कॅनडाच्या सॉफ्टवूड लाकडावर ट्रम्प यांनी अतिरिक्त कर लादल्यामुळे अमेरिकेतील नागरिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. या लाकडावर अतिरिक्त कर लादल्याने पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम टॉयलेट पेपरच्या उत्पादनावर होणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडाच्या सॉफ्टवूड लाकडावरील शुल्क जवळजवळ दुप्पट करून २७% करण्याची योजना आखत आहे.
अतिरिक्त कर लादल्याने दर ५० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. नवीन कर धोरणामुळे टॉयलेट पेपर आणि पेपर टॉवेल तयार करण्यासाठी लागणाऱ्या नॉर्दर्न ब्लीच्ड सॉफ्टवूड क्राफ्ट पल्प (एनबीएसके) च्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. टॉयलेट पेपरसाठी अमेरिका कॅनडावर किती प्रमाणात अवलंबून आहे? या टंचाईचा काय परिणाम होणार? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
कॅनडातून टॉयलेट पेपर्सची आयात
अमेरिका नॉर्दर्न ब्लीच्ड सॉफ्टवूड क्राफ्ट पल्पने तयार ३० टक्के टॉयलेट पेपर आणि उर्वरित प्रमाणात पेपर टॉवेलचा वापर करते. सध्या हे पेपर्स प्रामुख्याने कॅनडामधून येतात, असे जागतिक पल्प मार्केटचा मागोवा घेणाऱ्या ‘टीटीओबीएमए’चे अध्यक्ष ब्रायन मॅकक्ले यांनी ‘द फायनान्शियल पोस्ट’ला सांगितले. कॅनडातील सर्वात मोठे टॉयलेट पेपर उत्पादक क्रुगर प्रोडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डिनो बियान्को यांनी स्पष्ट केले की, अमेरिका त्यांच्या टॉयलेट पेपरच्या सुमारे १०% आयात करते, त्यातील अर्धे पेपर्स कॅनडामधून आयात केले जातात.
अमेरिकेने गेल्या वर्षी सुमारे २० लाख टन कॅनडाचे एनबीएसके आयात केले. यातून चित्र स्पष्ट झाले की, अमेरिकेतील नागरिक कागदी वस्तूसाठी त्यांच्या उत्तरेकडील शेजारी राष्ट्रांकडून येणाऱ्या लगद्यावर अवलंबून आहेत. “अमेरिकेतील यापैकी काही गिरण्या, काही मोठ्या ब्रँडेड उत्पादनांना, केवळ कॅनडाचा सॉफ्टवूड लगदा हवा आहे. ते ३० वर्षांपासून हा पेपर तयार करण्यासाठी या लगद्याचा वापर करतात,” असे मॅकक्ले यांनी ‘द फायनान्शियल पोस्ट’ला सांगितले.
या टंचाईचा काय परिणाम होणार?
लाकूड आयात शुल्कात वाढ केल्याने लगदा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाची उपलब्धता कमी होईल आणि त्यामुळे काही लाकडाच्या गिरण्या बंद होतील. परिणामी उत्पादन कमी होईल आणि किमती वाढतील. २ एप्रिल रोजी कॅनेडियन आणि मेक्सिकन वस्तूंवर २५ टक्के कर लागू करण्यात येणार होता, मात्र ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय पुढे ढकलला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर ट्रम्प परदेशी वस्तूंवर परस्पर कर जाहीर करतील अशी शक्यता आहे. सर्व आयातीत वाहने, ट्रक आणि ऑटो पार्ट्सवर म्हणजेच अमेरिकन व्यवसायांनी कॅनडामध्ये उत्पादित केलेल्या वस्तूंवर २५ टक्के कर त्यांनी आधीच जाहीर केला आहे.
या वर्षी, कॅनडाच्या सॉफ्टवूड लाकडावरील १४ टक्के आयात कर सुमारे २७ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. कॅनडातून येणाऱ्या बहुतांश वस्तूंवर २५ टक्के कर लावल्यामुळे आणि लाकडाच्या आयातीवरील राष्ट्रीय सुरक्षा चौकशीमुळे शुल्कात वाढ होण्याची शक्यता आहे. ट्रम्प कायमच हे स्पष्ट करत आले आहेत की, टॅरिफमुळे अमेरिकन उत्पादन वाढण्यास मदत होईल. परंतु, उद्योग तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, कॅनेडियन सॉफ्टवूड लगद्याचे वेगळे फायदे आहेत, ज्याचा पर्याय शोधणे अमेरिकेसाठी कठीण आहे, असे ‘ब्लूमबर्ग’ने वृत्त दिले आहे, त्यामुळेच उत्पादकांसाठी उत्पादन खर्च वाढू शकतो आणि पुरवठ्याची कमतरता निर्माण होऊ शकते.
जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम?
नवीन शुल्कांमुळे लाकडाच्या गिरण्यांचा व्यवसाय संपुष्टात येण्याची शक्यताही वाढते. लाकडाच्या गिरण्यांसाठी असे बदल स्वीकारणे आव्हानात्मक ठरते. या गिरण्या एकत्र पूर्ण क्षमतेने चालतात किंवा पूर्णपणे बंद होतात, असे क्यूबेक वन उद्योग परिषदेचे प्रमुख जीन-फ्रँकोइस साम्रे यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, सॉफ्टवूड क्षेत्राच्या बाजारपेठेवेर याचा परिणाम होईल. या बाजारपेठा तात्पुरत्या बंद होतील, उत्पादन कमी होईल आणि याचाच परिणाम जगभरातील मागणीवर होईल.
अमेरिकेच्या या टॅरिफ युद्धादरम्यान, सध्या अमेरिका कॅनेडियन लाकडावर १४ टक्क्यांपेक्षा जास्त शुल्क लादत आहे. या वर्षी हा शुल्क वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एकूण दर २७ टक्क्यांच्या जवळ पोहोचेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितले की, कॅनडाच्या पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याशी संपर्क झाला. ट्रम्प यांनी नवीन लाकूड शुल्क कसे लागू करायचे याबद्दल अंतिम निर्णय स्पष्ट केला नाही. ट्रम्प म्हणाले की, ते कॅनडाच्या निवडणुकीनंतर २८ एप्रिलला कार्नी यांच्याशी भेटतील आणि राजकारण, व्यवसाय आणि इतर सर्व घटकांवर काम करण्याविषयी चर्चा करतील, ही भेट अमेरिका आणि कॅनडा अशा दोन्ही देशांसाठी फायद्याची ठरेल.”
२ एप्रिलपासून नवीन शुल्क होणार लागू
ट्रम्प प्रशासन २ एप्रिलपासून नवीन शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहे. २ एप्रिलला राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘मुक्ती दिन’ म्हणून घोषित केले आहे. अर्थशास्त्रज्ञ या निर्णयांना अमेरिका फर्स्ट ट्रेड पॉलिसीचा भाग मानतात. फर्स्ट ट्रेड पॉलिसी हा एक कार्यकारी आदेश आहे, या आदेशावर ट्रम्प यांनी त्यांचा पदभार स्वीकारल्यावर पहिल्याच दिवशी स्वाक्षरी केली होती. या आदेशाचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आहे.