Indian mountaineers Arunachal Pradesh: चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशावरून वादंग निर्माण केला आहे. भारतीय गिर्यारोहक पथकाने अरुणाचल प्रदेशातील एका अज्ञात शिखराला सहाव्या दलाई लामांचे नाव दिल्याबद्दल बिजिंगने आक्षेप घेतला आहे. चीनने अरुणाचल प्रदेशावर पुन्हा आपला दावा सांगितला आहे. भारतीय गिर्यारोहक पथकाने चीनच्या अखत्यारीतील भू-भागावर अवैध मार्गाने अतिक्रमण केल्याचा आरोप चीनकडून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके घडले तरी काय?

गेल्या आठवड्यात, संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहस क्रीडा संस्थेच्या (National Institute of Mountaineering and Adventure Sports -NIMAS) १५ सदस्यीय पथकाने अरुणाचल प्रदेशातील एका अज्ञात शिखरावर चढाई केली. NIMAS चे संचालक कर्नल रणवीर सिंग जामवाल यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने १५ दिवसांत गोरिचेन श्रेणीतील २०,९४२ फूट उंच शिखर पार केले. त्यांनी या शिखराला त्संगयांग ग्यात्सो शिखर असे नाव दिले. हे नाव १६८२ साली तवांग येथे जन्मलेल्या सहाव्या दलाई लामांच्या नावावरून देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या दलाई लामांच्या कालातीत ज्ञानाचा आणि मोंपा समाजासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान म्हणून या शिखराला हे नाव देण्यात आले आहे.

अधिक वाचा: Mumbai’s first encounter: मुंबईतील पहिलं एन्काऊंटर मन्या सुर्वे, नेमकं काय घडलं होतं?

आव्हानात्मक शिखर

संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एम. रावत यांनी सांगितले की, हे शिखर या प्रदेशातील तांत्रिकदृष्ट्या सर्वात आव्हानात्मक शिखरांपैकी एक आहे. त्यांनी नमूद केले की, पथकाने “मोठ्या बर्फाच्या भिंती, धोकादायक दऱ्या आणि दोन किलोमीटर लांब हिमनदी” अशा अनेक आव्हानांचा सामना केला. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी या कामगिरीबद्दल NIMAS पथकाचे अभिनंदन केले आहे. “संचालक रणवीर जामवाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अरुणाचल प्रदेशातील मोन तवांग प्रदेशातील गोरिचेन मासिफमधील एका अज्ञात शिखरावर यशस्वीरित्या चढाई केली आहे, हे शिखर ६,३८३ मीटर उंच आहे!” त्यांनी यासंदर्भात माहिती देणारी पोस्ट २५ सप्टेंबर रोजी केली होती.

चीनची नेमकी प्रतिक्रिया काय ?

२६ सप्टेंबर रोजी, चीनने अरुणाचल प्रदेशातील शिखराला दिलेल्या नावाला आपला विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी त्यांना याबद्दल माहीत नसल्याचे त्सांगितले. मात्र, अरुणाचल प्रदेश, ज्याला बीजिंग ‘झांगनान’ म्हणून संबोधते, तो “चिनी प्रदेश” आहे असेही ते म्हणाले. बीजिंगमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “भारताने तथाकथित “अरुणाचल प्रदेश” ची स्थापना चिनी प्रदेशात करणे बेकायदेशीर आहे. चीन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

