Donald Trump’s Diwali message to Hindu Americans: अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर (एक्स) दिवाळीच्या निमित्ताने हा मेसेज पोस्ट केला होता. ट्रम्प म्हणाले की, बांग्लादेशमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्यावर जमावाकडून हल्ले होत आहेत, त्यांची लूट केली जात आहे. यामुळे अराजकता निर्माण झाली आहे. असे माझ्या कालखंडात कधीच घडले नसते. कमला आणि जो यांनी जगभरातील तसेच अमेरिकेतील हिंदूंकडे दुर्लक्ष केले. इस्रायलपासून ते युक्रेनपर्यंत, अगदी आमच्या स्वतःच्या दक्षिण सीमेपर्यंत ते हिंसेचे बळी ठरले आहेत. परंतु आपण अमेरिकेला पुन्हा मजबूत करून शांतता प्रस्थापित करू! तसेच त्यांनी कट्टरपंथी डाव्यांच्या धर्मविरोधी अजेंड्यापासून अमेरिकेतील हिंदूच्या संरक्षणाचा मुद्दाही मांडला. ट्रम्प पुढे म्हणतात की, त्यांच्या कालखंडात भारताबरोबर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अधिक संबंध मजबूत करण्यात येतील. तसेच त्यांनी कमला हॅरिस यांच्यावर लघु उद्योगांवर लावण्यात आलेल्या नियम आणि कराच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. भूतकाळात आपण सक्षम अर्थव्यवस्था उभी केली होती आणि ती पुन्हा उभी करून अमेरिकेला महान देश बनवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेत हिंदू कधी स्थायिक झाले? ते आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला याचा घेतलेला हा आढावा!
अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या किती आणि ते कोठून आले?
अमेरिकेत जनगणना करताना धार्मिक माहिती गोळा केली जात नाही. त्यामुळे तेथील हिंदू लोकसंख्येची अचूक आकडेवारी शोधणे कठीण आहे. परंतु एका अहवालानुसार अमेरिकेत तीन दशलक्षाहून अधिक हिंदू आहेत. म्हणजेच अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या १ टक्के हिंदू आहेत असे hinduamerican.org या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलेले आहे. मुख्यत्त्वे ही लोकसंख्या न्यू जर्सी, नॉर्दर्न कॅलिफोर्निया, मेट्रो ह्यूस्टन आणि न्यूयॉर्क या शहरी भागांमध्ये केंद्रित आहे. न्यू जर्सीमध्ये हिंदूंची लोकसंख्या सर्वाधिक आहे. याशिवाय संपूर्ण अमेरिकेत १००० पेक्षा अधिक हिंदूंची प्रार्थनास्थळं आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत अंदाजे ५.२ दशलक्ष भारतीय अमेरिकन आहेत.
अमेरिकन हिंदूंमध्ये जातीनिहाय वैविध्य आढळत असले तरी मुख्यत्त्वे बहुसंख्य हे भारतीय वंशाचे आहेत. भारतीय वंशाशिवाय कॅरिबियन, आफ्रिकन, युरोपीय, हिस्पॅनिक आणि पूर्व व आग्नेय आशियायी अशा इतर वंशाच्या हिंदूंचाही या लोकसंख्येत समावेश होतो. अमेरिकन हिंदू समुदायाचा एक महत्त्वाचा भाग अफगाणिस्तान, भूतान आणि श्रीलंका येथून स्थलांतरित झालेल्या शरणार्थी लोकांचा आहे. अमेरिकेत हिंदूद्वेषाच्या घटनांची एकसंध माहिती उपलब्ध नाही.
