दोन दिवसांपासून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र, तसेच तमिळनाडूचे युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्मा’वरून केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया अशा आजारांशी तुलना केली आहे. स्टॅलिन यांचा डीएमके हा पक्ष विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहे. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. हा सनातन धर्माचा अपमान असून, उदयनिधी यांचे वक्तव्य हे काँग्रेस आणि इंडिया आघाडीची अधिकृत भूमिका आहे का, असा सवाल भाजपाकडून केला जातोय. उदयनिधी यांचे विधान भविष्यात काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर भाजपाची भूमिका काय आहे? काँग्रेस पक्षाने यावर काय स्पष्टीकरण दिले आहे? भविष्यात काँग्रेसपुढे कोणती राजकीय अडचण निर्माण होऊ शकते? हे जाणून घेऊ.
उदयनिधी नेमके काय म्हणाले?
उदयनिधी २ सप्टेंबर रोजी तमिळनाडूतील चेन्नई येथे प्रोग्रेसिव्ह रायटर्स अँड आर्टिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका सभेला संबोधित करीत होते. यावेळी बोलताना त्यांनी समाजातील विषमता आणि सनातन धर्म यावर विधान केले. त्यांनी बोलताना सनातन धर्माची मलेरिया, डेंग्यू, करोना विषाणूशी तुलना केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन करण्याची भूमिका त्यांनी मांडली. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं उच्चाटन केलं जायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ शकत नाही. त्यांचं उच्चाटनच करायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे विधान उदयनिधी यांनी केले होते.
काँग्रेसच्या नेत्यांची वेगवेगळी मते
काही दिवसांपूर्वीच इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मुंबईत तिसरी बैठक पार पडली. या बैठकीत एकूण २८ पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. डीएमके पक्षाचे प्रमुखदेखील या बैठकीला हजर होते. यावेळी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने भाजपाचा सामना करायचा, असा निर्धार या पक्षांनी केला. तमिळनाडूमध्ये काँग्रेस आणि डीएमके पक्षाची आघाडी आहे. त्यामुळे उदयनिधी यांचे हे विधान काँग्रेससाठी काहीसे अडचणीचे ठरू शकते. विशेष म्हणजे काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी या प्रकरणावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत.
कार्ती चिदंबरम यांनी केली पाठराखण
पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांनी उदयनिधी यांची पाठराखण केली. “सनातन धर्म हे दुसरे तिसरे काही नसून, ती जातीआधारित समाजाची एक संहिता आहे. याचे समर्थन करणारे लोक हे त्या जुन्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत,” असे कार्ती म्हणाले. कर्नाटकमधील प्रियांक खरगे यांनीदेखील उदयनिधी यांची पाठराखण केली. “जो धर्म समानतेच्या तत्त्वाचा प्रचार करीत नाही. जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो धर्मच नसतो. समानता न देणारा कोणताही धर्म हा एखाद्या रोगासारखाच आहे,” असे खरगे म्हणाले.
“हे उदयनिधी यांचे वैयक्तिक मत असावे”
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी मात्र उदयनिधी यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे सांगितले. “हे उदयनिधी यांचे वैयक्तिक मत असावे. मी त्यांच्या मताशी सहमत नाही,” असे कमलनाथ म्हणाले. तर काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनीदेखील प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे. तसेच प्रत्येक पक्षाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. आमची धर्माच्या बाबतीत भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सर्वधर्मसमभावाचं समर्थन करतो, असे वेणुगोपाल म्हणाले.
भाजपाची काँग्रेस, इंडिया आघाडीवर सडकून टीका
उदयनिधी यांच्या विधानानंतर भाजपाने इंडिया आघाडी, तसेच काँग्रेसवर सडकून टीका केली. आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह यांनी रविवारी (ता. ३ सप्टेंबर) इंडिया आघाडीला लक्ष्य केले. तुष्टीकरण आणि व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी इंडिया आघाडी सनातन धर्माचा अपमान करीत आहे, असे अमित शाह म्हणाले. तसेच राहुल गांधी हे हिंदू संघटना लष्कर-ए-तोयबा या संघटनेपेक्षाही घातक आहेत, असे म्हणतात, असेही अमित शाह म्हणाले.
“हा इंडिया आघाडीच्या राजकीय रणनीतीचा भाग आहे का?”
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीदेखील राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या ‘मोहब्बत की दुकान’ या विधानाचा दाखला देत लक्ष्य केले. चित्रकूट येथील एका सभेला संबोधित करताना “एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी हे सनातन धर्माचे उच्चाटन करायला हवे, असे म्हणतात. डेंग्यू, मलेरिया या रोगांप्रमाणेच सनातन धर्माचे उच्चाटन व्हायला हवे, असे ते म्हणाले. अशा प्रकारची विधाने करताना त्यांना कसलाही संकोच वाटत नाही. उदयनिधी यांनी केलेले विधान हा इंडिया आघाडीच्या राजकीय रणनीतीचा भाग आहे का?” असा सवाल नड्डा यांनी केला.
“मोहब्बत की दुकान लोकांमध्ये द्वेष पसरवत आहे”
“तुम्ही आगामी निवडणुकीत हिंदूविरोधी धोरण राबवणार आहात का? आपल्या देशाशी संबंधित सर्वच बाबींचा तिरस्कार असल्याचे तुम्ही वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. तुमची ‘महोब्बत की दुकान’ लोकांमध्ये द्वेष पसरवत आहे,” असे म्हणत नड्डा यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना लक्ष्य केले.
