मधुमेह हा जगातील गंभीर आजारांपैकी एक आहे. २०२४ मध्ये या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या तब्बल ८०० दशलक्ष एवढी होती. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये निम्म्याहून अधिक लोकांना उपचार मिळाले नाहीत. १९९० पासून जागतिक स्तरावर मधुमेहाचा फैलाव दुप्पट होऊन सुमारे सात टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे, असे गेल्या वर्षी द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात आढळले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी कुपोषणाशी संबंधित मधुमेह हा या आजाराचा एक वेगळा प्रकार असल्याचे म्हटले आहे. थायलंडमधील बँकॉक इथे नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ)च्या एका कार्यक्रमात याबाबत माहिती देण्यात आली. पण, टाईप-५ मधुमेह म्हणजे नेमके काय आणि तो टाईप-१ आणि टाईप-२ मधुमेहापेक्षा कसा वेगळा आहे ते जाणून घेऊ…
टाईप-५ मधुमेह म्हणजे नेमके काय?
हा कुपोषणाशी संबंधित मधुमेह आहे. मधुमेहाचा हा प्रकार सामान्यतः कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये दुबळ्या, कुपोषित किशोरवयीन व पौगंडावस्थेतील व्यक्तींमध्ये दिसून येतो. जगभरात प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिकेत अंदाजे २०-२५ दशलक्ष लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
महत्त्वाचे म्हणजे टाईप-५ मधुमेह किंवा कुपोषणाशी संबंधित मधुमेहाबद्दल माहिती समोर आल्याची ही पहिलीच वेळ नाही. या आजाराबाबत पहिल्यांदा १९५५ मध्ये जमैकामध्ये बोलले गेले होते. त्यावेळी कुपोषणाशी संबंधित मधुमेहाची व्याख्या जे-टाईप मधुमेह अशी करण्यात आली होती. १९८५ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने त्याचा वर्गीकरणात समावेश केला होता. मात्र, नंतर १९९९ मध्ये फॉलो-अप अभ्यास आणि सहायक पुराव्यांअभावी याचा समावेश वगळण्यात आला.
टाईप-५ मधुमेहाबाबत जागरूकता आहे का?
बँकॉकमधील आयडीएफच्या कार्यक्रमात टाईप-५ मधुमेह हा अधिकृतपणे एक नवीन आजार असल्याचे सांगण्यात आले. हे नाव मुख्यत्वे मेरेडिथ हॉकिन्स-एमडी, एमएस मेडिसिनचे प्राध्यापक, अल्बर्ट आइनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनमधील ग्लोबल डायबिटीज इन्स्टिट्यूटचे संस्थापक व संचालक यांच्या एकत्रित संशोधन आणि वकिलीतून देण्यात आले आहे. “कुपोषणाशी संबंधित मधुमेहाचे निदानाचे खूप कमी प्रमाण आणि याबाबत गैरसमज किंवा कमी प्रमाणात माहिती आहे”, असे डॉ. हॉकिन्स यांनी सांगितले. “आयडीएफने टाईप-५ मधुमेह म्हणून मान्यता देणे हे या आरोग्य समस्येबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे”, असेही त्या म्हणाल्या.
टाईप-५ मधुमेह वेगळा कसा?
टाईप-५ मधुमेह त्याच्या इतर प्रकारांपेक्षा किती वेगळा आहे हे समजून घेण्यासाठी मधुमेहाचे प्रकार समजून घेऊ. टाईप-१ मधुमेह एक जुनाट ऑटोइम्युन (स्वयंप्रतिकार) रोग आहे. त्यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती आपल्याच शरीरातील निरोगी पेशी व ऊतींवर हल्ला करते आणि त्या नष्ट करते. त्यामुळे इन्सुलिनची कमतरता निर्माण होते. इन्सुलिन ग्लुकोज (साखर) ऊर्जेसाठी पेशींमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते.
