भक्ती बिसुरे
कासव हा एक उभयचर प्राणी आहे. जैवसाखळीत या प्राण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि कासवांचे आयुर्मान सुमारे १५० वर्ष एवढे असते. कासवांच्या काही प्रमुख प्रजाती आहेत. पाण्यात राहणारे कासव हे ‘टर्टल’ म्हणून ओळखले जाते तर जमिनीवर राहणारे कासव हे ‘टॉरटॉईज’ म्हणून ओळखले जातात. या दोन्हींच्या अनेक प्रजाती अस्तित्वात आहेत. कासव हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणून ओळखला जातो आणि त्याच्याबद्दल असलेले कुतूहल आणि आकर्षणातून कासवाबद्दल सतत काही ना काही संशोधन जगाच्या कानाकोपऱ्यात सुरुच असते. असेच एक अत्यंत रंजक संशोधन नुकतेच समोर आले असून त्याची दखल ‘वॉशिंग्टन पोस्ट’ या अमेरिकन वर्तमानपत्राकडून घेण्यात आली आहे. हे संशोधन काय आहे, याचा आढावा…
संशोधन काय?
कोणतीही आई जन्माआधीपासूनच तिच्या बाळाशी भावनिकरीत्या जोडलेली असते. कासव किंवा टर्टल मादीही याला अपवाद नाही. अंडी उबवण्यापूर्वी कासव आई अंड्यातील तिच्या पिल्लांशी बोलते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कासव या प्राण्यांमध्ये मातृत्व भावना इतर प्राण्यांच्या तुलनेत कमी असते हा सिद्धांत एक प्रकारे खोटा ठरला आहे. अमेरिका आणि ब्राझील येथील संशोधकांच्या गेल्या दशकभराच्या प्रयत्नांतून काही ठोस निष्कर्ष हाती लागले असून त्याद्वारे टर्टल प्रजातीतील कासव मादी अंडी उबवण्यापूर्वी त्या अंड्यातील पिल्लांशी संवाद साधत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनाचा भाग म्हणून अमेरिकन नद्यांच्या क्षेत्रातील महाकाय टर्टल्स, मेक्सिकोतील केंप रिडले सी टर्टल्स यांचा अभ्यास करण्यात आला.
अभ्यासाचे स्वरूप?
कासव मादी अंडी घातल्यानंतर पिल्ले अंडी फोडून बाहेर येण्यापूर्वीच समुद्रात निघून जाते असा या प्राण्याबद्दल एक समज आहे. त्यामुळे या प्राण्यात पालकत्वाची अंत:प्रेरणा नाही असा प्राण्यांच्या अभ्यासकांमध्ये एक समज आहे. संवाद साधण्यासाठी कासव आवाज हे माध्यम वापरत नसल्याचे १९५० मध्ये कासवांबाबत प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या संशोधनातून कासव प्रजातीबद्दलचे अनेक समज दूर होण्यास मदत झाली आहे. या अभ्यासासाठी कासव मादीने घातलेल्या अंड्यांच्या परिसरात ध्वनिक्षेपक बसवण्यात आले. या ध्वनिक्षेपकांनी कुजबूज प्रकारातील आवाजाच्या नोंदी घेतल्या. त्यामुळे कासव मादी अंड्यातील पिल्लांशी संवाद साधत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील कासव जगातील स्थिती काय?
टर्टल या पाण्यात राहणाऱ्या कासवाबद्दल आपण सारेच जाणतो. कासव मादी अंडी घालण्याच्या वेळी जमिनीवर म्हणजेच समुद्र किनाऱ्यावर येते. अंडी उबल्यानंतर अंड्यांचे कवच फोडून ही पिल्ले हळूहळू किनाऱ्यावरून मार्गक्रमण करत समुद्रात जातात. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावांमध्ये पूर्वी कासवांची अंडी चोरुन ती खाणे, विकणे अशा गोष्टी दिसून आल्या. मात्र वन विभाग आणि प्राणी प्रेमी यांच्या हस्तक्षेपामुळे हीच गावे कासव संरक्षण आणि कासव संवर्धनाकडे वळली. त्यातून कासव महोत्सव ही महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीची पर्यटन दृष्टीने नवी ओळख म्हणून विकसित होताना दिसत आहे. प्राणी प्रेमींच्या अथक प्रयत्नांमुळे राज्यातील किनारपट्ट्यांवर अक्षरश: हजारो कासवांचे संवर्धन शक्य झाले आहे.
जगभर कासवांच्या संवर्धनाचे आव्हान?
कासवांचे संवर्धनही केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील चिंतेची बाब असल्याचे या संशोधनाच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे. तापमान वाढ आणि त्याचे जीवसृष्टीवर होणारे परिणाम हे कासवांच्या प्रजातींनाही भेडसावण्याची शक्यता असल्याने त्याबाबत वेळीच सतर्कता बाळगून उपाययोजनांची गरज असल्याचे कासव जगतातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कासव संवर्धनासाठी नागरिक सहभागाबरोबरच ड्रोनसारख्या अद्ययावत तंत्राच्या वापराची गरज, विविध माध्यमातून जनतेमध्ये जागृती अशा गोष्टींची गरजही या संशोधनाच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आली आहे.
bhakti.bisure@expressindia.com