अमेरिकेतील हिंदूंचा इतिहास १०० वर्षांपेक्षा जुना
हिंदूंना अमेरिकेत स्थायिक होऊन १०० वर्षांपेक्षा अधिकच काळ लोटला आहे. उपनिषद आणि भगवद्गीता या हिंदू धर्मग्रंथांच्या तत्त्वज्ञानाने अमेरिकेतील ट्रान्सेंडेंटलिस्ट (Transcendentalist) चळवळीवर सखोल प्रभाव टाकला. हेन्री डेव्हिड थोरो आणि राल्फ वाल्डो इमर्सन हे या चळवळीतील प्रमुख होते. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांमधून तसेच कर्म आणि ज्ञान योगासारख्या तत्त्वज्ञानांमधून प्रेरणा घेतली. ट्रान्सेंडेंटलिस्टांचा हिंदू तत्त्वज्ञानाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन असला तरी अमेरिकेत त्यावेळी या धर्माबद्दल सार्वजनिक समज फारशी नव्हती. अमेरिकेला हिंदू तत्त्वज्ञानाची पहिली सार्वजनिक ओळख १८९३ साली शिकागोत झालेल्या स्वामी विवेकानंदांच्या भाषणाने झाली. स्वामी विवेकानंद यांनी १८८४ साली न्यूयॉर्कमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या स्थापनेमुळे अमेरिकेतले पहिले हिंदू शिक्षणकेंद्र स्थापन झाले.
हिंदू स्थलांतराविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील आशियायी स्थलांतरितांची संख्या वाढली. ज्यात भारतीय उपखंडातून आलेले हिंदू आणि शीख यांचा समावेश होता. या स्थलांतरितांपैकी अनेकजण पॅसिफिक वायव्य भागात कमी वेतनावर कामगार म्हणून काम करत होते. आशियायी मजुरांच्या वाढत्या संख्येला उत्तर म्हणून १४ मे १९०५ रोजी अमेरिकेतील ६७ कामगार संघटनांनी एकत्र येऊन जपानी आणि कोरियन बहिष्कार संघ (Japanese and Korean Exclusion League) स्थापन केला. या संघाने सर्व प्रकारच्या आशियायी स्थलांतरितांवर बंदी आणण्यासाठी सक्रिय प्रयत्न सुरू केले. कालांतराने या संघाने आपले कार्यक्षेत्र वाढवून संघाचे नाव बदलून आशियायी बहिष्कार संघ (Asiatic Exclusion League) असे ठेवले.
हिंदू स्थलांतरितांवर हल्ला
५ सप्टेंबर १९०७ रोजी आशियायी बहिष्कार संघाच्या नेतृत्त्वाखाली वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम शहरात जमावाने शंभरहून अधिक भारतीय स्थलांतरितांना शहरातून बाहेर हाकलून लावले. या जमावाने केलेल्या हल्ल्याचे कोणतेही गुन्हे न्यायालयासमोर आणले गेले नाहीत. उलट त्या काळातील वृत्तपत्रांनी वॉशिंग्टनमधून ‘हिंदूंना’ हटवल्याचा उत्सव साजरा केला होता. अशा प्रकारचे हल्ले इव्हरेट आणि व्हॆनकुवरसह इतर वायव्येकडील शहरांमध्येही झाले. या हल्ल्यांच्या माध्यमातून पॅसिफिकच्या वायव्य भागातील जवळजवळ सर्व हिंदू आणि शिखांना बाहेर हाकलण्यात आले.
अधिक वाचा: ख्रिस्तोफर कोलंबस हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व; इतिहास नेमका काय
स्थलांतर आणि नागरिकत्त्वावरील कायदेशीर निर्बंध
आशियायी बहिष्कार संघ आणि इतर नेटिव्हिस्ट संघटनांच्या दबावाखाली काँग्रेसने १९०६ चा नैसर्गिकीकरण कायदा (Naturalization Act) मंजूर केला. या कायद्याने फक्त ‘free white persons’ (गोरे-युरोपियन वंशाचे) आणि ‘आफ्रिकन जन्माच्या व्यक्तींना’ नैसर्गिक नागरिकत्त्व मिळण्यास पात्र ठरवले. आशियायी नागरिकांना अमेरिकेतील नागरिकत्त्वापासून वंचित ठेवण्यात आले, तसेच संपूर्ण हिंदू व शीख समुदायाचे मताधिकारही नाकारले.
