अमोल परांजपे

गेली १० वर्षे तुर्कस्तानचे अध्यक्ष असलेले रेसेप तय्यीप एर्दोगन यांना प्रथमच कठीण निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. पुराणमतवादी असलेल्या एर्दोगन यांच्यासमोर धर्मनिरपेक्षतावादी विरोधकांच्या आघाडीने आव्हान उभे केले आहे. १४ मे रोजी अध्यक्षपद तसेच तुर्कस्तानच्या प्रतिनिधिगृहासाठी सार्वत्रिक मतदान होत असताना त्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीचे निकाल हे युरोप आणि जगाच्या राजकारणावर परिणाम करू शकतात.

Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Gopal Shetty Take back From Election
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची माघार, देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी, बोरीवलीतलं बंड शमवण्यात भाजपाला यश
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
close race between Kamala Harris and Donald Trump in US election 2024
अमेरिकेत अध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात अभूतपूर्व चुरस! अधिक मते मिळूनही होऊ शकतो पराभव?
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
Anil Deshmukh
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर
Devendra Fadnavis reaction on raj Thackeray CM statement
Devendra Fadnavis: “भाजपाचं सरकार येणार नाही…”, राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

तुर्कस्तानमधील निवडणुकीचे स्वरूप कसे आहे?

१४ मे रोजी राष्ट्राध्यक्ष निवडून देण्यासाठी तुर्कस्तानची जनता मतदान करेल. त्याचबरोबर ‘ग्रँड नॅशनल असेंब्ली ऑफ टर्की’ या कायदेमंडळातील ६०० सदस्यही निवडले जातील. अध्यक्षपदाच्या शर्यतीत एर्दोगन यांच्यासह चार उमेदवार आहेत. होमलँड पार्टीचे संस्थापक मुहर्रम इंचे, रिपब्लिकन पीपल्स पार्टीचे नेते केमाल क्लुचदारोलो आणि अतिउजव्या नॅशनलिस्ट मूव्हमेंट पार्टीचे सिनान ओगान या तिघांचे जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टी (एके पार्टी) पक्षाच्या एर्दोगन यांना आव्हान आहे. या चार पक्षांसह एकूण २४ पक्ष ही निवडणूक लढवत असून त्यातील काही समविचारी पक्षांनी आघाड्याही केल्या आहेत.

एर्दोगन यांच्यासमोरील आव्हाने कोणती?

२०१४पासून तुर्कस्तानचे अध्यक्ष असलेल्या एर्दोगन यांची लोकप्रियता सध्या सर्वात किमान पातळीवर असल्याचे मानले जाते. २०१७मध्ये तुर्कस्तानने सार्वमताद्वारे घटनादुरुस्ती करून संसदीय लोकशाहीऐवजी अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार केला. त्यानंतर २०१८मध्ये झालेल्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत जनतेने एर्दोगन यांना पुन्हा निवडून दिले. मात्र आता त्यांची लोकप्रियता ओसरली आहे. यासाठी सर्वात मोठे कारण म्हणजे महागाई… व्याज दरवाढ न करण्याच्या एर्दोगन यांच्या धोरणामुळे महागाई २४ वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८५ टक्के चलनफुगवट्यामुळे जनता हैराण आहे. त्यातच ६ फेब्रुवारीच्या प्रलयंकारी भूकंपानंतर परिस्थिती हाताळण्यात यंत्रणांना आलेले अपयश, ही बाबही एर्दोगन यांच्याविरोधात जाणारी आहे. याखेरीज त्यांच्या सरकारमधील मतभेद, जनतेच्या हक्कांची पायमल्ली, न्याययंत्रणेवर आवश्यकतेपेक्षा जास्त नियंत्रण या गोष्टीही विद्यमान अध्यक्षांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. सीरियातील बशर अल असाद यांची सत्ता उलथविण्यात एर्दोगन यांना आलेले अपयश, सीरियातून आलेल्या ३६ लाख शरणार्थींचा अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण यामुळेही तुर्की मतदार नाराज आहे.

विरोधी पक्षांना विजयाची संधी किती?

ताज्या जनमत चाचणीच्या आकडेवारीनुसार केमाल क्लुचदारोलो हे एर्दोगन यांच्या किंचित पुढे असल्याचे दिसून आले आहे. भूकंपानंतर तुर्की प्रशासनापेक्षा परदेशी संस्था आणि यंत्रणांनीच अधिक चांगले काम केल्याचा आरोप झाला असला तरी एर्दोगन यांनी आपली लोकप्रियता पूर्णत: गमावलेली नाही, हेदेखील खरे. दोन मुख्य विरोधी पक्ष रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) आणि मध्यम-उजवा राष्ट्रवादी पक्ष गुड पार्टी (आयवायआय) यांच्यासह चार छोटे पक्ष आघाडी करून निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी मध्यवर्ती बँकेला धोरणस्वातंत्र्य बहाल करून एर्दोगन यांची मागास आर्थिक धोरणे बदलण्याचे आश्वासन दिले आहे. लोकसंख्येच्या १५ टक्के असलेले कुर्द मतदार कुणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, यावर निकाल अवलंबून असल्याचे मानले जाते. कुर्द समाजाचा पाठिंबा असलेला पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष मुख्य विरोधी आघाडीचा सदस्य नाही. मात्र हा पक्ष एर्दोगन यांचा कट्टर विरोधक आहे.

युरोप आणि जगाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची का?

एर्दोगन यांनी आपल्या कार्यकाळात पश्चिम आशियामध्ये आपली लष्करी ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सीरियामध्ये चार लष्करी मोहिमा राबविल्या. इराकमधील कुर्द अतिरेक्यांविरोधात कारवाई केली. लिबिया आणि अझरबैजानला लष्करी मदतही दिली. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इस्रायल यांच्याशी तुर्कस्तानचे राजनैतिक संबंध तितकेसे चांगले नाहीत. दुसरीकडे पाश्चिमात्य देशांचा सध्याचा नंबर १चा शत्रू असलेल्या पुतिन यांच्याशी एर्दोगन यांचे चांगले संबंध आहेत. अर्थात, त्यांच्या याच संंबंधांमुळे युक्रेनमधील गव्हाच्या निर्यातीचा करार अस्तित्वात येऊ शकला आहे. स्वीडन आणि फिनलंडच्या नाटो प्रवेशाला तुर्कस्तानने केलेला विरोधही तणाव वाढविणारा ठरला आहे. दुसरीकडे क्लुचदारोलो यांच्या विरोधी आघाडीने मात्र सत्तेत आल्यास पाश्चिमात्य देश आणि विशेषत: अमेरिकेसोबत संबंध सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे युरोप आणि आशियाच्या सीमेवर असलेल्या तुर्कस्तानमध्ये सत्तांतर झाले, तर त्याचा सगळ्या जगाची डोकेदुखी वाढविणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच एर्दोगन राहतात की जातात, हा प्रश्न सध्या कळीचा बनला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत जगाला या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल.

amol.paranjpe@expressindia.com