युरोप-आशियाच्या सीमेवरील तुर्क विरुद्ध कुर्द हा अनेक दशकांचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. तुर्कस्तानातील एका दहशतवादी हल्ल्याला कुर्द फुटीरतावादी जबाबदार असल्याचा आरोप करत तुर्कस्तानने इराक आणि सीरियाच्या हद्दीत हवाई कारवाई केली. या निमित्ताने चार देशांमध्ये अस्तित्व असलेल्या मात्र स्वत:चा हक्काचा देश नसलेल्या कुर्द जमातीच्या संघर्षाच्या इतिहासाची ही उजळणी….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुर्कस्तानच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चे कारण काय?

तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये विमान उत्पादन क्षेत्रातील अग्रणी कंपनी ‘तुसास’ किंवा तुर्की एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या कारखान्यावर दहशतवादी हल्ला झाला. एक पुरुष आणि एका महिला अतिरेक्याने बेछूट गोळीबार केला आणि ग्रेनेड फेकले. यात सुरक्षा रक्षकंसह काही जण मृत्युमुखी पडले. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे दोन्ही अतिरेकी मारले गेले. हा हल्ला ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) या दहशतवादी संघटनेने केल्याचा आरोप तुर्कस्तान सरकारने केला. त्यानंतर तुर्की विमानांनी इराक आणि सीरियामधील तुर्कस्तानच्या सीमेला लागून असलेल्या प्रदेशात हवाई हल्ले केले. या कारवाईत कुर्द दहशतवाद्याचे किमान ३० तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. तर यामध्ये ५ जण ठार झाले असून डझनभर लोक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : विश्लेषण : इस्रायलचा अखेर इराणवर हल्ला! पश्चिम आशियात पुन्हा युद्धभडका?

u

‘पीकेके’ बंडखोर कोण आहेत?

मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीवर आधारलेल्या या संघटनेची स्थापना १९७०च्या दशकात झाली. १९८४ साली तुर्कस्तानमधून फुटून कुर्द गटासाठी वेगळ्या राष्ट्राची मागणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकारबरोबर या संघटनेच्या संघर्षाला सुरुवात झाली. १९९०चे दशक निम्मे सरले असताना संघर्ष आणखी चिघळला. यावेळी झालेल्या हिंसाचारात तुर्कस्तानच्या आग्नेय आणि पूर्वेकडील कुर्द लोकांची हजारो गावे नेस्तनाबूत करण्यात आली. परिणामी लाखो कुर्द अक्षरश: देशोधडीला लागले आणि त्यांनी अन्य शहरांमध्ये आश्रय घेतला. १९९०चे दशक संपत आले असताना पीकेकेने स्वतंत्र राष्ट्राची मागणी मागे घेत तुर्कस्तानातच अधिक स्वायत्ततेची मागणी पुढे केली. मात्र त्यावरही सहमती होऊ शकली नाही. दीर्घकालीन संघर्षानंतर २०१३मध्ये पीकेके बंडखोर आणि तुर्कस्तान सरकारने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र ही शस्त्रसंधी फार काळ तग धरू शकली नाही. संभाव्यत: ‘आयसिस’ने जुलै २०१५मध्ये सीरियाच्या सीमेजवळ आत्मघातकी हल्ला केला. यात ३३ कुर्द तरुण मारले गेले. त्यानंतर तुर्कस्तान सरकारने पीकेके आणि आयसिस यांच्याविरोधात कारवाई सुरू केली. ‘दहशतवादावर सार्वत्रिक प्रहार’ असे नाव या कारवाईला दिले गेले. सरकारमधील काही बंडखोर अधिकाऱ्यांनी जुलै २०१६मध्ये राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्याविरोधात उठावाचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे पीकेकेविरोधात अधिक कडक कारवाईचा एर्दोगन प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला. मात्र पीकेके इराक आणि सीरियामध्ये आपली पाळेमुळे अधिक घट्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. तुर्कस्तानसह युरोपीय महासंघ आणि संयुक्त राष्ट्रांनी पीकेकेला दहशतवादी संघटना घोषित केले असून या वर्षाच्या सुरुवातीला इराकनेही पीकेकेवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

कुर्द समाजाचा इतिहास काय?