नैसर्गिकीकरण-Naturalization कायद्याला विरोध
नैसर्गिकीकरण कायद्याला नागरिकत्त्व मिळवू इच्छिणाऱ्या अल्पसंख्याक समुदायांनी जोरदार विरोध केला. १९१३ ते १९२३ या कालावधीत या कायद्याला अनेक कायदेशीर आव्हाने देण्यात आली. काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. सुरुवातीला हा लढा काही प्रमाणात यशस्वी ठरला, परंतु शेवटी काँग्रेसने १९२४ चा स्थलांतर कायदा (Johnson-Reed Act) मंजूर केला. या कायद्याचा उद्देश अमेरिकन एकसंधतेच्या आदर्शांचे संरक्षण करणे होता. या कायद्याने भारत, दक्षिण आशियातून आणि मध्य पूर्वेतून होणाऱ्या स्थलांतरावर प्रतिबंध घातला.
कायदेशीर निर्बंधांमध्ये बदल
१९२४ च्या स्थलांतर कायद्याचा परिणाम पुढील २२ वर्ष आशियायी स्थलांतरितांना भोगावा लागला. १९४६ साली हॅरी ट्रूमन यांनी लूस-सेलर कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर हिंदूंसह पूर्वी वगळण्यात आलेल्या समुदायांना नैसर्गिक नागरिकत्त्व देण्याची परवानगी दिली. तसेच या कायद्याने भारतातून दरवर्षी १०० व्यक्तींना अमेरिकेत स्थलांतरित होण्याची कोटा प्रणाली देण्यात आली. हा कोटा पुढील एकोणीस वर्षे अस्तित्वात राहिला. १९६५ साली काँग्रेसने हार्ट-सेलर कायदा मंजूर केला. या कायद्याने राष्ट्रीय ओळखीवर आधारित कोटा रद्द केला. गरजेला प्राधान्य दिले. त्यामुळे मोठ्या संख्येने हिंदूंचा अमेरिकेत स्थलांतरासाठीचा मार्ग मोकळा झाला. ८० च्या दशकापर्यंत अमेरिकेतील हिंदू लोकसंख्येचा टक्का वाढला.
हिंदूंवरील हल्ले
हिंदूंच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अमेरिकेत धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. साडी नेसणाऱ्या आणि टिकली लावणाऱ्या हिंदूंना इतर समुदायांकडून लक्ष करण्यात आले आणि त्यांना छळाचा सामना करावा लागला. १९८७ मध्ये न्यू जर्सी मधील हिंदूंना बाहेर हाकलण्यासाठी हिंसाचाराचा प्रचार करणारे पत्र जर्सी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले. याच कालखंडात भारतीयांवर हल्लेही करण्यात आले, ज्यात काहींचे मृत्यूही झाले. विशेष म्हणजे हल्लखोरांची निर्दोष मुक्तताही झाली. या हल्ल्यांमुळे हिंदू आणि भारतीय-अमेरिकन समुदाय एकत्र आले. या अत्याचारांविरुद्ध कायदा मंजूर करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. दुर्दैवाने, न्यू जर्सी आणि इतर राज्यांमधील असे कायदे हिंदू समुदायावर होणारे द्वेषयुक्त हल्ले थांबवू शकले नाहीत. परंतु ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही मुस्लिमांबरोबरीनेच शीख, हिंदू, दक्षिण आशियायी आणि हिस्पॅनिक समुदायांवरही हल्ले झाले.
अधिक वाचा: Christopher Columbus: अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस इटालियन नव्हे तर स्पॅनिश ज्यू?
