ब्रिटनमधील लेबर पार्टी सरकारच्या एका मंत्र्याचे नाव बांगलादेशमधील भ्रष्टाचार प्रकरणात समोर आले आहे. बांगलादेशी अधिकाऱ्यांनी बांगलादेशातील घोटाळ्याच्या आरोपांची चौकशी सुरू केली. या प्रकरणात ब्रिटनच्या कामगारमंत्री ट्युलिप सिद्दीक यांचे नाव समोर आले आहे. त्या बांगलादेशच्या अलीकडेच पदच्युत झालेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भाची आहेत. त्यांच्यावर अणुऊर्जा सुविधेसह आठ मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आरक्षित ५.२ अब्ज डॉलर्स वळवण्यात मदत केल्याचा आरोप आहे. हसीना यांच्या प्रकरणाचा तपास सुरू असताना हा दावा बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाने (एसीसी) केला आहे. कोण आहेत ट्युलिप सिद्दीक? बांगलादेशमधील घोटाळा प्रकरण काय आहे? नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊ…
कोण आहेत ट्युलिप सिद्दीक?
ट्युलिप सिद्दीक या बांगलादेशच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या शेख हसीना यांच्या भाची आहेत. सध्या ट्युलिप सिद्दीक ट्रेझरीच्या इकॉनॉमिक सेक्रेटरी म्हणून काम करीत आहेत. सिद्दीक यांचे नाव ब्रिटनच्या आर्थिक बाजारपेठेतील भ्रष्टाचारातही समोर आले होते. जुलैमध्ये मजूर पक्षाच्या विजयानंतर त्यांची ब्रिटनच्या आर्थिक सेवा क्षेत्रावर देखरेख करण्यासाठी भ्रष्टाचारविरोधी मंत्री व शहर मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे वडील ढाका येथील विद्यापीठाचे प्राध्यापक होते आणि त्यांची आई शेख हसीना यांची धाकटी बहीण यांना ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय देण्यात आला होता, असे ‘बीबीसी’च्या एका वृत्तात म्हटले आहे. सिद्दीक यांचे पालक त्यांची तीन मुले म्हणजेच सिद्दीक, मोठा भाऊ व तिची धाकटी बहीण यांच्यासह हॅम्पस्टेडमध्ये स्थायिक झाले.
हेही वाचा : १० वर्षांनंतर उलगडणार २३९ प्रवाशांसह बेपत्ता झालेल्या विमानाचे गूढ? नेमके प्रकरण काय?
सिद्दीक या मुस्लीम कुटुंबात वाढल्या; पण त्यांचे कुटुंब बहुसांस्कृतिक ब्रिटनमधील ज्यू समुदायात सहभागी झाले. त्यांचे आजोबा शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती होते. १९७५ मध्ये एका लष्करी उठावामुळे त्यांच्या कुटुंबासह त्यांची हत्या झाली. सिद्दीक यांची आई आणि काकू त्या वेळी देशाबाहेर असल्याने त्या बचावल्या. लहानपणी सिद्दीक नेल्सन मंडेला, बिल क्लिंटन व मदर तेरेसा यांसारख्या प्रमुख नेत्यांना भेटल्या आणि त्यांच्या कुटुंबाला व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले गेले. वयाच्या १६ व्या वर्षी त्या लेबर पार्टीमध्ये सामील झाला.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, त्या माजी कॅबिनेट मंत्री बार्बरा कॅसल यांना त्यांची राजकीय प्रेरणा मानतात. त्यांची आई व मावशी यांचे वर्णन त्या ‘दोन अतिशय मजबूत स्त्रीवादी व्यक्ती’ असे करतात. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी इंटरनॅशनल सेव्ह द चिल्ड्रन आणि ग्रेटर लंडन अथॉरिटी यांसारख्या संस्थांबरोबर काम केले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला उत्तर लंडनमधील कॅमडेन येथे काउन्सिलर म्हणून सुरुवात केली. जेव्हा ग्लेंडा जॅक्सन या ऑस्कर विजेत्या अभिनेत्री खासदार झाल्या आणि जेव्हा त्यांनी निवृत्तीची घोषणा केली तेव्हा सिद्दीक यांची हॅम्पस्टेड आणि किलबर्न मतदारसंघासाठी लेबर उमेदवार म्हणून निवड झाली. २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या सिद्दीक या ३६ लेबर खासदारांपैकी एक होत्या, ज्यांनी जेरेमी कॉर्बिन यांना पक्षाच्या नेत्या म्हणून नामांकित केले होते. त्यांनी २०१७, २०१९ व २०२४ मध्ये निवडणुका जिंकल्या आणि प्रत्येक वेळी त्यांचे बहुमत वाढवले. २०१६ मध्ये त्यांना शिक्षणमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले; परंतु ब्रेक्झिटला विरोध करण्यासाठी तीन महिन्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला.