लठ्ठपणामुळे होणाऱ्या मधुमेहाला टाईप-२ मधुमेह म्हणतात. विकसनशील देशांमध्ये मधुमेहाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये हा प्रकार आढळतो. दरम्यान, अमेरिकन डायबिटीज असोसिएशन टाईप-३ मधुमेहाचे वर्गीकरण एका जनुकामुळे सिस्टिक फायब्रोसिससारख्या बाह्य स्वादुपिंडाच्या आजारांमुळे औषध किंवा केमिकल्सने उद्भवणाऱ्या मधुमेहामुळे होतो, असे केले जाते. टाईप-४ हा गर्भावस्थेतील मधुमेह आहे. डॉ. हॉकिन्स यांच्या मते, २००५ मध्ये जागतिक आरोग्य बैठकांमध्ये शिकविताना त्यांना पहिल्यांदाच कुपोषणाशी संबंधित मधुमेहाची माहिती मिळाली. “विविध देशांतील डॉक्टरांनी त्यांना असाधारण प्रकारच्या मधुमेहाचे अनेक रुग्ण दिसत असल्याचे सांगितले”, असे त्या म्हणाल्या.
“हे रुग्ण तरुण आणि बारीक होते. त्यावेळी त्यांना टाईप-१ मधुमेह असल्याचे निदान करण्यात आले. त्यावर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन इंजेक्शनने उपचार करता येतात. मात्र, इन्सुलिन इंजेक्शन या रुग्णांसाठी उपयोगी ठरले नाही. काही रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अति प्रमाणात कमी झाले. या रुग्णांना टाईप-२ मधुमेह असल्याचेही दिसून आले नाही. टाईप-२ मधुमेह लठ्ठपणाशी संबंधित आहे. हे सर्व प्रचंड गोंधळात टाकणारे होते.” त्यानंतर त्यांच्या पुढील संशोधनात असे उघड झाले की, टाईप-५ मधुमेह आणि टाईप-१, टाईप-२ मध्ये फरक आहे. अभ्यासाच्या प्रमुख निष्कर्षांवरून असे दिसून आले की, या प्रकारचे मधुमेह असलेल्यांमध्ये इन्सुलिन शरीरातून बाहेर टाकण्याच्या क्षमतेत एक गंभीर दोष असतो आणि हा दोष यापूर्वी निदर्शनास आला नव्हता. तसेच १८.५ किलो/मीटरपेक्षा कमी बॉडी मास इंडेक्स असलेल्या लोकांमध्ये टाईप-५ मधुमेह दिसून येतो, असे वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधील एंडोक्रायनोलॉजी, मधुमेह व चयापचय विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. निहाल थॉमस यांनी म्हटले आहे. या प्रकाराचा अभ्यास करण्यासाठी डॉ. थॉमस यांनी डॉ. हॉकिन्स यांना सहकार्य केले होते.
टाईप-५ मधुमेहावर उपचार
“कुपोषणाशी संबंधित मधुमेह क्षयरोग, एड्स इतकाच सामान्य आहे. मात्र, त्याचे अधिकृत नाव नसल्याने रुग्णांचे निदान करण्याच्या किंवा प्रभावी उपचार शोधण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण होतो. टाईप-५ मधुमेहाची औपचारिक मान्यता या आजाराशी लढण्यास मदत करेल, जो अनेकदा प्राणघातक ठरू शकतो”, असे डॉ. हॉकिन्स यांनी सांगितले. मग टाईप-५ मधुमेहावर उपचार कसे करायचे, तर स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसली तरी डेटा असं सांगतो की, तोंडी घेतली जाणारी ओषधे आणि कमी प्रमाणात इन्सुलिन हे यावर सर्वांत प्रभावी असू शकते, असेही त्या म्हणाल्या. मेडस्केप मेडिकल न्यूजशी बोलताना त्यांनी पुढे सांगितले, “मला शंका आहे की, या रुग्णांच्या पोषणात प्रथिने जास्त प्रमाणात आणि कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असावीत. तसेच सूक्ष्म पोषक घटकांकडे लक्ष दिले गेले पहिजे. मात्र, आता अधिकृत आदेश असल्याने याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे.”
मधुमेहाचा जागतिक प्रसार वाढत असताना टाईप-५ मधुमेहाची ओळख आणि औपचारिकतेला मान्यता मिळाली आहे. लॅन्सेटच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, १९९० ते २०२२ दरम्यान प्रौढांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अंदाजे सात टक्क्यांवरून दुप्पट होऊन सुमारे १४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यात असेही म्हटले आहे की, १८ वर्षांवरील ८२८ दशलक्ष लोकांना हा आजार आहे. तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणाचे वाढते प्रमाण टाईप-२ मधुमेहाच्या साथीला चालना देत आहे.