एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत. कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. या इशाऱ्यानंतर जवळपास ८० टक्के कर्मचारी नोकरी सोडू शकतात, असे एका अहवालातून समोर आले आहे. आक्रमक पवित्र्यानंतर ट्विटरकडून या कर्मचाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
विश्लेषण: ट्विटरवर बनावट खात्यांचा सुळसुळाट, एलॉन मस्कही त्रस्त; कसे ओळखायचे फेक अकाऊंट्स?
एलॉन मस्क यांनी ईमेलमध्ये काय म्हटलं?
कर्मचाऱ्यांच्या कंपनीतील भवितव्याबाबत बुधवारी रात्री ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना एलॉन मस्क यांनी ईमेल पाठवला. ‘A fork in the road’ अर्थात ‘आयुष्यातील निर्णायक क्षण’ असा या ईमेलचा विषय होता. “ज्या कर्मचाऱ्यांना या कंपनीत काम करायचं आहे, त्यांना जास्त तास काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. सुट्ट्यांच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना काम करायला लागू शकतं” असा या ईमेलचा आशय होता. ज्या कर्मचाऱ्यांना हे मान्य नाही त्यांनी ‘सेवरन्स पे’ अर्थात तीन महिन्यांचा पगार घेऊन कंपनी सोडावी, असं या ईमेलमध्ये नमुद करण्यात आलं होतं. यासाठी ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना गुगल फॉर्म देण्यात आला होता. अटी मान्य असलेल्या कर्मचाऱ्यांना YES या पर्यायावर क्लिक करायला सांगण्यात आले होते. दरम्यान, या फॉर्ममध्ये केवळ ‘YES’ हाच एक पर्याय असल्याचे काही वृतांमधून समोर आले आहे.
“ट्विटर २.० निर्माण करण्यासाठी आणि या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांना जास्त तास काम करावे लागणार आहे. केवळ अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच उत्तीर्ण ग्रेड देण्यात येईल”, असे या ईमेलमध्ये म्हटले आहे. अपवादात्मक कामगिरी म्हणजे नेमकं काय हे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
विश्लेषण : एलॉन मस्क यांनी खरेदी केल्यानंतर ट्विटर आता खासगी कंपनी, नेमके काय बदल होणार?
मस्क यांच्या ईमेलनंतर कर्मचारी निर्णायक स्थितीत
एलॉन मस्क यांच्या ईमेलनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीतील जवळपास अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकल्यानंतर आता देण्यात येत असलेल्या राजीनाम्यांमुळे कंपनीसमोरील अडचण वाढली आहे. या राजीनामा सत्रानंतर ट्विटरमध्ये पुरेसे कर्मचारी उरतील की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ‘ट्विटर ब्लू’ सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या एलॉन मस्क यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर टीका करणाऱ्या आणि खिल्ली उडवणाऱ्या अभियंतांसह इतर कर्मचाऱ्यांची एलॉन मस्क हकालपट्टी करत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या वेगाने घटत चालली आहे. ट्विटरचे अँड्रॉइड अॅप संथगतीने चालत असल्याची टीका करणाऱ्या अभियंत्याला मस्क यांनी नुकतंच जाहिररित्या कामावरुन काढून टाकले आहे.
#RIPTwitter हॅशटॅग ट्रेंड
एलॉन मस्क सध्या डॅमेज कंट्रोल करताना दिसत आहेत. कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या पण कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कर्मचाऱ्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न मस्क आणि त्यांच्या टीमकडून केला जात आहे. काही कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यासही परवानगी दिली जात आहे. ट्विटरचा ताबा घेताच मस्क यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ बंद करत कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्यास सांगितले होते.
बऱ्याच देशांमध्ये #RIPTwitter हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी कामावरुन काढून टाकण्यात आल्यानंतर हा सोशल मीडिया प्लॅटफार्म वापरण्यासाठी सुरक्षित आहे का? असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ट्विटरचे माजी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी लीया किस्नर, मुख्य गोपनीयता अधिकारी डेमियन किरन यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आधीच कंपनी सोडून गेले आहेत.