भारताच्या विराट कोहलीची क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये कोहलीने स्वतःला केव्हाच सिद्ध केले होते. फलंदाजीला आल्यावर खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतल्यावर वेगाला जवळ करणारा कोहली ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आक्रमकतेपासून तसा दूर होता. त्याच्या स्वभावातील आक्रमकता मात्र कायम दिसून यायची. परंतु, एक क्षण असा आला की, कोहलीने स्वभावातील आक्रमकतेला नियंत्रणात आणताना नव्या रुपातील ट्वेन्टी-२० क्रिकेटशी जुळवून घेण्यास फलंदाजीत आक्रमकतेला जवळ केले. त्यामुळे यंदा ‘आयपीएल’ आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात वेगळ्या रुपात कोहली मैदानावर दिसला. परंतु आता कोहलीने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. तो क्रिकेटच्या या प्रारुपालाही सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणूनच अलविदा करत आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० कारकिर्दीचा आढावा.
कोहलीने ट्वेन्टी-२० पदार्पण कधी केले?
लाल चेंडूचे क्रिकेट सफाईदार खेळणारा अशी कोहलीची ओळख असली, तरी त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये झाले. कोहलीने २००८ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यापूर्वी २००७ मध्ये भारताने पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर जशी ‘आयपीएल’ला सुरुवात झाली, तशी ट्वेन्टी-२० क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. कोहली याच दरम्यान ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये स्वतःला शोधत होता. झिम्बाब्वेविरुद्ध २०१० मध्ये कोहलीने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
हेही वाचा – ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार! भारतीय न्याय संहिता आजपासून लागू; काय आहेत नवे बदल?
कोहलीची खरी ओळख काय होती?
कोहली हा मूळ आक्रमक स्वभावाचा. स्वभावातील ही आक्रमकता कधी-कधी त्याला महागात पडत होती. मात्र, कठोर मेहनत आणि शैलीवर सातत्याने होणाऱ्या टीकेने कोहलीला घडवले. मैदानाबाहेर लोक काय बोलतात याचा विचार कोहलीने कधीच केला नाही. मात्र, त्याच्या मनात ती सल राहायची आणि त्याचा स्फोट मैदानावर व्हायचा. नैसर्गिक गुणवत्ता लाभलेल्या या खेळाडूने स्वतःमध्ये सतत बदल केला. त्याची आक्रमकता थक्क करणारी होती. यानंतरही ही आक्रमकता टवेन्टी-२० क्रिकेटमध्ये अभावाने दिसून यायची. खेळपट्टीवर आल्यावर स्थिरावण्यासाठी वेळ घेणे आणि नंतर खेळाला वेग देणे या शैलीत त्याने कधी बदल केला नाही. तरी कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता कोहलीकडे होती.
मैदानाबाहेरच्या चर्चेला कोहलीने कसे उत्तर दिले?
कोहली स्वभावाने आक्रमक असला, तरी त्याने ती कधी उघडपणे व्यक्त केली नाही. तो आपल्या खेळातून ती व्यक्त करायचा. एक मनस्वी खेळाडू म्हणून त्याची ओळख झाली होती. त्याचा स्वभाव टेनिसपटू जॉन मॅकेन्रोसारखा होता. मॅकोन्रो तसा संतप्त म्हणून प्रसिद्ध होता. मात्र, तो आपल्या खेळातून समोरच्याला नेहमी चूक ठरवायचा. तसेच कोहलीने कायम आपल्या खेळाने समोरच्याला चुकीचे ठरवले. त्यामुळेच यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये सुनील गावस्कर यांनी ट्वेन्टी-२० क्रिकेट आणि कोहलीचे सूर जुळत नाहीत अशी टीका केल्यावर, कोहलीने आपल्या कामगिरीतूनच या टीकेला उत्तर दिले. त्याने यंदा ‘आयपीएल’ कारकिर्दीतील सर्वाधिक स्ट्राईक-रेटने धावा करून दाखवल्या.
आक्रमकतेचा भारतीय संघाला कसा फायदा?
कामगिरीत कमालीचे सातत्य दाखवताना त्याने फलंदाज म्हणून नेहमीच संघाचे हित पाहिले. मात्र, तो जेव्हा कर्णधार झाला, तेव्हा आपल्या स्वभावातील आक्रमकतेचा वेगळा पैलू दाखवला. स्वतःसारखी जिद्द आणि विजिगीषू वृत्ती त्याने सहकाऱ्यांमध्येही बिंबवली. मैदानावर उतरले की सामना जिंकण्यासाठीच खेळायचे. पराभव हा शब्द त्याच्या शब्दकोशातच जणू नव्हता. स्वतःच्या खेळीतून त्याने अनेकदा हे करून दाखवले. त्यामुळे कोहलीच्या कर्णधारपदाच्या कालावधीत भारतीय संघाला परदेशातही विजयाची सवय लागली आणि ती कायम राहिली.
हेही वाचा – विश्लेषण: AI फोनची सर्वत्र चर्चा; काय आहेत फायदे आणि तोटे?
कारकिर्दीला वळण देणारा क्षण कोणता?
कोहलीला क्रिकेटपटू घडविण्यामागे सर्वांत मोठा वाटा त्याच्या वडिलांचा होता. वडिलांना आदर्श मानूनच कोहली आयुष्यात उभा राहिला आणि टिकला. लहानग्या विराटचा हात धरून वडिलांनी त्याला मैदानात आणून सोडले. तेव्हापासून क्रिकेट त्याच्या आयुष्याचा एक भाग बनले. स्थानिक सामना खेळत असताना वडिलांचे निधन झाले. वडील गेल्याचा संदेश आल्यावर कोहली घरी गेला. पण, त्याही परिस्थितीत घरच्यांना धीर देत कोहली तेथून मैदानावर आला. वडील गेल्याचे दुःख होते, पण त्याने ते कुठेही दाखवले नाही. पुढे मैदानात अफलातून खेळ करून तो बाहेर आला. वडिलांनी मला एका योद्ध्यासारखे रहायला शिकवले. मला तसेच रहायचे आहे. मला योद्धा व्हायचे आहे, असे कोहली म्हणाला. तेव्हापासून आजपर्यंत कोहलीने खाजगी आयुष्य मागे ठेवून क्रिकेटला प्राधान्य दिले.
यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषकात योगदान किती?
यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषकात साखळी सामने, अव्वल आठ फेरी आणि उपांत्य फेरीत कोहलीला फारसे योगदान देता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका होऊ लागली. तेव्हा पुन्हा समोरच्याला चूक ठरवणारा कोहली अंतिम सामन्यात दिसला. तीन खणखणीत चौकारांनी सकारात्मक सुरुवात केलेल्या कोहलीने रोहित शर्मा, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव असे प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर आक्रमकता जरा बाजूला ठेवली आणि आपला अनुभव पणाला लावला. अक्षर पटेलला संधी देत त्याने एक बाजू लावून धरली. आत्मविश्वास वाढीसाठी आवश्यक असणारी मोठी खेळी खेळण्यासाठी अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर त्याने आपली आक्रमकता दाखवली. अर्धशतकानंतर कोहलीने ज्या पद्धतीने २६ धावा काढल्या त्यामुळे भारताच्या गोलंदाजांना आत्मविश्वास देणारे आव्हान उभे राहू शकले. त्यामुळे कोहलीची ही खेळी कायम स्मरणात राहील अशीच ठरली.