– विनायक करमरकर

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण दोन कारणांसाठी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे ११७ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा मोठा पाणीसाठा करण्याच्या क्षमतेसाठी. दुसरे कारण म्हणजे या धरणाच्या परिसरात देशोदेशीच्या सीमा ओलांडून येणाऱ्या रोहित (फ्लेमिंगो) तसेच येथे दिसणाऱ्या सुमारे तीनशे प्रजातींच्या पक्ष्यांसाठी. दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून हे युरोप खंडातील पाहुणे उजनी धरणावर यायला सुरुवात होते. पुढे त्यांच्या मुक्काम मे अखेरपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असतो. या पक्ष्यांचा अधिवास प्रेक्षणीय असतो. हे विहंगम दृष्य पाहण्यासाठी धरणक्षेत्रात हजारो पक्षीप्रेमी येत असतात. दरवर्षी न चुकता येणाऱ्या या सगळ्या पक्ष्यांची  गेली दोन वर्षे मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. त्याचे कारण आहे, लांबलेला पाऊस. आता लांबलेला पाऊस आणि परदेशातून येणारे पक्षी यांचा संबंध काय, ते समजून घेऊया…

murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड

परदेशी पक्षी भारतात का येतात?

युरोप खंडातील कडाक्याची थंडी हे पक्षी भारतात येण्याचे मुख्य कारण. तिकडे थंडी सुरू होताच या पक्ष्यांचे स्थलांतर सुरू होते. थव्याने हे पक्षी इकडे येतात आणि एका थव्यात पाचशे ते हजारपर्यंत पक्षी असतात. असे पंचवीस ते तीस थवे उजनी धरणाच्या परिसरात येतात. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ज्या पाणथळ जागा असतात तेथे या पक्ष्यांना शेवाळयुक्त खाद्य तसेच किडे आदी उपलब्ध होतात. हे अन्न मिळत असल्याने आणि येथील हवामान मानवत असल्याने परदेशातील तसेच देशातीलही पक्षी चार-पाच महिने या परिसरात वास्तव्याला येतात.

पाणथळ जागा म्हणजे काय?

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी जसजसे कमी होत जाते तशी उथळ भागात दलदल तयार होते. या दलदलीत शेवाळ वाढते, त्यात अळ्या, किडेही असतात. हेच मुख्यत: पक्ष्यांचे अन्न. धरणातील पाणीसाठा जसजसा कमी होत जातो तसतशा घटत्या पाण्याच्या क्षेत्रात ज्या दलदलीच्या जागा तयार होतात, त्यांना पाणथळ जागा म्हटले जाते. या उथळ पाण्याच्या जागा पक्ष्यांना खाद्य मिळण्यासाठी अनुकूल असतात. शिवाय पाण्यात त्यांना मासेही मिळतात. उजनी धरणाचा पसाराच मोठा असल्याने अशा पाणथळ जागा तेथे मोठ्या प्रमाणात तयार होतात. प्रचंड संख्येने येणाऱ्या या परदेशी आणि देशी पाहुण्यांच्या खाण्यापिण्याची त्यामुळे आपोआप व्यवस्था होते.

खाद्य मिळण्यात अडचणी काय?

गेल्या वर्षी लांबलेल्या पावसामुळे उजनी धरण शंभर टक्के भरले होते. या धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने पुणे, नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून होतो. सर्वत्र सातत्याने पाऊस झाल्यामुळे उजनी धरणातील पाण्याचा वापर तुलनेने कमी झाला. परिणामी उन्हाळ्याचा प्रारंभ होतानाही धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. यंदाही हीच परिस्थिती आहे. सद्यःस्थितीत एक्क्याऐंशी टक्के एवढा पाणीसाठा धरणात आहे. हा पाणीसाठा जसजसा कमी होईल तसतशा पाणथळ जागा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात निर्माण होतील. मात्र या जागा तयार होत नसल्याने पक्ष्यांपुढे खाद्य मिळवण्यात अडचणी निर्माण झाल्या. पाणथळ जागा पुरेशा नसतील तर खाद्य मिळत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे हक्काने धरण परिसरात येणाऱ्या पक्ष्यांना गेल्या वर्षी आणि यंदाही खाद्यासाठी अन्यत्र जावे लागत आहे. पाणलोट परिसरातील पाच-दहा गावांमध्ये पक्ष्यांना मुक्काम असायचा. मात्र पाणथळ जागा पुरेशा नसल्याने यावर्षी आणखी काही गावांमध्ये हे पक्षी गेल्याचे दिसत आहे.

पर्यटकांची संख्या का वाढत आहे?

उजनी धरण परिसर पक्षीप्रेमी, पक्षी अभ्यासक, निरीक्षक, निसर्गप्रेमींचे आकर्षण बनला आहे याचे कारण येथे हजारोंच्या संख्येने दिसणारे रोहित आणि अन्य परदेशी पक्षी. या परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांबरोबरच राज्याच्या इतर जिल्ह्यांतून आणि गुजरातसह अन्य राज्यांतूनही येथे पक्षी स्थलांतरित होतात. या परिसरात आतापर्यंत तीनशेहून अधिक प्रजातींची नोंद  झाली असल्याचे पक्षी अभ्यासक संदीप नगरे सांगतात. हे पक्षी पाहण्यासाठी पुणे, मुंबई आणि अनेक शहरांतून जसे पर्यटक वाढत्या संख्येने येत आहेत तसे कर्नाटक, गुजरातमधूनही पर्यटक येत लागल्याचे निरीक्षण नगरे यांनी नोंदवले. या परिसरात शनिवार आणि रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यांना पक्ष्यांची माहिती देण्यासाठी या भागात अनेक तरुण आता पर्यटकांचे मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड) म्हणूनही काम करू लागले आहेत. पर्यटकांसाठी निवास, भोजन आदी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय, तसेच निवास आणि न्याहारी योजनाही अनेक गावांमध्ये सुरू आहे.

vinayak.karmarkar@expressindia.com

Story img Loader