अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना व्हाइट हाउसमधील ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांच्या उपस्थितीत दमदाटी केल्यामुळे सारे जग स्तिमित झाले. ज्या उद्देशाने झेलेन्स्की अमेरिकेत आले होते, तो सफल झाला नाहीच. उलट आता रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका युक्रेनला पुरवत असलेली मदत सरसकट थांबवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युक्रेन युद्धात संभाव्य शस्त्रविराम तसेच सद्यःस्थितीत युक्रेनचे रक्षण करण्याची जबाबदारी झेलेन्स्की आणि त्यांचे युरोपियन सहकारी यांच्यावरच येऊन पडली आहे.

काय घडले ओव्हल ऑफिसमध्ये?

झेलेन्स्की आणि ट्रम्प-व्हान्स पत्रकारांसमोर स्थानापन्न झाले आणि पत्रकार परिषदेस सुरुवात झाली, त्यावेळी सुरुवातीस ट्रम्प यांनी युक्रेन युद्धविरामाच्या प्रयत्नांना लवकर यश येईल असे सांगितले. झेलेन्स्की यांनीही काही प्रश्नांना उत्तरे दिली. पण कधी तरी, कुठे तरी या प्रश्नोत्तरादरम्यान झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात युक्रेन युद्धविराम आणि व्लादिमिर पुतिन या मुद्द्यांवर असलेले तीव्र मतभेद समोर येतील अशी शक्यता सतत दिसत होती. पण हे मतभेद ‘उकरून’ काढण्याचे काम उपाध्यक्ष व्हान्स यांनी केले. कोणत्या मुत्सद्देगिरीविषयी आपण बोलत आहात असे झेलेन्स्की यांनी व्हान्स यांना पुतिन यांच्यावरून छेडले. त्यावेळी तुमचा पवित्रा अनादरजनक असल्याचा थेट हल्ला व्हान्स यांनी चढवला. झेलेन्स्की स्वतःचा आणि युक्रेनचा बचाव करू लागले. आमच्यासारखी वेळ कधी तरी तुमच्यावरही येऊ शकते असे ते बोलले, त्यावर तोपर्यंत शांत बसलेले ट्रम्पही भडकले. तुम्ही अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहात हे विसरू नका. आम्ही नसतो तर दोन आठवड्यांत संपला असता. ट्रम्प आणि व्हान्स या दोघांनी आळीपाळीने झेलेन्स्की यांना दमदाटी केली. झेलेन्स्की यांनी योग्य ती उत्तर दिली, पण ते विचलित झालेले दिसले.

झेलेन्स्कींच्या भेटीचा उद्देश काय होता?

युक्रेनमधील खनिज समृद्ध प्रदेशात उत्खननाचा परवाना अमेरिकेला देणे आणि यांतील ५० टक्के खनिजांच्या बदल्यात अमेरिकेकडून सुरक्षा हमी मिळवणे हा झेलेन्स्की यांच्या भेटीचा मूळ उद्देश होता. अमेरिकेकडून शस्त्रास्त्रे मिळवत असताना, युद्धविरामाच्या दिशेने ठोस पावले उचलणे हे विषयदेखील भेटीच्या कार्यक्रमपत्रिकेवर होते. ट्रम्प हे सातत्याने पुतिन यांची बाजू घेताना युक्रेनलाच युद्धाबद्दल जबाबदार धरू लागले होते. त्याबद्दल थेट भेट घेऊन त्यांचे शंकानिरसन करण्याचाही झेलेन्स्की यांचा हेतू होता. पण घडले भलतेच.

दमदाटी पूर्वनियोजित?

या भेटीची दृश्ये अनेकदा पाहिल्यानंतर एक शक्यता उभी राहते. ती म्हणजे, झेलेन्स्की यांना दमदाटी करणे आणि त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडण्याचे डावपेच पूर्वनियोजित असावे. या प्रकरणी उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पुढाकार घेतला. कारण त्यांनीच पहिल्यांदा झेलेन्स्की यांना चिथावणी दिली आणि त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सापळ्यात झेलेन्स्की अलगद सापडले असे अनेक विश्लेषकांचे मत पडले. झेलेन्स्की यांनी गतवर्षी पेनसिल्वेनिया राज्यातील एका दारूगोळा कारखान्याला दिलेल्या भेटीचा मुद्दा व्हान्स यांनी उकरून काढला. ही भेट ‘आमच्या विरोधकांच्या सांगण्यावरून’ तुम्ही दिलीत असे व्हान्स म्हणाले तेव्हा त्यांचा रोख आधीच्या जो बायडेन प्रशासनाकडे होता. झेलेन्स्की यांनी अनेकदा ‘थँक यू’ म्हणूनही तसे तुम्ही का म्हणत नाही, अशी विचारणा व्हान्स करत राहिले.

