Trump want Ukraine rare earth elements अमेरिकेने आतापर्यंत रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि लष्करी मदत दिली आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वातील प्रशासनाने यूक्रेनला मोठ्या प्रमाणात सहाय्य पुरवले आहे. मात्र, आता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात लष्करी मदत सुरू ठेवण्याच्या बदल्यात युक्रेनमधील दुर्मीळ खनिजांच्याबाबत युक्रेनशी करार करण्याची ऑफर दिली आहे. या खनिजांचा वापर अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी केला जाऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, ते अमेरिकेच्या पाठिंब्याच्या बदल्यात यूक्रेनमधील दुर्मीळ पृथ्वी संसाधनांवर हक्क मिळवण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसमोर करार करण्याची इच्छादेखील व्यक्त केली आहे. “आम्ही ज्या प्रदेशावर नियंत्रण ठेवतो, त्या प्रदेशात आमच्याकडे खरोखरच ही मोठी क्षमता आहे. आम्हाला आमच्या भागीदारांबरोबर, सर्वप्रथम अमेरिकेबरोबर काम करण्यास आणि संबंध विकसित करण्यात स्वारस्य आहे,”असे युक्रेनियन अध्यक्षांचे मुख्य कर्मचारी आंद्री येरमाक यांनी ‘एपी’ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे युक्रेन अशा करारासाठी होकार देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुर्मीळ खनिजे म्हणजे नक्की काय? त्यांचा वापर कशासाठी होतो? ट्रम्प यांना ही खनिजे का हवी आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
दुर्मीळ खनिजे म्हणजे काय?
पृथ्वीवरील दुर्मीळ खनिजांमध्ये १७ खनिजांचा समावेश आहे, ज्याचा वापर सेल फोन, हार्ड ड्राइव्ह आणि इलेक्ट्रिक व हायब्रिड वाहनांसह अनेक प्रकारच्या ग्राहक तंत्रज्ञानामध्ये आवश्यक असतो. ट्रम्प हे दुर्मीळ हा शब्द सर्व प्रकारच्या खनिजांसाठी वापरत होते की फक्त दुर्मीळ खनिजांसाठी वापरत होते हे स्पष्ट झाले नाही. यात लिथियम, टायटॅनियम, युरेनियम आणि इतर अनेक खनिजांचा समावेश असू शकतो, असे आंद्री येरमाक म्हणाले. चीन, ट्रम्प यांचा प्रमुख भू-राजकीय शत्रू आणि जगातील दुर्मीळ पृथ्वी घटकांचा सर्वात मोठा उत्पादक आहे. अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशांनी चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक स्तरावर दुर्मीळ खनिजांपर्यंत प्रवेश मिळणे कठीण होत आहे. अशातच ट्रम्प यांनी या कराराची इच्छा व्यक्त केली आहे.
युक्रेनियन खनिज उद्योगाची स्थिती काय आहे?
युक्रेनचे दुर्मीळ पृथ्वी खनिजे युद्धामुळे आणि खनिज उद्योगाचे नियमन करणाऱ्या राज्याच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात वापरात नाहीत. दुर्मीळ खनिजांच्या खाणकामाच्या विकासासाठी मार्गदर्शन करण्यासाठी देशात योग्य सुविधादेखील नाही. भूगर्भीय डेटा फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे, कारण खनिज साठे युक्रेनमध्ये विखुरलेले आहेत आणि याचा सध्या उपलब्ध असलेला अभ्यास मोठ्या प्रमाणात अपुरा मानला जातो. उद्योगपती आणि विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार उद्योगाची खरी क्षमता अपुऱ्या संशोधनामुळे मागे पडली आहे.
युक्रेनियन नैसर्गिक संसाधनांचा दृष्टिकोन आशादायक आहे. देशाचा टायटॅनियमचा साठा, एरोस्पेस, वैद्यकीय आणि ऑटोमोटिव्ह उद्योगांसाठी एक महत्त्वाचा घटक आहे, जो युरोपमधील सर्वात मोठे असल्याचे मानले जाते. युक्रेनमध्ये लिथियमचे युरोपमधील सर्वात मोठे साठे आहेत, याचा उपयोग बॅटरी, सिरॅमिक्स आणि काच तयार करण्यासाठी आवश्यक आहे. २०२१ मध्ये युक्रेनियन खनिज उद्योगाचा देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात ६.१ टक्के आणि निर्यातीत ३० टक्के वाटा होता.
कीव येथील थिंक टँक वी बिल्ड युक्रेनच्या डेटानुसार, युक्रेनमधील अंदाजे ४० टक्के धातू खनिज संसाधने रशियन व्यापामुळे दुर्गम आहेत. युरोपियन कमिशनने युक्रेनला २० पेक्षा जास्त दुर्मीळ कच्च्या मालासाठी संभाव्य पुरवठादार मानले आहे आणि असा निष्कर्ष काढला की, देशाचा युरोपियन युनियनमध्ये प्रवेश केल्याने युरोपियन अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते.
करार होण्याची शक्यता किती?
अमेरिका आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांमधील बैठकांमध्ये कराराचा तपशील विकसित होण्याची शक्यता आहे. झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची भेट झाल्यास कदाचित या विषयावर चर्चा करतील. युक्रेनच्या व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन कंपन्यांनी यात स्वारस्य व्यक्त केले आहे. परंतु, औपचारिक करार करण्यासाठी कायदे, भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि विशिष्ट अटींच्या वाटाघाटी करणे आवश्यक असतील. युक्रेनमध्ये काम करण्याची जोखीम पत्करण्यासाठी कंपन्यांना कोणत्या प्रकारच्या सुरक्षेची हमी द्यावी लागेल हे अद्याप अस्पष्ट आहे, अगदी युद्धबंदीच्या परिस्थितीतही. युक्रेन आणि अमेरिकन कंपन्या कोणत्या प्रकारचे वित्तपुरवठा करार करतील, हेदेखील अद्याप अस्पष्ट आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी सांगितले होते की, युक्रेनमधील संघर्ष संपवण्यासाठी चर्चा सुरू आहे आणि आम्ही लवकरच युद्ध संपवू. युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने युक्रेनला सुमारे ६३ अब्ज डॉलर्स (५.४५ लाख कोटी रुपये) ची मदत दिली आहे. त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध एका दिवसात संपवण्याबद्दलही एक वक्तव्य केले होते.
© IE Online Media Services (P) Ltd