सोशल मीडिया किती प्रभावी माध्यम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. गेली काही वर्षं सोशल मीडियामुळे होणारे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि असे कित्येक बदल आपण बघत आलो आहोत. फेसबुक, व्हॉट्सअप, इनस्टाग्राम, आणि ट्विटर ही ४ सोशल मीडियाची मुख्य माध्यमं आहेत. त्यापैकी ट्विटर हे काही वर्षांपूर्वी उच्चवर्गीय लोकांचं माध्यम म्हणून ओळखलं जायचं. पण आता इंटरनेटच्या दरात घट झाल्याने ट्विटर वापरणाऱ्या लोकांच्या संख्येतसुद्धा लक्षणीय वाढ झाली आहे. सीएए विरुद्ध आंदोलन असो किंवा सध्या चाललेला बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंड, हे सगळे ट्रेंड व्हायरल करण्यात ट्विटरसारख्या माध्यमाचा खूप मोठा सहभाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे हे नवीन फीचर?

नुकतंच ट्विटरने त्यांच्या बहुचर्चित ‘एडिट ट्वीट’ या नव्या फीचरची चाचणी सुरू केली आहे. आणि ही सोय लवकरच प्रीमियम ग्राहकांनासुद्धा मिळणार असल्याचं स्पष्ट केलं गेलं आहे. ट्विटरने त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. ‘एडिट ट्वीट’ या फीचरची चाचणी बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे. शिवाय कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच या फीचरसंदर्भात घोषणादेखील केली होती. सध्यातरी हे ‘ट्विटर ब्लू’ हे फक्त प्रीमियम ग्राहकांनाच वापरता येणार आहे.

कसा वापरू शकता ‘एडिट ट्वीट’ हा पर्याय?

फेसबुकसारख्या माध्यमावर खूप आधीच ही सोय देण्यात आली होती. आपण केलेल्या एखाद्या पोस्टमध्ये आपण सहज बदल करू शकतो. पण ट्विटर हा मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असल्याने इथे या पर्यायाची आवश्यकता भासली नाही. पण आता एका ट्वीटमुळे बरंच काही घडू शकतं हे ध्यानात आल्यावर ट्विटरने हा पर्याय उपलब्ध केला आहे. एकाअर्थी वादग्रस्त ट्वीट बदलायलादेखील याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

सध्यातरी हे फीचर फक्त प्रीमियम ग्राहकांसाठीच असलं तरी लवकरच सरसकट सगळ्यांना हा पर्याय उपलब्ध होणार आहे. या नव्या फीचरमुळे केलेल्या ट्वीटमध्ये अर्ध्या तासाच्या तुम्ही आत बदल करू शकता. याबरोबरच मूळ ट्वीट काय होतं हे बघण्याचीसुद्धा सोय यात करून दिली जाणार आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : दिल्ली सरकारची व्हर्चुअल शाळा कशी आहे? विद्यार्थी कसं शिक्षण घेणार? वाचा १३ प्रश्नांची उत्तरं

हे फीचर अजूनतरी फक्त काहीच देशासाठी देण्यात आलं आहे. ट्विटर ब्लू हे नवीन फीचर सध्यातरी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलँड याच देशातल्या ग्राहकांसाठी आहे. या नवीन सुविधेसाठी ट्विटर ग्राहकांकडून ४.९९ $ प्रतीमहिना म्हणजे तब्बल ४०० रुपये एवढी फी आकारणार आहे. ट्विटरच्या या नव्या फीचरची काही लोकं आतुरतेने वाट पाहतायत तर काही यावर टीका करत आहेत. ट्विटरने डिलिटचा पर्याय दिलेला असताना हा नवीन पर्याय देणं मूर्खपणाचं लक्षण आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twitter rolled out its new feature called edit tweet but not for everyone avn
Show comments