सोशल मीडियावरील मायक्रोब्लॉगिंग साईट म्हणून ट्विटर जगप्रसिद्ध आहे. सरकारी यंत्रणा, राजकीय पक्ष, सेलेब्रिटी पासून ते राजकारणी, क्रीडापटू आणि सामान्य नागरीक मोठ्या संख्येने ट्विटर वापरतात. एलॉन मस्कने ऑक्टोबर २०२२ साली ट्विटरचा ताबा घेतला. तेव्हापासून ट्विटरवर नवे बदल करण्याचा धडाकाच सुरू करण्यात आला. ब्लू टीकसाठी पैसे आकारण्याची योजना आणल्यानंतर एलॉन मस्ककडून आणखीही प्रयोग केले जात आहेत. गेल्या दोन दिवसात हजारो ट्विटर धारकांनी त्यांच्या टाईमलाईनवर ट्विट दिसत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर समजले की, मस्क यांच्या नव्या धोरणाचा हा भाग होता. आता प्रत्येक युजरने दिवसाला किती ट्वीट पाहावेत, यावर मर्यादा घालण्यात आली आहे. याबद्दलची माहिती खुद्द एलॉन मस्क यांनी शनिवारी (१ जुलै) दिली.
“डेटा स्क्रिपिंग आणि सिस्टम मॅनिपुलेशनच्या उच्च पातळीला हाताळण्यासाठी आम्ही पुढीलप्रमाणे तात्पुरत्या मर्यादा घालत आहोत. व्हेरिफाईड अकाऊंट दिवसाला सहा हजार पोस्ट पाहू शकतात, व्हेरिफाईड नसलेले अकाऊंट दिवसाला ६०० पोस्ट पाहू शकतात. तर जे नवे आणि व्हेरिफाईड नसलेले अकाऊंट आहेत, ते दिवसाला ३०० ट्वीट्स पाहू शकतात”, असे ट्वीट एलॉन मस्क यांनी केले आहे.
या ट्वीटच्या काही तासांनंतर मस्क यांनी पुन्हा एक नवे ट्वीट केले आणि सांगितले, “व्हेरिफाईड अकाऊंटला दिवसाला आठ हजार ट्वीट, व्हेरिफाईड नसलेले अकाऊंट दिवसाला ८०० पोस्ट आणि नवे अकाऊंट ४०० ट्वीट पाहण्याची मर्यादा लवकरच वाढवू”. त्यानंतर या ट्विटला त्यांनी रिप्लाय करून हे प्रमाण अनुक्रमे १० हजार, एक हजार आणि पाचशे करू, असे सांगितले.
एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्वीट पाहण्याची मर्यादा ओलांडल्यानंतर काही युजर्सचे अकाऊंट त्या दिवसापुरते बंद करण्यात आले. जे युजर्स ट्विटरवर सक्रिय आहेत, त्यांच्या भूतकाळातील मर्यादा पाहून त्यांना अधिक ट्वीट पाहण्याची मुभा दिली जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
डेटा स्क्रिपिंग म्हणजे काय?
ट्वीट पाहण्यावर मर्यादा घालण्यासाठी मस्क यांनी डेटा स्क्रिपिंगला जबाबदार धरले आहे. स्क्रिपिंग म्हणजे एखादी गोष्ट खरवडून काढणे. सोशल मीडिया साईटवरील लोकांची माहिती थर्ड पार्टीद्वारे स्क्रिपिंग केली जाते. म्हणजे ती बेमालूमपणे काढून घेण्यात येते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर अशा सोशल मीडिया साईटवरून मोठ्या प्रमाणात डेटा उचलण्यात येत असतो. २०२३ च्या ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, प्रतिस्पर्ध्यांचा मागोवा ठेवणे, विशिष्ट युजर्सना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि बाजारातील ट्रेंड जाणून घेण्यासाठी पुनर्प्राप्त केलेला डेटा स्क्रिप करण्याची भूमिका वेबसाईट घेत असतात. तथापि, डेटा स्क्रिपिंगमुळे गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. स्क्रिपिंगमुळे खासगी संपर्कासारखी माहिती इतर लोकांच्या ताब्यात जाते. युरोपियन युनियनमध्ये याबाबत अतिशय कडक कायदे आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये फेसबुकची पालक कंपनी ‘मेटा’वर २७७ दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. मेटाने युजर्सचा डेटा सांभाळण्यात कुचराई करून तिसऱ्या कंपनीने डेटा स्क्रिप केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला होता.
ट्विटरवर याआधी मर्यादा होती का?
ट्विटरवर ट्वीट पाहण्याची याआधी मर्यादा नव्हती. पण एका दिवसात किती ट्वीट करावेत, एका दिवसात किती युजर्सला फॉलो करावे आणि एका दिवसात किती जणांना थेट मेसेज करायचे याबद्दलची मर्यादा ट्विटरने आखून दिली होती. या मर्यादामुळे वेबसाईटचा डाऊनटाइम आणि एरर पेजेस कमी करण्यासाठी मदत होते. डिसेंबर २०२२ पर्यंत तरी कुणी किती ट्वीट पाहावेत यावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नव्हती.
कोणते युजर्स मर्यादेपलीकडे ट्वीट पाहू शकतात?
ज्या लोकांनी ट्विटरला महिन्याला आठ डॉलरची रक्कम भरून व्हेरिफाईड बॅज घेतलेला आहे, त्या युजर्सना अमर्यादीत ट्वीट पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर महसूल वाढविण्यासाठी ब्लू टीक- व्हेरिफाईड बॅजसाठी पैसे आकारण्यास सुरूवात केली.
ट्विटर ब्लू ही पैसे देऊन आकारण्यात येणारी सुविधा २०२१ रोजी आणण्यात आली होती. पण मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर या योजनेला आणखी वलय आणि गती आणली. पूर्वीच्या तुलनेत ट्विटर ब्लू सेवा आता व्हेरिफाईड प्लू टिकदेखील प्रदान करते. मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक दिवसांपासून बरेच बदल गेले आणि काही बदल मागेही घेतले. ज्यामुळे ट्विटरसहीत युजर्समध्येही गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसले. मस्क यांच्या प्रयत्नांमुळे ट्विटरच्या महसूलात वाढ झाली की नाही? याबद्दलची माहिती मिळू शकलेली नाही.
मस्क ट्विटरमध्ये नवे नवे बदल करत असल्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीकादेखील झाली. ट्वीट पाहण्याच्या संख्येवर मर्यादा आणल्यानंतर मस्क यांनी सांगितले की, ट्वीट पाहण्यासाठी मर्यादा निश्चित करण्याचे कारण म्हणजे, आपल्या अनेकांना ट्वीटरचे व्यसन लागले आहे. यातून बाहेर पडावे लागेल. मी हा बदल जगाच्या भल्यासाठी केला आहे.
मस्क यांनी यापूर्वी म्हटले होते की, शेकडो संस्था ट्विटरच्या डेटाचा आक्रमकपणे वापर करत आहेत. ज्यामुळे युजर्सच्या अनुभवावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच चॅटजीपीटी या कृत्रिम बुद्धिमतत्ता सॉफ्टवेअरची मालक कंपनी असलेल्या ओपन एआयकडून ट्विटर डेटाचा वापर त्यांच्या लँग्वेज मॉड्यूल तयार करण्यासाठी होत असल्याबाबतही मस्क यांनी नाराजी व्यक्त केली.