अरुणाचल प्रदेशावरून भारत-चीन तणाव-India-China border conflict

बीजिंगने अरुणाचल प्रदेश या संपूर्ण राज्यावर दावा केला आहे. ते या प्रदेशाला ‘झांगनान’, तिबेटचा दक्षिणेकडील भाग म्हणून संबोधतात आणि तो चीनचा अविभाज्य भाग आहे असे सांगतात. चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग म्हणून दर्शवला जातो. २०१७ पासून बीजिंगने अरुणाचल प्रदेशातील स्थळांना नवीन नावे देण्यास सुरुवात केली आहे. भारताने नेहमीच अरुणाचल प्रदेशावरचे चिनी दावे फेटाळले आहेत. गेल्या वर्षी चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ स्थानांची नावे बदलल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) ‘अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, नवीन नावे देण्याचे प्रयत्न हे वास्तव बदलू शकणार नाहीत असे सडेतोड उत्तर दिले होते. चीन प्रत्येक वेळी अरुणाचल प्रदेशाला कोणत्याही भारतीय नेत्यांनी भेट दिल्यास नाराजी व्यक्त करतो. या वर्षाच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अरुणाचल प्रदेश भेटीवर बीजिंगच्या आक्षेपांना नवी दिल्लीनं फेटाळून लावलं होतं. मोदी यांच्या भेटीनंतर, अमेरिकेने अरुणाचल प्रदेशाला भारतीय प्रदेश म्हणून मान्यता दिली, त्यामुळे चीनने संताप व्यक्त केला आणि त्ंयाच्या भौगोलिक हितसंबंधांसाठी इतर देशांच्या विवादांचा फायदा घेतल्याचा आरोप अमेरिकेवर केला.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनी तिरुपती बालाजीचे घेतले होते दर्शन; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

दलाई लामांमुळे चीन अस्वस्थ का होतो?

अरुणाचल प्रदेशातील शिखराला भारतीय गिर्याहरोहकांनी जे नाव दिल ते केवळ चीनच्या अरुणाचल प्रदेशावरील दाव्यांना फेटाळून लावणारे नव्हते. तर सहाव्या दलाई लामांच्या नामकरणाने चीनच्या दुखऱ्या नसेवर भारताने बोट ठेवले आहे. १९५० साली चीनने आक्रमण करण्यापूर्वी तिबेट हे एक स्वतंत्र राष्ट्र होते. ज्याला स्वतःची वेगळी संस्कृती, भाषा, आणि धर्म होता. दलाई लामा हे तिबेटचे आध्यात्मिक नेते आहेत.

चीनने १९५१ साली तिबेटवर कब्जा केला आणि तेव्हापासून या प्रदेशावर नियंत्रण ठेवले आहे.

१४ वे दलाई लामा तेनझिन ग्यात्सो यांनी तिबेटमध्ये चिनी शासनाला विरोध केला होता… चीनच्या सैन्याने तिबेटी उठाव दडपला. त्यानंतर १९५९ साली तेनझिन ग्यात्सो यांना तिबेट सोडण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. तेव्हापासून ते भारतात वास्तव्य करीत आहेत. दलाई लामांनी निर्वासित म्हणून धरमशाला येथे राहून तिबेटच्या स्वायत्ततेची मागणी केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी पूर्वी दलाई लामांना “भिक्षूंच्या कपड्यातील लांडगा” म्हणून हिणवले होते, दलाई लामा सांगतात की, ते फक्त तिबेटी लोकांना त्यांची संस्कृती, भाषा आणि धर्माचे पालन करण्याची परवानगी देणारी स्वायत्तता मागत आहेत. बीजिंग त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यांना विभाजनवादी मानते. चीन नियमितपणे तिबेटी आध्यात्मिक नेत्यांच्या जागतिक नेत्यांबरोबरच्या बैठकींना विरोध करतो. सीएनएनने दिलेल्या बातमीनुसार बीजिंग तिबेटवरच्या सर्व दाव्यांना आव्हान देते.

चीन पुढील दलाई लामांची निवड करण्यास इच्छुक आहे.

चीन सरकारला त्यांच्या मताशी सहमत होणाऱ्या दलाई लामांची नियुक्ती करायची आहे, असे मत अमिताभ माथुर (भारत सरकारचे तिबेटीयन व्यवहारांवरील माजी सल्लागार) यांनी २०२१ साली ‘द गार्डियन’ कडे व्यक्त केले होते. भविष्यात दोन दलाई लामा असल्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञ सांगतात. एक म्हणजे स्वतः दलाई लामांनी नियुक्त केलेला आणि दुसरा म्हणजे दुसरा चीनने निवडलेला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tsangyang gyatso peak naming china angers over naming peak in arunachal pradesh after dalai lama what is the real issue svs