-अमोल परांजपे

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४च्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली. ट्रम्प यांचे निकटवर्ती ब्रॅडली क्रेट यांनी मंगळवारी अमेरिकेच्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे उमेदवारी दाखल केली. याचे संकेत त्यांनी आधीच दिले असले तरी मध्यावधी निवडणुकीचे सगळे निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी पुढल्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मध्यावधी निवडणुकांच्या निकालाचा परिणाम काय?

नुकत्याच झालेल्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने अपेक्षेपेक्षा खराब कामगिरी केली. स्वत: ट्रम्प यांनी निवडलेले अनेक उमेदवार सेनेट आणि हाऊसच्या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे आता ट्रम्प यांना विसरून पुढे गेले पाहिजे, असा मतप्रवाह पक्षात आहे. मात्र आपण या मताला कोणतीही किंमत देत नाही, असा संदेश ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेची जनता आपल्याला नाकारत आहे, हे मान्य करायला ते अद्याप तयार नाहीत.

ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार झाले का?

या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. साधारणत: अमेरिकेतील राजकीय पक्ष हे विद्यमान राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्या कार्यकाळासाठी प्राथमिक फेरी न लढता संधी देतात. मागच्या निवडणुकीत ट्रम्प यांना ही संधी मिळाली आणि ते पराभूत झाले. आता त्यांना पुन्हा एकदा पक्षाच्या प्राथमिक फेरीत (प्रायमरीज्) उतरावे लागेल. या फेरीत पक्षाचे सदस्य आपला उमेदवार निवडण्यासाठी मतदान करतात. अनेक उमेदवारांमधून एकाची ‘पक्षाचा अधिकृत उमेदवार’ म्हणून निवड होते.

रिपब्लिकन पक्षासमोर उमेदवाराचे पर्याय कोणते?

ट्रम्प यांना नजरेआड करण्याचे निश्चित झाल्यानंतर पक्षाने नवा चेहरा शोधण्यास सुरुवात केली आहे. फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसान्टिस यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. ते सलग दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने गव्हर्नरपदी निवडूल आले आहेत. याखेरीज ट्रम्प यांचेच उपाध्यक्ष राहिलेले माईक पेन्स इच्छुक आहेत. शिवाय व्हर्जिनियाचे गव्हर्नर ग्लेन यंकिन, टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबॉट, साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हॅले आणि माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ हे नेतेही शर्यतीत असण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांनी या इच्छुकांना इशारा दिला का?

आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यापूर्वी ट्रम्प यांनी डेसान्टिस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कारण प्राथमिक फेरीमध्ये तेच आपले मुख्य प्रतिस्पर्धी असणार आहेत, हे ट्रम्प यांनी ओळखले आहे. दुसरीकडे त्यांची उमेदवारी लवकर दाखल झाल्यामुळे अन्य इच्छुकांवर दबाव वाढणार आहे. त्यांनाही येत्या काही महिन्यांमध्ये आपले पत्ते उघड करावे लागतील. असे झाल्यास रिपब्लिकन पक्षातील रस्सीखेच पुढले दीड वर्ष बघायला मिळू शकेल.

ट्रम्प यांच्या उमेदवारीत कायदेशीर अडचणी काय?

जानेवारी २०२१मध्ये ‘व्हाईट हाऊस’ सोडताना त्यांनी काही कागदपत्रे आपल्यासोबत नेली आणि त्यात अत्यंत गोपनीय कागदपत्रेही होती, असा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. फ्लोरिडामधील मार-ए-लागो येथील त्यांच्या बंगल्यातून तब्बल ११ हजार कागदपत्रे एफबीआयने जप्त केली आहेत. २०११ ते २०२१ या काळात ट्रम्प आणि त्यांच्या कंपनीने मालमत्तेचे गैरमूल्यांकन केल्याचा खटला सुरू आहे. शिवाय कॅपिटॉलबाहेर झालेल्या दंगलीला चिथावणी दिल्याचा आरोपही ट्रम्प यांच्यावर झाला आहे. उमेदवारीमुळे या खटल्यांंमधून संरक्षण मिळेल, अशी आशा त्यांना आहे.

चौकशीतून सुटका करून घेण्यासाठी उमेदवारी? 

अध्यक्षीय निवडणुकीला अद्याप दोन वर्षे असताना आपण इतरांपेक्षा चार पावले पुढे आहोत, असा संदेश ट्रम्प यांनी दिली आहेच. शिवाय सर्व आरोपांमधून सुटका करून घेण्याची त्यांची खटपट आहे. आपल्यावर राजकीय राजकीय द्वेषातून आरोप झाल्याची ओरड ट्रम्प यांनी आधीच केली आहे. आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्यानंतर ते अधिक मोठ्या आवाजात हेच आरोप करू शकतील.

ट्रम्प यांच्यासमोर कोणत्या अडचणी आहेत?

त्यांच्यासमोर असलेल्या समस्यांची यादी मोठी आहे. वर उल्लेख केलेल्या कायदेशीर अडचणी आहेतच. शिवाय, आता त्यांची राजकीय पाटी कोरी नाही. आठ वर्षांपूर्वी ते जेव्हा सर्वप्रथम प्राथमिक फेरीत उतरले, तेव्हा त्यांचे राजकारण, निर्णय घेण्याची क्षमता, नेतृत्व याची कसोटी लागली नव्हती. आता चार वर्षांच्या अध्यक्षीय कारकीर्दीचा हिशेब केला जाईल. अमेरिकेत अलिकडे झालेल्या जनमत चाचण्यांमधून ट्रम्प यांची लोकप्रियता घसरल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यावधीचे निकाल हे त्याचे दृष्य स्वरूप आहे. शिवाय त्यांच्यापुढे वयाची अडचण आहे.

अमेरिका सलग दुसरे ‘वृद्ध’ अध्यक्ष निवडेल का?

ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाले असे गृहित धरले तरी शपथविधीच्या वेळी त्यांचे वय ७८ वर्षे असेल. जो बायडेन याच वयात अध्यक्ष झाले आहेत. बायडेन यांच्यावर आतापासूनच संथगतीने काम करत असल्याचा आरोप होत आहे. अशा वेळी आणखी एक ‘वृद्ध’ राष्ट्राध्यक्ष जनता निवडून देईल का, ही शंका आहे. अर्थात डेमोक्रेटिक पक्षातून बायडेन पुन्हा रिंगणात उतरले तर (त्यांनी तसे संकेत दिले आहेत) हा मुद्दा निकाली निघेल.

ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता किती?

यावेळी ‘व्हाईट हाऊस’ पर्यंतचा हा प्रवास ट्रम्प यांच्यासाठी सहा वर्षांपूर्वीइतका सोपा नसेल, हे निश्चित. सर्व नकारात्मक मुद्द्यांवर मात करून त्यांना आधी पक्षात आणि नंतर देशात मते मिळवावी लागतील. प्राप्त परिस्थितीत हे जरा कठीण असले तरी त्यांची आजवरची कार्यशैली पाहता ते अशक्यही नाही.