विशेष बाब म्हणजे जवळजवळ सहा वर्षे इराणमध्ये बंदिस्त असलेल्या ब्रिटिश-इराणी नागरिक नाझानिन झाघारी-रॅटक्लिफ यांना मुक्त करण्याच्या मोहिमेसाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. २०२१ पासून त्यांनी आर्थिक सेवा क्षेत्रासाठी लेबरच्या धोरण विकासाचे नेतृत्व केले आहे. २०१३ मध्ये विवाहित सिद्दीक यांनी २०१९ मध्ये इतिहास रचला, जेव्हा त्या दुसऱ्या मुलाला जन्म देण्याच्या दोन दिवस आधी व्हीलचेअरवर मतदानासाठी आल्या आणि त्या प्रॉक्सीद्वारे मतदान करणाऱ्या पहिल्या खासदार ठरल्या.
भ्रष्टाचाराच्या चौकशीत त्यांचे नाव का आले?
बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाकडून (एसीसी) सिद्दीक यांची रशियन सरकारी मालकीची कंपनी रोसाटॉमच्या अणु कराराशी संबंधित आरोपांबद्दल चौकशी केली जात आहे. ‘डेली मेल’ने वृत्त दिले आहे की, सिद्दीक यांनी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी २०१३ मध्ये सिद्दीक, शेख हसीना व रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. उल्लेखनीय बाब म्हणजे एसीसी सिद्दीक यांच्या कुटुंबातील सदस्यांवरील आरोपांची तपासणी करण्यात येत आहे, ज्यात त्यांचे मामा सजीब वाझेद जॉय, अमेरिकेत राहणारे त्यांचे मामा तारिक सिद्दीक, अशा तीनही व्यक्तींची नावे आहेत. शेख हसीना यांच्या पक्षाच्या अवामी लीगचे यूके सरचिटणीस सय्यद फारूक यांनी हे आरोप १०० टक्के राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. सिद्दीक यांचा कौटुंबिक मित्र फारूक यांनी डेली मेलला सांगितले, “ते ट्युलिपवर हल्ला करीत आहेत. कारण- त्या आमच्या माननीय पंतप्रधान शेख हसीना यांच्या भाची आहेत.”
दरम्यान, कन्झर्व्हेटिव्ह शॅडो होम ऑफिस मंत्री मॅट विकर्स म्हणाले, “कामगारांचे भ्रष्टाचारविरोधी मंत्री भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आहेत ही वस्तुस्थिती कीर स्टार्मरच्या निर्णयावरील नवीन डाग आहे. हिंसक सरकारविरोधी निदर्शनांनंतर ऑगस्टमध्ये पदच्युत करण्यात आलेल्या शेख हसीना सध्या भारतात आहेत. २० वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या त्यांच्या सरकारला टीकेचा सामना करावा लागला. नवीन बांगलादेशी प्रशासनाने हसीना यांच्यावर गुन्ह्यांचे आरोप केले आहेत; ज्यात शेकडो मारल्या गेलेल्या निषेधांशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता का? त्यावर उपाय काय?
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सिद्दीक यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. सिद्दीक या भ्रष्टाचारविरोधी प्रयत्नांवर देखरेख ठेवण्याची त्यांची भूमिका सुरू ठेवतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सिद्दीक यांनी, या दाव्यांमध्ये त्यांचा कोणताही सहभाग नाकारला आहे, असे अधिकृत प्रवक्त्याने ब्रिटिश प्रसारकाला सांगितले. प्रकल्पाला बदनाम करण्याचा प्रयत्न म्हणून प्रसारमाध्यमांमधील ही खोटी विधाने असल्याचे आम्ही मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.