्कार केला पाहिजे. या हल्ल्याचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. मृतांच्या कुटुंबाबरोबर माझी सहानुभूती आहे. मी माझ्या सहकाऱ्यांशी बोललो आहे आणि ते जखमींच्या व्यवस्थेची देखरेख करण्यासाठी रुग्णालयात आहेत. मी ताबडतोब श्रीनगरला परत जाईन”, असे त्यांनी लिहिले. परंतु, पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणणारी टीआरएफ ही संघटना काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काय आहे ‘टीआरएफ’?

रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी)ची एक शाखा आहे. दक्षिण आशिया दहशतवाद पोर्टलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ मध्ये ‘कलम ३७०’ रद्द केला आणि भारत सरकारने जम्मू व काश्मीरचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द करून, दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. त्यानंतर टीआरएफ हा गट अस्तित्वात आला. तोपर्यंत काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तैयबा व जैश-ए-मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. रेझिस्टन्स फ्रंटच्या नेतृत्वात साजिद जट्ट, सज्जाद गुल व सलीम रहमानी यांचा समावेश असून, हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहेत.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, टीआरएफची सुरुवात कराचीमधील सोशल मीडिया आधारित संघटना म्हणून झाली. ही संघटना टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, टॅमटॅम, चिरपवायर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. ही संघटना प्रचार, कट्टरतावाद व भरतीच्या उद्देशाने या प्लॅटफॉर्मचा वापर करते. काश्मीरमधील सशस्त्र हिंसाचाराला स्थानिक रंग देण्यासाठी आणि स्थानिक निषेध म्हणून सादर करण्यासाठी लष्कर-ए-तैयबा ही टीआरएफच्या स्वरूपात सक्रिय झाली.

त्याचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध काय?

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, जेव्हा पाकिस्तान फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) अंतर्गत तपासणी टाळण्याचा प्रयत्न करीत होता तेव्हा ही संघटना अस्तित्वात आली. धार्मिक गटाऐवजी सार्वजनिक चळवळ दर्शविण्याकरिता टीआरएफ या नावाची निवड करण्यात आली. “लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद या नावांचे धार्मिक अर्थ निघतात आणि ते पाकिस्तानला नको होते. त्यांना काश्मीरमधील दहशतवादाला स्थानिक रंग द्यायचा होता म्हणूनच त्यांनी या नावाची निवड केली,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कोणताही इस्लामिक अर्थ नावात न येता, संघटनेच्या नावाची निवड करणे, अशी त्यांची कल्पना होती. पोलिसांच्या माहितीनुसार, टीआरएफ काश्मीर खोऱ्यात जास्त सक्रिय आहे. २०२० पासून या संघटनेने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात केली. लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद व हिजबुल मुजाहिदीनसह विविध दहशतवादी संघटना हल्ले करायच्या; परंतु फक्त टीआरएफ या हल्ल्यांची जबाबदारी घ्यायची. टीआरएफने अलीकडेच २० ऑक्टोबर २०२४ रोजी गंदरबल येथे झेड-मोर बोगद्यात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

नवीन संघटना सक्रिय असल्याचे कधी कळले?

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोर व कूपवाडा येथे ओव्हरग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू)च्या एका गटाला ताब्यात घेतले, एक नवीन संघटना सक्रिय असल्याचे संकेत मिळाले. केरन येथील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) पोलिसांना अतिरेक्यांनी टाकलेली शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा सापडला. अटक केलेल्या गटाने अधिकाऱ्यांना सांगितले की, ते नवीन संघटनेसाठी तरुणांची भरती करीत आहेत. टीआरएफने जम्मू-काश्मीरमधील माध्यम वाहिन्यांना विश्वासघातकी कृत्ये केल्याचा आरोप करीत धमक्याही दिल्या होत्या. त्यानंतर अनेक पत्रकारांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या संघटना

गृह मंत्रालयाने (MHA) जानेवारी २०२३ मध्ये सर्व स्वरूपाच्या आणि आघाडीच्या संघटनांवर बंदी घातली. मंत्रालयाने बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत टीआरएफला दहशतवादी गट म्हणून घोषित केले आहे. मार्च २०२३ मध्ये संसदेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गृह मंत्रालयाने जाहीर केले होते की, टीआरएफला दहशतवादविरोधी कायदा यूएपीए अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संघटना अपहरण आणि इतर हिंसक घटनांमध्येदेखील सामील आहेत.

गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले होते, “टीआरएफ दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची भरती करत आहे. तसेच ही संघटना दहशतवादी कारवाया, दहशतवाद्यांची भरती, दहशतवाद्यांची घुसखोरी आणि पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे व अमली पदार्थांची तस्करी करण्यातदेखील सहभागी आहे. टीआरएफ ही जम्मू-काश्मीरमधील लोकांना भारताविरुद्ध दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यास प्रवृत्त करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहे.”

त्या अधिसूचनेत पुढे असेही नमूद करण्यात आले, “टीआरएफच्या कारवाया भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी धोकादायक आहेत. टीआरएफचे सदस्य आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांच्या हत्यांचे नियोजन, प्रतिबंधित दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी शस्त्रे पुरवल्याबद्दल मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.”