उत्तर प्रदेशमधील राजकारणी आणि कुप्रसिद्ध गुन्हेगार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांना पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना १५ एप्रिलच्या रात्री काही गुंडांनी गोळ्या घालून दोघांची हत्या केली. बसपा आमदार राजू पाल आणि साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्या प्रकरणासह शेकडो फौजदारी गुन्हे या दोन भावांवर दाखल होते. वैद्यकीय तपासणीला घेऊन जात असताना अतिक अहमद माध्यमांशी संवाद साधत होता, या वेळी कॅमेऱ्यासमोरच मारेकऱ्यांनी दोघांवरही गोळ्या झाडल्या. या मारेकऱ्यांकडे भारतात बंदी असलेले जिगाना (Zigana) पिस्तूल आढळून आले आहे. टर्किश बनावटीचे हे पिस्तूल काळ्या बाजारात सहा लाखांना मिळते. ज्याची तस्करी पाकिस्तानमधून भारतात होत असते.
विशेष म्हणजे १३ एप्रिल रोजी अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा जवळचा साथीदार गुलाम हे दोघेही यूपी पोलिसांच्या चकमकीत ठार झाले होते. तेव्हा त्यांच्याजवळ ब्रिटिश बुल डॉग (British Bull Dog) आणि वॉल्थर पी८८ (Walther P88) या दोन बंदुका आढळून आल्या होत्या. या दोन्ही बंदुकादेखील विदेशी बनावटीच्या असून त्या भारतात अधिकृतपणे मिळत नाहीत. मग गुन्हेगारांकडे इतकी अत्याधुनिक शस्त्रे येतात तरी कुठून?
जिगाना (Zigana) पिस्तूलची वैशिष्ट्ये?
जिगाना एक सेमी ऑटोमेटिक पिस्तूल आहे, ज्याची निर्मिती टर्किश शस्त्रउत्पादन कंपनी टीसासने (Tisas) केली आहे. २००१ साली या पिस्तूलची निर्मिती करण्यात आली. या पिस्तूलची १६ वेगवेगळी मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. पिस्तूलच्या सुरक्षेसाठी ऑटोमेटिक फायरिंग पिन ब्लॉक दिलेला आहे. आशियातील अनेक देशांतील गँगस्टरांसह चार देशांमधील पोलीस आणि सैन्य या पिस्तूलचा अधिकृत वापर करत आहेत. मलेशिया, टर्की आणि फिलिपिन्स या देशांत या पिस्तूलचा अधिकृत वापर केला जातो. अमेरिकेतील कोस्टल गार्डदेखील मर्यादित स्वरूपात या पिस्तूलचा वापर केला आहे. जिगाना स्पोर्ट हे नव्याने निर्मिती करण्यात आलेले मॉडेल आहे. वापरण्यासाठी अतिशय सोपे आणि वजनाने हलके असल्यामुळे जिगानाला पसंती दिली जाते.
हे वाचा >> ‘प्रसिद्धी मिळावी म्हणून दोघांना संपवलं,’ अतिक अहमद-अश्रफ अहमद हत्या प्रकरणात आणखी काय समोर आले?
पिस्तूलचे पाकिस्तानशी संबंध काय?
जिगाना पिस्तूल भारतात विकण्यावर निर्बंध आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार पाकिस्तानमध्ये या पिस्तूलनिर्मितीचे बेकायदेशीर कारखाने आहेत. दहशतवाद्यांना आणि काळ्या बाजारात या पिस्तूल विकल्या जातात. अतिक अहमदच्या मारेकऱ्यांकडे हे पिस्तूल कुठून आले? याचा शोध अद्याप लागलेला नाही. पण पाकिस्तानच्या सीमेमधून या पिस्तूलची तस्करी केली जाते, त्यामुळे याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्यात येत आहे. जिगाना पिस्तूलची अनेक मॉडेल्स असून त्यात वजन, आकार, बॅरेलची लांबी, मॅगझीन क्षमता वेगवेगळी आहे. अतिक अहमदच्या हत्येसाठी कोणते मॉडेल वापरण्यात आले याचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.
