पंजाबमधील किरणजित कौर या अल्पवयीन मुलीवर २६ वर्षांपूर्वी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेला २६ वर्षं उलटूनही अद्याप आरोपींविरोधातील लढा थांबलेला नाही. ज्यावेळी किरणजितवरील अत्याचाराची माहिती बाहेर आली, तेव्हा पंजाबमधील सामान्य जनतेचा मोठा असंतोष पाहायला मिळाला होता. आरोपींना तातडीने पकडून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. १२ ऑगस्ट रोजी किरणजितवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानिमित्त दरवर्षी याच दिवशी किरणजित कौर यादगार समिती आणि किरणजितच्या कुटुंबीयांकडून तिच्या आठवणीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अधिवेशन भरवून महिला अत्याचाराच्या प्रकरणांना वाचा फोडली जाते. २६ वर्षांपूर्वी नेमके काय घडले होते? आरोपींना पकडण्यासाठी काय कारवाई करण्यात आली? पीडितेचे कुटुंबीय कसा लढा देत आहेत? याबद्दल जाणून घेऊ …
किरणजित कौर बेपत्ता
अल्पवयीन किरणजित कौर पंजाबच्या बरनाला जिल्ह्यातील मेहल कलां या गावात राहणारी होती. १२ वीचे शिक्षण घेत असताना २९ जुलै १९९७ साली ती बेपत्ता झाली. तिचे वडील दर्शन सिंग सरकारी शाळेत हिंदी विषयाचे शिक्षक होते. किरणजित बेपत्ता झाल्यानंतर वडिलांनी तिचा बराच शोध घेतला. पाच दिवस शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे २ ऑगस्ट रोजी तिच्या शोधासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. (जिचे नाव नंतर ‘किरणजित कौर यादगार समिती’ असे ठेवले गेले) काही दिवसांनी किरणजित पुस्तकांची बॅग, सायकल व कपडे एका शेतात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी जवळच्या शेतात नग्नावस्थेत किरणजितचा मृतदेहही आढळून आला. ज्या व्यक्तीचे शेत होते, त्याला आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले.
जनतेचा प्रचंड असंतोष आणि उद्वेगानंतर १२ ऑगस्ट रोजी किरणजितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. २० ऑगस्ट रोजी मेहल कलां येथील कृषी बाजारात हजारो नागरिकांनी एकत्र येऊन प्रार्थना सभेचे आयोजन केले.
किरणजितच्या मारेकऱ्यांविरोधात लढाई
किरणजितचा मृतदेह ज्यांच्या शेतात आढळून आला, ते लोक त्याच गावातील रहिवासी होते; तसेच त्यांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी होती. किरणजित महाविद्यालयातून घरी जात असताना या लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. आपल्या मुलीवर असे निर्घृण अत्याचार झाल्यानंतर त्याची वाच्यता होऊ नये, तसेच या अत्याचाराचा कलंक कुटुंबाला लागू नये म्हणून नातेवाइकांनी दर्शन सिंग यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दर्शन सिंग यांनी गुन्हेगारांचे राजकीय संबंध असूनही अन्यायाविरोधातील लढा सोडला नाही.
किरणजित कौर यादगार समितीकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला गेल्यानंतर पोलिसांनी मेहेर कलां गावातून सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन स्थलांतरीत मजूर, एक पंजाबी शेतमजूर व चार शेतकऱ्यांचा समावेश होता. २००१ साली तीन आरोपींची सुटका करण्यात आली; तर दोन स्थलांतरीत मजूर आणि शेतकरी कुटुंबातील दोन भावांना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सर्वांनी त्यांचा तुरुंगातील कार्यकाळ पूर्ण केला आहे.
स्थलांतरीत मजुरांना आरोपातून मुक्त केल्यानंतर ते पुन्हा कधीच त्या गावात गेले नाहीत; पण शेतकरी कुटुंबातील ते दोन आरोपी अद्याप त्याच गावात राहत आहेत. इतर तीन व्यक्तींनी मेहेर कलां गाव सोडले असल्याचे यादगार समितीमधील एक सदस्य नरेन दत्त यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
आरोपींच्या कुटुंबातील व्यक्तीचा खून
चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर यादगार कृती समितीमधील तीन सदस्यांविरोधात आरोपींच्या आजोबाचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याची सुनावणी सुरू असताना न्यायालयाच्या परिसरातच यादगार कृती समितीमधील सदस्य आणि आरोपींचे आजोबा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली; ज्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीनंतर जखमी झालेल्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
मार्च २००५ साली बरनाला सत्र न्यायालयाने समितीमधील तीन सदस्य मंजित धानेर, नरेन दत्त व प्रेम कुमार यांना दोषी ठरविले. तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती समितीचे संयोजक गुरबिंदर सिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. “२००८ साली दत्त आणि कुमार यांना यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. धानेर यांची जन्मठेप मात्र कमी होऊ शकली नाही. सर्वोच्च न्यायालयाने ३ सप्टेंबर २०१९ रोजी हाच निर्णय कायम ठेवला. मात्र, पंजाबच्या राज्यपालांनी धानेर यांची जन्मठेपेची शिक्षा माफ केल्यानंतर १४ नोव्हेंबर २०१९ रोजी धानेर तुरुंगाबाहेर आले. त्यानंतर या निर्णयाविरोधात एक आंदोलन झाले”, अशीही माहिती गुरबिंदर सिंग यांनी दिली.
महिला अत्याचाराविरोधातला आवाज झाला बुलंद
किरणजित कौर यादगार समितीने तिला ‘शहीद’ असे विशेषण जोडले आहे. आज गावातील शाळेला किरणजितचे नाव देण्यात आले असून, दरवर्षी समितीकडून वार्षिक अधिवेशन घेऊन तिच्या स्मृतींना उजाळा देण्यात येतो. दर्शन सिंग आता ७२ वर्षांचे झाले असून, त्यांना समितीचे काम करणे शारीरिकदृष्ट्या झेपत नाही. पण, त्यांचा मुलगा हरप्रीत हा समितीचे काम नेटाने पुढे नेत आहे. “आरोपींना शिक्षा देणे एवढ्यापुरते हे मर्यादित नाही. तर इतर पालकांनीही अन्यायाविरोधात आवाज उचलावा हा संदेश देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. माझ्या बहिणीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. यातून आम्हाला संदेश द्यायचा आहे की, पीडितांना लाज बाळगण्याची गरज नाही. उलट आरोपींनाच त्यांच्या कृत्याची शरम वाटली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया हरप्रीत सिंग यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली.
यादगार समितीच्या वार्षिक अधिवेशनाबाबत बोलत असताना सामाजिक कार्यकर्ते रणदीप सिंग संगतपुरा म्हणाले की, यादगार समितीने या दुर्दैवी अत्याचाराविरोधात लढण्यासाठी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षाचा ठसा मेहेर कलां गावातील लोकांच्या मनावर कायमचा उमटला गेला आहे. हा फक्त किरणजित कौरच्या स्मृतींना उजाळा देणार वार्षिक कार्यक्रम नाही, तर संपूर्ण देशातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात उठलेला आवाज आहे; ज्यामुळे इतर पीडितांनाही बळ मिळते, अशी प्रतिक्रिया रणदीप सिंग यांनी दिली.
आरोपींच्या आजोबांच्या खुनाच्या आरोपात अटक झालेले मजिंत धानेर आता तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. आपण पाहिले की, महिला कुस्तीपटू, मणिपूर व काश्मीरमधील महिलांशी कसे व्यवहार झाले. त्यामुळे अशी अधिवेशने सतत होत राहिली पाहिजेत.