तुर्कस्तान, सीरिया, इराक आणि आर्मेनिया या देशांच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये या कुर्द लोकांची प्रामुख्याने वसाहत आहे. पश्चिम आशियात कुर्दांची लोकसंख्या सुमारे ३० लाख आहे. तुर्कस्तानच्या ७ कोटी ९० लाख लोकसंख्येमध्ये एक पंचमांश कुर्द आहेत. मेसोपोटेमियाचा पठारी भाग तसेच आग्नेय तर्कस्तान, इशान्य सीरिया, उत्तर इराक, वायव्य इराण आणि नैर्ऋत्य आर्मेनिया या भागांमध्ये कुर्दांची सर्वाधिक घनता बघायला मिळते. वंश, संस्कृती आणि भाषा या समान धाग्यांनी या विविध देशातील कुर्दांना बांधले असले, तरी त्यांची एक प्रमाणबोली नाही. तुर्कांमध्ये सुन्नी मुस्लिम बहुसंख्य असले, तरी इतर पंथांचे अनुकरण करणारेही काही कुर्द आहेत. २०व्या शतकाच्या सुरुवातीला कुर्दांसाठी स्वत:चे राष्ट्र असावे, ही संकल्पना जन्माला आली. या संभाव्य राष्ट्राचे ‘कुर्दिस्तान’ असे नामकरणही करण्यात आले. पहिल्या महायुद्धानंतर आणि ऑटोमन साम्राज्य ढासळल्यानंतर विजयी पाश्चिमात्य राष्ट्रांनी १९२०मध्ये केलेल्या ‘सेव्हरेस कारारा’त कुर्दांसाठी राष्ट्रनिर्मितीची तरतूद आहे. मात्र आधुनिक तुर्कस्तानची सीमारेषा निश्चित करणाऱ्या ‘लुसान करारा’त कुर्दस्तानचा कोणताही उल्लेख नाही. बहुतांश राष्ट्रांमध्ये कुर्द लोक अल्पसंख्याक म्हणून राहतात.

हेही वाचा : विश्लेषण : इंग्लंड फुटबॉल संघाचे जर्मन प्रशिक्षक! थेट नाझी युगाची चर्चा का? नियुक्तीस विरोध का?

कुर्दांच्या दमनाचा प्रयत्न झाला का?

तुर्क बहुसंख्य असलेल्या तुर्कस्तानात कुर्दांना राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक संसाधने, सांस्कृतिक स्वातंत्र्य सातत्याने नाकारले गेले. १९९० मध्ये न्यायालयांनी पाच कुर्दवादी पक्षांवर बंदी घातली. तुर्कस्तानात पक्षावर बंदी याचा अर्थ पक्षाच्या नेत्यांवर गुन्हेगारी खटले भरण्यासाठी सरकारला मोकळे रान, असा घेतला जातो. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या कुर्द नेत्यांवर तुर्कस्तान सरकारने वरवंटा फिरवून त्यांचा आवाज बंद पाडला.

हेही वाचा : Digital condom: डिजिटल कंडोमची सोशल मीडियावर चर्चा, काय आहे हा प्रकार?

‘तुसास’ या कंपनीची महिती काय?

तुर्कस्तानच्या विमाननिर्मिती क्षेत्रातील तुर्की एअरोस्पेस इंडस्ट्रीज ही प्रमुख कंपनी आहे. व्यावसायिक तसेच लष्करी विमानांची निर्मिती (रचना, विकास, उत्पादन) ही कंपनी करते. अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ फाल्कन विमानांचे उत्पादन करण्यासाठी ‘नाटो’ने या कंपनीला परवाना दिला आहे. तसेच तुर्की हवाईदलाच्या वापरातील जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ही कंपनी करते. सरकारची नागरी शाखा आणि लष्कर हे या कंपनीचे सर्वांत मोठे दोन भागधारक आहेत. तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर, इस्तंबुलमध्ये संरक्षण आणि विमान उद्योगाबाबत प्रदर्शन भरले असतानाच अंकारामध्ये हा हल्ला करण्यात आला, हे विशेष. अशा या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या कंपनीवर झालेल्या हल्ल्यामुळे तुर्कस्तान सरकारला पीकेकेवर प्रतिहल्ला करण्यासाठी मोठे कारण मिळाले आहे. यातूनच सीरिया आणि इराकमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’ करून कुर्द दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. इराकनेही अंकारामधील हल्ल्याचा निषेध करून आपल्या जमिनीवर दहशतवादाला थारा नसल्याचे म्हटले आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Turkistan surgical strike on iraq and syria after kurdish militant attack print exp css