अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नवीन सरकार स्थापनेसाठी महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करत आहेत. आपल्या सरकारमध्ये ट्रम्प भारतीय वंशाच्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देताना दिसत आहेत. नुकतंच ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या (नॅशनल इंटेलिजेंस) संचालकपदासाठी तुलसी गबार्ड यांची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तुलसी गबार्ड या आधी बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षात होत्या. त्या काँग्रेस (अमेरिकेतील संसद) सदस्य होत्या. २०२२ मध्ये त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाहेर पडल्या आणि पुढे त्यांनी ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ट्रम्प प्रशासनातील एक अद्वितीय व्यक्ती म्हणून स्थान देण्यात आले आहे. कोण आहेत तुलसी गबार्ड? त्यांना सोपवण्यात आलेल्या पदाचे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.
गबार्ड यांनी इतिहास घडवला
ट्रम्प यांनी गबार्ड यांच्या पार्श्वभूमीचे कौतुक केले आणि दोन्ही बाजूंनी व्यापक समर्थन असलेल्या नेत्या म्हणून त्यांचे वर्णन केले. ट्रम्प म्हणाले, “मला माहीत आहे की, तुलसी निडरतेने राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे काम सांभाळेल. तुलसी यांचा आपल्या सर्वांना अभिमान वाटेल.” ट्रम्प प्रमुख सरकारी भूमिकांसाठी निष्ठावंतांची निवड करण्यासाठी ओळखले जातात. ट्रम्प यांनी गबार्ड यांच्या इच्छाशक्तीचीही प्रशंसा केली. गबार्ड या यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या हिंदू होत्या. त्या आर्मी रिझर्व्हमध्ये माजी लेफ्टनंट कर्नल राहिल्या आहेत. त्यांच्या या अनुभवामुळे राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पर्यवेक्षकांनी नोंदवले आहे की, गबार्ड यांची नियुक्ती ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरण आणि बुद्धिमत्तेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल दर्शवू शकते.
ट्रम्प यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणाला मिळेल आकार
२०१९ मध्ये तुलसी यांनी डेमोक्रेटिक राष्ट्राध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीतील चर्चेत कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. परंतु, राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांना यश मिळाले नाही. गबार्ड या बायडेन यांच्या प्रशासनाच्या जागतिक संघर्षांच्या उघड टीकाकार राहिल्या आहेत, त्या आता ट्रम्पच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर प्रभाव टाकू शकतात. त्यांनी बायडेन यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर चिंताही व्यक्त केली होती आणि आपण पूर्वीपेक्षा अणुयुद्धाच्या अगदी जवळ आहोत, असे मतही व्यक्त केले होते. एका प्रचार रॅलीत बोलताना, गबार्ड यांनी जागतिक तणाव कमी करण्याच्या उद्देशावर ट्रम्प यांना दिलेल्या पाठिंब्यावर भर दिला होता. “मला विश्वास आहे की त्यांचे कार्य आपल्याला युद्धाच्या उंबरठ्यावरून परत आणण्याचे काम करेल,” असे त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा : मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
अमेरिकेतील परकीय हस्तक्षेपांबद्दल गबार्ड यांची तटस्थ भूमिका राहिली आहे. त्यांनी रशियाबरोबरच्या संघर्षात युक्रेनला बायडेन यांनी दिलेल्या पाठिंब्याचा निषेध केला आहे. ओबामा प्रशासनाच्या सीरियातील सहभागाविरुद्धही त्यांनी आवाज उठवला होता. २०१७ मध्ये मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप असलेल्या राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना भेटण्यासाठी त्यांनी सीरियाला भेट दिली आणि त्यावरून वाद सुरू झाला. त्यांच्या नियुक्तीने ट्रम्प प्रशासनाच्या राजनैतिक धोरणांमध्ये संभाव्य बदल दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गबार्ड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय गुप्तचर विभाग सध्याचे संघर्ष कमी करणे, अमेरिकेबरोबर दीर्घकालीन युती आदी मुद्द्यांना प्राधान्य देऊ शकते. अमेरिकेच्या हस्तक्षेपवादी धोरणांवरील गबार्ड यांच्या पूर्वीच्या टीकेवरून हेदेखील स्पष्ट होते की, त्या जागतिक स्तरावर अमेरिकेची भूमिका बदलू शकतात.