केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यूझाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यातील पहिल्या रुग्णाचा ३० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. याच रुग्णाच्या कुटुंबातील अन्य दोन सदस्यांवरही सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या उपचार सुरू असलेला पहिला रुग्ण नऊ वर्षांचा; तर दुसरा रुग्ण २४ वर्षांचा आहे. या घटनेनंतर केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी मंगळवारी (१२ सप्टेंबर) एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोझिकोडे येथील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, हा विषाणू काय आहे? त्याचा प्रसार कसा होतो? तो किती विघातक आहे? याची उत्तरं जाणून घेऊ…
केरळमध्ये आढळले दोन रुग्ण; प्रशासन सतर्क
निपाह विषाणूच्या संसर्गामुळे दोघांचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकारनेही खबरदारी म्हणून कोझिकोडे येथे केंद्राचे पथक पाठवले आहे. हे पथक निपाह विषाणू संसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करील. निपाह विषाणूच्या संसर्गाची गती करोना विषाणूच्या तुलनेत कमी आहे. मात्र, हा विषाणू करोना विषाणूपेक्षा जास्त संहारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार या विषाणूमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांचा मृत्युदर हा ४० ते ७५ टक्के आहे.
निपाह विषाणूचा संसर्ग कसा होतो? लक्षणे काय?
निपाह हा एक झुनोटिक आजार आहे. म्हणजेच या विषाणूचा संसर्ग मानवाला संसर्गजन्य प्राणी किंवा अन्न यांच्या माध्यमातून होतो. संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास म्हणजेच एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीलादेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)नुसार या विषाणूच्या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणे, श्वास घेण्यास अडचण, उलट्या, अशी लक्षणे जाणवू लागतात. त्यासह गरगरणे, झोप येणे, मेंदूला सूज येणे अशी लक्षणेदेखील दिसू शकतात. मेंदूला सूज आल्यामुळे रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. तसेच त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
निपाह विषाणूचा प्रसार कसा झाला?
निपाह विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण पहिल्यांदा मलेशिया (१९९८) व सिंगापूर (१९९९) येथे आढळले होते. मलेशियातील ज्या गावात या विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला होता, त्याच गावावरून या विषाणूला निपाह, असे नाव देण्यात आले आहे. पुढे या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या विषाणूचा प्राण्यांपासून माणसांपर्यंतचा प्रसार हा संसर्गजन्य अन्नाचे सेवन केल्यामुळे होतो. ‘सीडीसी’च्या म्हणण्यानुसार संसर्ग झालेल्या वटवाघळाची लाळ किंवा त्याच्या लघवीमुळे संक्रमित झालेल्या खजुराचे सेवन केल्यामुळेही या विषाणूचा मानवामध्ये प्रसार होऊ शकतो. वटवाघळाचे वास्तव्य असलेल्या झाडावर चढल्यामुळेही निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. वटवाघळाच्या माध्यमातून डुक्कर, श्वान, मांजर, शेळी, घोडा, मेंढी अशा प्राण्यांना निपाह विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.
एका माणसापासून दुसऱ्या माणसालाही संसर्ग होण्याची शक्यता
या प्राण्यांच्या थेट संपर्कात आल्यानंतर माणसाला निपाह विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. एका माणसापासून दुसऱ्या माणसालाही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच संक्रमित अन्नाचे सेवन केल्यानंतर, निपाह विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. सीडीसीने सांगितल्यानुसार बांगलादेश आणि भारतात एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीलाही या विषाणूचा संसर्ग झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
निपाह हा विषाणू १९९८-९९ या काळात पहिल्यांदा आढळला होता. तेव्हापासून या विषाणूचा अनेकदा उद्रेक झालेला आहे. दक्षिण आणि आग्नेय आशियात या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अनेकदा आढळले आहेत. बांगलादेशमध्ये २००१ सालापासून आतापर्यंत १० वेळा विषाणूचा उद्रेक झालेला आहे. भारतातील पश्चिम बंगाल राज्यात २००१ व २००७ साली निपाह विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले होते. २०१८ साली केरळमध्येही काही रुग्ण आढळले होते. २०१९ व २०२१ सालीदेखील काही रुग्णांची नोंद झाली होती.
निपाह विषाणू संसर्गाचे प्रमाण किती?
करोनाच्या SARS-CoV-2 या विषाणूच्या तुलनेत निपाह विषाणूचा संसर्गवेग कमी आहे. मात्र, संसर्गवेग कमी असला तरी या विषाणूच्या संसर्गामुळे होणारा मृत्युदर करोना विषाणूच्या तुलनेत अधिक आहे. २००१ साली पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे या विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर एकूण ६६ पैकी ४५ जणांचा मृत्यू झाला होता. २००७ साली याच राज्यातल्या नादिया जिल्ह्यातील सर्व पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ साली केरळामध्ये १८ पैकी १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. एप्रिल २०२० मध्ये ‘निपाह विषाणू : भूतकाळातील उद्रेक आणि भविष्यातील नियंत्रण’ नावाने एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला होता. या अभ्यासानुसार १९९९ साली मलेशियात एकूण २६५ जणांना निपाह विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यातील १०५ रुग्ण मृत्युमुखी पडले होते.
संसर्गदर कमी असल्यामुळे नियंत्रण मिळवणे सोपे
संसर्गदर कमी असल्यामुळे निपाह विषाणूच्या संसर्गावर लवकर नियंत्रण मिळवता येते. एका माणसापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होण्याचेही प्रमाण कमी आहे. त्यामुळेही या विषाणू संसर्गावर लवकर नियंत्रण मिळवणे शक्य होते. नोआखाली येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे संशोधक पी. देवनाथ आणि चित्तगॉंग विद्यापीठाचे एच. एम. ए. ए. मसूद यांनी २०२१ साली एक अभ्यास प्रकाशित केला होता. त्या अभ्यासानुसार निपाह विषाणूचा प्रजनन क्रमांक [Reproductive Number (R०)] हा ०.४८ आहे. जेवढा जास्त प्रजनन क्रमांक तेवढीच जास्त संसर्गाची क्षमता, असे मानले जाते. निपाह विषाणूचा प्रजनन क्रमांक हा ०.४८ म्हणजेच एकपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. याच कारणामुळे या विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळवणे तुलनेने सोपे होते.