पाकिस्तानमधून अवैध शस्त्रांचा व्यापार पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे काही माध्यमांनी त्यांच्या रिपोर्ताजमध्ये सांगितले आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातदेखील जिगानाचा वापर झाला होता, अशी माहिती पुढे येत आहे. पंजाबमधील वाढत्या गँगवॉरमुळे काळ्या बाजारातून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रांची खरेदी केली जाते. पाकिस्तानच्या सीमेमधून ड्रोनच्या माध्यमातून पंजाबच्या सीमेत शस्त्रे टाकली जातात. एक ड्रोन एकावेळी दहा किलोचे सामान वाहून नेऊ शकतो. ड्रोनद्वारे अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. पंजाबमधून शस्त्रांची विक्री भारताच्या इतर राज्यांमध्ये केली जाते.
वॉल्थर पी८८
वॉल्थर पी८८ ही जर्मन बनावटीची सेमी ऑटोमेटिक पिस्तूल आहे. कार्ल वॉल्थर GmbH स्पोर्टवॉफन या कंपनीने याची निर्मिती केली. वॉल्थर पीपीके पिस्तूल जेम्स बाँड या सीरिजमध्ये वापरली गेली आहे. या पिस्तूलची बनावट सैन्य आणि पोलिसांना उपयोगी पडेल अशी आहे. जर्मन पोलीस दलाने याचा वापर केल्यानंतर यूएसच्या सैन्य दलानेही वॉल्थरचा वापर केला.
वॉल्थरची निर्मिती १९८८ साली करण्यात आल्यामुळे याला पी८८ असे नाव देण्यात आले. वजनाने अधिक जड, महाग आणि सुरक्षित नसल्यामुळे सुरुवातीला या पिस्तूलवर टीका करण्यात आली. यूएस सैन्य दलाने याची चाचणी घेतल्यानंतर पिस्तूल वापरण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंपनीने पिस्तूलच्या बनावटीमध्ये बरेच बदल करून पी८८ कॉम्पॅक्ट हे नवे मॉडेल आणले. तरीही याची किंमत खूप जास्त असल्यामुळे त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
आणखी वाचा >> Atiq Ahmed Murder : एखाद्या हिंदी वेब सीरिजप्रमाणे अतिक अहमदचे आयुष्य होते; नेहरूंच्या मतदारसंघातून झाला होता खासदार
वॉल्थर कंपनीने दोन्ही मॉडेल्सचे उत्पादन १९९७ आणि २००० साली बंद केले आहे. तरीही जगभरातील पिस्तूलचाहते काळ्या बाजारातून ही पिस्तूले मिळवतात.
द ब्रिटिश बुल डॉग
खिशात आरामात मावणारी ब्रिटिश बनावटीचे द ब्रिटिश बुल डॉग हे सर्वात जुने पिस्तूल असल्याचे मानले जाते. फिलिप वेब्ले आणि बर्मिंगहॅम यांच्या मुलांनी १८७२ साली इंग्लंडमध्ये याचे उत्पादन केले होते. एकविसाव्या शतकात अँटिक मॉडेल म्हणून हे पिस्तूल बाळगले जाते. केवळ अडीच इंचांचे असलेले हे छोटे पिस्तूल कोटाच्या एका खिशात मावेल, या आकाराचे आहे. याच्या सिलिंडरमध्ये पाच गोळ्या मावतात. १६ इंचांपेक्षा कमी बॅरल असलेल्या पिस्तूलला शॉर्ट बॅरल पिस्तूल म्हणतात. या पिस्तूलचे बॅरल अतिशय लहान असल्यामुळे त्याला बुल डॉग (व्होडाफोनच्या जाहिरातीमधला छोटा कुत्रा) असे नाव देण्यात आले. असद आणि गुलामकडे आढळून आलेले पिस्तूल हे मूळ ब्रिटिश बुल डॉग पिस्तूलशी साधर्म्य असणारे शॉर्ट बॅरल प्रकारातील पिस्तूल असल्याचा कयास बांधण्यात येत आहे.