“उदयनिधी हिटलर हे समर्पक आणि योग्य नाव”
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीदेखील उदयनिधी यांचा हिटलर, असा उल्लेख केला. “सत्तेत येण्यासाठी एकत्र आलेल्या पक्षांची ही मानसिकता आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत यायचे आहे. त्यांची भूमिका ही लोकशाहीविरोधी आणि मानवताविरोधी आहे, हे स्पष्ट आहे. उदयनिधी यांच्यासाठी उदयनिधी हिटलर हे समर्पक आणि योग्य नाव आहे,” असे बोम्मई म्हणाले.
“उदयनिधी यांना अटक करा”
भाजपाचे नेते सुशील मोदी यांनी तर उदयनिधी यांना थेट अटक करण्याची मागणी केली. “उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करून थेट तुरुंगात टाकायला हवे. ते समाजात द्वेष पसरवत आहेत. एका बाजूला राहुल गांधी द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान घेऊन आलो आहोत, असे म्हणतात. तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील डीएमके पक्षाचे नेते हे सनातन धर्माचे उच्चाटन करायला हवे, असे म्हणतात. हे देशविरोधी कृत्य आहे,” असे सुशील मोदी म्हणाले.
“राहुल गांधी, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव शांत का?”
सुशील मोदी यांनी इंडिया आघाडीतील इतर नेते यावर शांत का आहेत, असा सवाल उपस्थित केला. “राहुल गांधी, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांसारखे नेते उदयनिधी यांच्या विधानावर काहीही बोलत नाहीयेत. ते शांत आहेत. हे सर्व नेते उदयनिधी यांच्या मताशी सहमत आहेत का? काँग्रेसचेही प्रमुख नेते यावर गप्प आहेत,” असा हल्लाबोल सुशील मोदी यांनी केला.
भविष्यात काँग्रेस अडचणीत?
उदयनिधी यांनी केलेले विधान काँग्रेससाठी काहीसे अडचणीचे ठरू शकते. कारण- उदयनिधी यांचा डीएमके हा पक्ष फक्त तमिळनाडू राज्यापुरताच सीमित आहे. त्यांच्या पक्षासाठी उदयनिधी यांची भूमिका रास्त आणि स्वागतार्ह ठरू शकते. मात्र संपूर्ण देशात अस्तित्व असलेल्या काँग्रेससाठी हे विधान अडचणीचे ठरू शकते. कारण- देशातील प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. उत्तरेकडील काही राज्यांत हिंदूबहुल लोक असल्यामुळे भाजपाच्या प्रचाराचा फटका काँग्रेसला बसू शकतो.
कमलनाथ यांची होऊ शकते अडचण
तमिळनाडू राज्यात काँग्रेसला डीएमके पक्षाची गरज आहे. याच कारणामुळे कार्ती चिदंबरम यांनी कसलाही विलंब न करता, उदयनिधी यांच्या विधानाची पाठराखण केली. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेसने सौम्य हिंदुत्व स्वीकारल्याचे म्हटले जाते. मध्य प्रदेशचे नेते कमलनाथ यांच्या बाबतीत तर असा दावा नेहमीच केला जातो. मध्य प्रदेशात काँग्रेस मंदिर, धर्माच्या मदतीने भाजपाचा प्रतिकार करीत आहे. वर्षभरापासून कमलनाथ वेगवेगळ्या मंदिरांत पूजा करतात. त्यांनी छिंदवाडा येथे हनुमान मंदिर उभारले आहे. त्यांनी महाकाल पूजादेखील आयोजित केली होती. असे असताना उदयनिधी यांचे हे विधान काँग्रेससाठी काहीसे अडचणीचे ठरू शकते.
उदयनिधी आपल्या मतावर ठाम
दरम्यान, उदयनिधी यांच्या विधानामुळे देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटलेल्या असताना ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. माझ्या विधानाची मोडतोड केल्याचे ते म्हणत आहेत. तसेच मी कोणत्याही खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे, असेही उदयनिधी म्हणाले. भाजपाला इंडिया आघाडीची भीती वाटत आहे. लोकांचे लक्ष विचलित व्हावे म्हणून ते असे मुद्दे काढत आहेत. एक कूळ, एक देश अशी डीएमकेची भूमिका आहे, असेही उदयनिधी म्हणाले.
“… म्हणजे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा खून करावा का?”
आपल्या सनातन धर्मावरील विधानावर वाद झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “मी फक्त सनातन धर्मावर टीका केली. तसेच सनातन धर्माचे उच्चाटन व्हावे, असे म्हणालो. मी हे विधान पुन्हा पुन्हा करीन. काही लोक मी नरसंहार करा, असे म्हणाल्याचा दावा करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारताचा नारा देतात. म्हणजेच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा खून करावा, असा या वाक्याचा अर्थ होतो का? सनातन म्हणजे कोणताही बदल न करणे. सर्व काही कायमस्वरूपी. मात्र, द्राविडियन विचारधारा ही बदलाची भाषा करते. बदलांसह सर्व जण, समान असावेत अशी द्राविडियन विचारधारा आहे. भाजपा माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत आहे,” असे उदयनिधी म्हणाले.
उदयनिधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
दरम्यान, उदयनिधी यांच्याविरोधात एका वकिलाने दिल्लीमध्ये तक्रार दाखल केली आहे. उदयनिधी यांनी आपल्या भाषणात प्रक्षोभक, द्वेषयुक्त, अपमानास्पद भाष्य केले आहे, असा आरोप या वकिलाने केला आहे.