युक्रेनमधील तात्पुरत्या युद्धविरामासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात १८ मार्च रोजी चर्चा होत आहे. तूर्त या चर्चेचे स्वरूप तात्पुरत्या युद्धविरामापुरते मर्यादित असले, तरी नजीकच्या भविष्यात पूर्ण आणि शाश्वत युद्धबंदीची बीजे या चर्चेत रोवली जाऊ शकतात. चर्चेमध्ये युरोपिय देशांना सध्या तरी कोणतेच स्थान नाही. पण युक्रेनसमोर दोन्ही महासत्तांदरम्यान जे काही ठरेल ते स्वीकारण्यावाचून पर्याय दिसत नाही. अमेरिकेने युक्रेनच्या मत्ता (अॅसेट्स) विभागणीविषयी सूतोवाच केले आहे, तर रशियालाही ‘जैसे थे’ परिस्थितीमध्ये युद्ध थांबावे असे वाटते. दोन्ही पर्याय युक्रेनसाठी अतिशय नुकसानकारक ठरतील. 
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
तीस दिवसीय तात्पुरत्या युद्धविरामावर नुकतेच युक्रेन आणि अमेरिकेदरम्यान मतैक्य झाले. पण रशियाने अद्याप अनेक बाबी पुरेशा स्पष्ट नसल्याचे सूचक विधान केले. युक्रेन आणि युरोपातील इतर देशांना बगल देऊन ट्रम्प यांनी थेट पुतिन यांच्याशी – म्हणजे आक्रमक राष्ट्राच्या प्रमुखांशीच चर्चा करण्याचा निर्णय घेतला हे अनेकांना मान्य नाही. मात्र तरीही सौदी अरेबियात जेद्दा येथे झालेल्या युक्रेन-अमेरिका चर्चेनंतर ३० दिवसीय युद्धविरामाचा प्रस्ताव युक्रेननेच सादर केला आहे. तो कशा प्रकारे असावा आणि पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्याची दिशा कोणती असावी यावर ट्रम्प-पुतिन चर्चा होणे अपेक्षित आहे. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांच्या काही अटी आहेत. त्या अटींचे काय होणार, हे अनिश्चित आहेत. ३० दिवसांच्या मुदतीत शत्रूराष्ट्र अधिक शस्त्रसज्ज होईल, असे दोन्ही देशांना वाटते. हा संशय दूर करण्यात ट्रम्प यांना कितपत यश येईल यावरच संभाव्य युद्धबंदीचे भवितव्य अवलंबून आहे. 

युद्धाची सद्यःस्थिती काय?

युक्रेनचा पूर्ण पराभव करण्याच्या उद्देशाने रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी त्या देशावर हल्ला केला. युक्रेनने चिवट प्रतिकार केला असला, तरी चार प्रांतांच्या मोठ्या भूभागांवर रशियाचा ताबा आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील डॉनेत्स्क, लुहान्स्क आणि आग्नेयेकडील खेरसन व झापोरिझ्झिया हे ते चार प्रांत. याशियाव क्रायमिया हा युक्रेनचा प्रांत रशियाने २०१४मध्येच ताब्यात घेतला. क्रायमिय वगळता इतर चारपैकी एकही प्रांत पूर्णतः रशियाच्या ताब्यात नाही. याशिवाय गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये युक्रेननेच रशियाच्या कुर्स्क प्रांतात अनपेक्षित मुसंडी मारली आणि तेथील काही भूभाग ताब्यात घेतला. रशियासाठी तो मोठा धक्का होता. मात्र आता कुर्स्कमध्ये रशियाच्या रेट्यासमोर युक्रेनच्या फौजांना माघार घ्यावी लागत आहे. या युद्धात सध्यातरी कोणाचाच निर्णायक विजय किंवा निर्णायक पराभव संभवत नाही. मात्र युद्ध लांबेल तशी दोन्ही देशांना जबर किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि पुतिन या दोघांनाही मनातून युद्ध थांबावे असेच वाटते.

अमेरिकेला काय मिळणार?

युक्रेनकडील समृद्ध खनिजांच्या उत्खननाचा हक्क, या खनिजांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाटा अशा विविध मार्गांनी युद्धविराम आणि भविष्यातील युद्धबंदीचा फायदा अमेरिकेला होऊ शकतो. तात्पुरत्या युद्धविरामास मंजुरी दिल्यामुळे अमेरिकेने युक्रेनची खंडित केलेली मजत पुन्हा सुरू केली. मात्र अमेरिकेने रशियन आक्रमणाविरोधात सुरक्षा हमी द्यावी ही झेलेन्स्की यांची अट ट्रम्प यांनी मनावर घेतलेली नाही. 

कोणत्या मुद्द्यावर चर्चा फिस्कटू शकते?

रशियाकडून त्यांच्या ताब्यातील भूभागांवर आपले कायमस्वरूपी स्वामित्व राहील, अशी अट घातली जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ‘नेटो’ संघटनेमध्ये युक्रेनच्या समावेशाचा विचार अमेरिका आणि युरोपिय देशांनी सोडून द्यावा हीदेखील पुतिन यांची मुख्य अट राहील. दोन्ही अटी युक्रेनसाठी स्वीकारार्ह नाहीत. युक्रेनने त्या स्वीकारण्यास नकार दिला, तर चर्चेचा मार्ग बंद होऊ शकतो.   

Story img Loader