देशात सध्या कलाकारांच्या वक्तव्यामुळे होणाऱ्या वादांच्या प्रमाणात बरीच भर पडली आहे. एखाद्या मुलाखतीमध्ये, सोशल मीडिया पोस्टमध्ये किंवा एखाद्या ट्वीटमध्ये कलाकाराने वक्तव्य केलं की लगेच त्यावर वाद प्रतिवाद होतात, असंच काहीसं सध्या अभिनेत्री रिचा चड्ढाच्या बाबतीत घडत आहे. गलवानच्या खोऱ्यात शहीद झालेल्या आपल्या भारतीय सैन्याच्या जवानांचा अपमान करणाऱ्या ट्वीटमुळे रिचा सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या या ट्वीटवरुन चांगलाच गदारोळ माजला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय सैन्याचा हा अपमान सगळ्यांच्याच चांगला जिव्हारी लागला असून रिचाच्या विरोधात सगळ्यांनीच आवाज उठवला आहे. तिच्या आगामी चित्रपटाला बॉयकॉट करायची मागणीदेखील होत आहे. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांनी रिचाच्या या वक्तव्याचे खंडन केले आहे. अभिनेता अक्षय कुमार, के के मेनन, शिवाय लेखक मनोज मुंतशीर, चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी रिचाच्या या ट्वीटबद्दल खंत व्यक्त केली आहे.

रिचाचं वादग्रस्त ट्वीट कोणतं?

भारतीय लष्करातील उत्तर विभागाचे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचाने हे ट्वीट केलं होतं. भारत सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताला जोडण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे, असं द्विवेदी म्हणाले होते. याच प्रतिक्रियेसंदर्भातील ट्वीट रिचाने रिट्वीट करत, “गलवान सेज हाय” म्हणजेच गलवान तुमच्याकडे पाहतंय अशा अर्थाची प्रतिक्रिया दिली होती. यामुळेच तिच्यावर एवढी टीका होत आहे.

गलवानमध्ये नेमकं काय झालं होतं?

जून २०२० मध्ये गलवानच्या खोऱ्यात चीनी सैनिकांनी घुसखोरी केली होती आणि भारतीय सैन्यावर हल्ला केला होता. त्याच्या हल्ल्याला उत्तर देऊन त्यांना परत पाठवण्यात भारतीय सैन्याला यश आलं होतं, पण तब्बल २० भारतीय जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. याच घटनेची आठवण करून देत रिचाने खोचक ट्वीट करत भारतीयांच्या जखमेवरची खपली काढली आहे. यामुळेच लोक चांगलेच खवळले आहेत आणि तिच्या या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

पाहा व्हिडीओ –

रिचाच्या वादग्रस्त विधानांचा इतिहास :

अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येण्याची रिचाची ही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा अशाच काही वादग्रस्त वक्तव्यामुळे रिचा चर्चेत आली होती. ‘सीएए आणि एनआरसी’ कायदा लागू झाला तेव्हासुद्धा रिचाने सरकारच्या या निर्णयाबाबत वक्तव्य केलं होतं. २०१९ मध्ये भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी घातली जात होती, तरी बरेच भारतीय कलाकार तिथे जाऊन कला सादर करत होते. याबद्दलही रिचाने एका मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं होतं. कलाकार हे मनं जुळवायची कामं करतात असं म्हणत तिने या गोष्टीचं समर्थन केलं होतं.

आणखी वाचा : “जन्माला येणारं प्रत्येक मूल हे हिंदूच, त्यांचे आई-वडील…” शरद पोंक्षे यांचं विधान

जेव्हा भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली तेव्हासुद्धा रिचाने मुलाखतीत असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “कलाकारांवर बंदी घालून हल्ले थांबतील याची कोण शाश्वती देईल का?” असं म्हणत तिने थेट यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.रिचाने याआधीही अशी बरीच वादग्रस्त विधानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन केली होती. मध्यंतरी तिने वाघा बॉर्डरवरील परेडवरही टिप्पणी केली होती. एका ट्विटर यूझरच्या ट्वीटला उत्तर देत रिचा म्हणाली होती, “कट्टर राष्ट्रवादाबद्दल विचाराल तर, वाघा बॉर्डरवर होणाऱ्या गोष्टी या एखाद्या ग्रेट सर्कसपेक्षा कमी नाहीत असं माझं मत आहे.”

गलवानबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रिचाची ही विधानं, व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी मुद्दाम तिच्या जुन्या गोष्टी बाहेर कडून तिच्या देशविरोधी विचारधारेचा उघडपणे विरोध करत आहेत. रिचाच्या या वक्तव्यामुळे समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्याने एवढा विरोध होत आहे. कित्येक ठिकाणी रिचाच्या विरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. रिचाने यानंतर माफीदेखील मागितली पण कामानीतून सुटलेला तीर आणि ओठातून गेलेला शब्द परत घेता येत नाही, तसंच रिचाच्या या माफीचाही लोकांनी विरोध केला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tweet controversy of richa chadha on galwan and her other controversies avn
Show comments