हिंदू उपासना स्थळे आणि धार्मिक संस्थांवर हल्ले
बहुतांश हिंदू उपासना स्थळे ग्रामीण भागात स्थित आहेत. अशा ठिकाणी सुरक्षा कमी असते. हिंदू प्रार्थना स्थळांच्या विशेष वास्तुशैलीमुळे ती सहज ओळखता येतात. त्यामुळे या स्थळांची अनेकदा तोडफोड आणि अनधिकृत प्रवेश केला जातो तसेच ही स्थळं चोरांचे लक्ष्यही ठरतात. बहुतांश समुदाय हिंदू मंदिरे आणि आश्रमांचे स्वागत करतात तरी देखील या स्थळांना अनेकदा विरोध आणि छळाचा सामना देखील करावा लागतो.
पंधरा वर्षांतील हिंदू मंदिरांवरील सर्व नोंदवलेले हल्ले (संदर्भ:hinduamerican.org)
१२ सप्टेंबर २००१: न्यू जर्सीच्या मातावन येथील एका हिंदू मंदिरावर मोलोटोव कॉकटेलचा वापर करून हल्ला झाला. त्याच दिवशी, इलिनॉयच्या मेडिनाह येथील हिंदू मंदिरावर देखील हल्ला झाला.
२००३: ऍरिझोना येथील चँडलर येथील हिंदू सांस्कृतिक केंद्रावर तोडफोड झाली.
मार्च २००३: सेंट लुईस, मिसुरी येथील एका हिंदू मंदिराला दोन किशोरवयीन, पॉल लेर्ड आणि नॅथॅनियल कॉनर यांनी आग लावली.
२७ नोव्हेंबर २००३: अशलँड, मॅसेच्युसेट्स येथील श्री लक्ष्मी मंदिरावर किशोरवयीन अँथनी पिचिओलोने द्वेषपूर्ण संदेश स्प्रे पेंटने लिहिला, परंतु त्याच्यावर आरोप सिद्ध झाले नाहीत.
एप्रिल २००६: दोन किशोरवयीन, पॉल स्पाकॉस्की आणि टायलर टोमी यांनी मिनेसोटातील मेपल ग्रोव्ह हिंदू मंदिरात प्रवेश केला आणि अनेक पवित्र मूर्ती नष्ट केल्या, ज्यामुळे २००,००० डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले.
जून २००६: अलाबामाच्या हार्वेस्ट येथील सरवजना मंदिराच्या बांधकामस्थळावरून काँक्रीट मूर्तीची चोरी झाली.
जुलै २००७: श्री लक्ष्मी मंदिरावर मोलोटोव कॉकटेलने हल्ला करण्यात आला.
४ जून २०१०: हार्वेस्ट येथील सरवजना मंदिरातून दोन हस्तनिर्मित मूर्तींची चोरी झाली.
मार्च २०११: श्री वेंकटेश्वर मंदिरातील सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्यात आला आणि तीन तिजोर्या चोरीस गेल्या.
१ जानेवारी २०१२: न्यूयॉर्कच्या क्वीन्स येथे रे लेझियर लेंगेंड याने हिंदू मंदिरावर मोलोटोव कॉकटेलने हल्ला केला.
१३ नोव्हेंबर २०१२: न्यू जर्सी येथील इंडियन कल्चरल सोसायटी हिंदू मंदिरासमोरील शिवाची मोठी मूर्ती चोरीस गेली.
जानेवारी २०१३: इरविन, कॅलिफोर्निया येथील हिंदू मंदिरात चोरी झाली.
३ मे २०१३: अलाचुआ, फ्लोरिडा येथील हरे कृष्ण मंदिरात दोन व्यक्तींनी तोडफोड केली.
२ ऑगस्ट २०१४: जॉर्जियाच्या मोन्रो येथील विश्व भवन हिंदू मंदिरात तोडफोड झाली.
१५ फेब्रुवारी २०१५: वॉशिंग्टनच्या बोथेल येथील हिंदू मंदिरावर द्वेषपूर्ण संदेश लिहिले गेले.
२६ फेब्रुवारी २०१५: केंट, वॉशिंग्टन येथील हिंदू मंदिरावर हल्ला झाला.