झेलेन्स्की यांची मुत्सद्देगिरी कमी पडली?

झेलेन्स्की यांच्या आधी फ्रान्सचे अध्यक्ष इमान्युएल माक्राँ आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटींदरम्यानही ट्रम्प आणि व्हान्स यांनी वस्तुस्थितीशी प्रतारणा करणारी विधाने केली त्यावेळी माक्राँ आणि स्टार्मर यांनी नम्रपणे आणि खेळीमेळीत त्यांचे म्हणणे दुरुस्त केले. हे करताना कुठेही ट्रम्प-व्हान्स यांना प्रतिहल्ल्याची संधी वा चिथावणी मिळणार नाही याची खबरदारी घेतली. झेलेन्स्की हे जरा भावनेच्या आहारी गेले आणि अमेरिकेलाही भविष्यात धोका आहे असे बोलून गेले. युद्धविरामाच्या बाबतीत त्यांनी अधिक सावधगिरीने बोलायला हवे होते. मध्यंतरी जॉर्डनचे राजे अब्दुल्ला ट्रम्प यांना भेटायला गेले, त्यावेळी गाझातील पॅलेस्टिनींना जॉर्डन स्वीकारेल असे विधान ट्रम्प यांनी परस्पर करून टाकले. राजे अब्दुल्ला त्यावेळी काही बोलले नाहीत. पण मायदेशी परतल्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ट्रम्प यांचे म्हणणे रीतसर खोडून काढताना, गाझातील पॅलेस्टिनींच्या विस्थापनाचा प्रश्नच उद्भवत नाही असेही स्पष्ट केले. ती चतुराई आणि प्रसंगावधान झेलेन्स्की यांना दाखवता आले नाही.

झेलेन्स्की यांचे स्थान डळमळीत

अमेरिका भेट सपशेल फसली असा आरोप झेलेन्स्की यांचे युक्रेनमधील आणि युक्रेनबाहेरील विरोधक करू शकतात. तीन वर्षे सुरू असलेल्या युद्धाचा अंत दृष्टिपथात नाही, विजयाची अजिबात संधी नाही, प्रतिकार क्षीण होत चालला आहे. अशा परिस्थितीत युद्धविरामाची आणि अमेरिकेच्या वाढीव मदतीची एकमेव संधी झेलेन्स्की यांनी दवडली असा प्रचार त्यांचे देशांतर्गत विरोधक करू शकतात. झेलेन्स्की यांना राजीनामा देण्यास किंवा निवडणुका घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. पण याने युक्रेन अधिक अस्थैर्यात फेकला जाऊ शकतो.

अमेरिका युक्रेनची साथ सोडणार?

ती शक्यता दाट आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यासाठी चर्चेचा मार्ग पूर्ण बंद केलेला नाही. तरीदेखील अशी चर्चा म्हणजे आपल्याला हवे तेच करवून घेणे ही साधी स्पष्ट ट्रम्पनीती आहे. जैसे थे परिस्थितीत युद्धविराम करावा, रशियाव्याप्त युक्रेन रशियाकडेच राहावा, युद्ध संपल्यानंतर त्या देशातील मूल्यवान आणि दुर्मिळ खनिजांच्या उत्खननाचा परवाना अमेरिकेला मिळावा अशीच अमेरिकेची भूमिका राहील. पण या बद्दल्यात युद्धोत्तर सुरक्षा हमी अमेरिकेकडून मिळणार का, याविषयी ट्रम्प काहीच बोलत नाहीत. कारण दुसऱ्याची युद्धे लढण्यासाठी आमचे सैनिक पाठवणार नाही ही त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. सुरक्षा हमीच्या अनुपस्थितीत ट्रम्प यांचा प्रस्ताव झेलेन्स्कींकडून मान्य होण्याची शक्यताच नाही. झेलेन्स्की यांनी भेटीनंतर काही तासांमध्येच ट्रम्प, अमेरिका यांचे वारंवार आभार मानले. पण ट्रम्प यांच्या अटी मानून युक्रेनला ते वाऱ्यावर सोडतील हे संभवत नाही.

Story img Loader