१३ एप्रिल २०१५: नॉर्थ टेक्सास हिंदू मंदिरावर ‘डेविल वर्शिप’ चिन्हे काढण्यात आली.
११ जुलै २०१५: क्लेमन्स, उत्तर कॅरोलिना येथील मंदिरावर गोळीबार करण्यात आला.
२० मार्च २०१६: शंकर शास्त्री यांनी स्थापन केलेल्या गायींच्या निवासस्थानामध्ये गायीचे कापलेले शीर मिळाले.
२५ सप्टेंबर २०१७: कनेक्टिकटच्या विल्टन येथील हिंदू मंदिरातील एक खिडकी फोडण्यात आली.
१४ ऑक्टोबर २०१७: वेस्ट पाम बीच, फ्लोरिडा येथील एका मंदिरात तोडफोड झाली.
जानेवारी २०१९: केंटकी येथील हिंदू मंदिरात ख्रिश्चन वर्चस्वाचे संदेश लिहिण्यात आले.
हे काही निवडक दाखले आहेत. याशिवाय खाजगी मालमत्तेवरील हल्ल्यांची प्रकरण ही समाविष्ट आहेत. ९ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या हल्ल्यांची कारणमीमांसा समजण्यासारखी होती. परंतु या हल्ल्यांमध्ये २०१४ नंतर ही वाढ झाल्याचे चित्र आहे. एकुणातच सार्वजनिक क्षेत्रातील हिंदूविरोधी पूर्वग्रह हा बऱ्याच अंशी या हल्ल्यांसाठी कारणीभूत आहे. हिंदू धर्माबद्दलच्या गैरसमजांमुळे हिंदू अमेरिकन लोकांना सार्वजनिक जीवनात सहभाग घेताना धार्मिक पूर्वग्रहाचा सामना करावा लागतो.
अधिक वाचा: Vasco da Gama: ‘या’ गुजराती तांडेलाने ‘वास्को द गामा’ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?
हिंदू नेत्यांपासून ते स्थानिकांपर्यंतचा झगडा
१४ सप्टेंबर २००० रोजी वेन्कटचलपति समुद्रला यांनी यू.एस. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजसमोर अमेरिकन इतिहासातील पहिली हिंदू प्रार्थना केली. यावर फॅमिली रिसर्च कौन्सिलने टीका करत म्हटले की, हे देशाच्या ज्यू-ख्रिश्चन मूळांपासून दूर जाण्याचे लक्षण आहे. १२ जुलै २००७ रोजी नेवाडा येथील हिंदू नेते राजन झेड यांनी यू.एस. सेनेटसमोर पहिली हिंदू प्रार्थना केली. झेड यांनी प्रार्थना सुरू केली असता, तीन आंदोलकांनी त्यांना हे एक पापकर्म आहे! असे ओरडून विरोध केला. मार्च २०१५ साली झेड यांना आयडाहो राज्य सीनेटसमोर प्रार्थना करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. यावेळी, आयडाहो सीनेट सदस्यांनीच विरोध केला. सेन स्टीव्ह विक यांनी हिंदू धर्माचे स्वागत आयडाहोमध्ये करू नये असे सांगितले. तसेच हिंदू परंपरा ख्रिश्चन स्मारकांबरोबर प्रदर्शित करण्याचे हिंदूंचे प्रयत्न अनेक वेळा नाकारण्यात आले आहेत. हिंदू धर्माचे पालन करणारे उमेदवार धार्मिक पूर्वग्रहांचे लक्ष्य ठरतात. तुलसी गेबार्ड या पहिल्या हिंदू अमेरिकन प्रतिनिधी होत्या. त्यांच्यावर विरोधकांनी हिंदू म्हणून टीका केली होती. माजी मिनेसोटा स्टेट सेनेटर सत्वीर चौधरी यांना त्यांच्या रिपब्लिकन प्रतिस्पर्ध्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिला होता. अनेकदा हिंदूंना अमेरिकेत झेनोफोबिक (विदेशीविरोधी) पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो.