एजाजहुसेन मुजावर
दुष्काळी सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायी म्हणून बांधण्यात आलेल्या उजनी धरणाचे पाणी पुन्हा एकदा पेटले आहे. या धरणातील काही पाणी हे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूरकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यात या विरोधात रोष व्यक्त होऊ लागला आहे. यानिमित्ताने उजनीच्या पाण्याचा हा वेध..
उजनी धरणाचा प्रवास कसा?
उजनी हे महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. ब्रिटिश राजवटीत सर्वप्रथम १९०ं२ साली एफ. एच. बोवेल या ब्रिटिश अभियंत्याने उजनी धरणाचा आराखडा तयार केला होता. स्वातंत्र्यानंतर धरणाच्या उभारणीला चालना मिळाली. कृष्णेची उपनदी असेल्या भीमा नदीवर सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी येथे १९६४ साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या धरणाची पायाभरणी केली. १९८० साली ९६.४४ कोटी खर्च करून धरण पूर्ण झाले आणि १९८४ सालापासून धरणात पाणीसाठा होऊ लागला. एकूण १२३ टीएमसी क्षमतेच्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ५४ टीएमसी, मृतसाठा ६३ टीएमसी आणि अतिरिक्त पाणीसाठा ६ टीएमसी आहे. या पाण्यावर सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. शिवाय या पाण्यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्ह्याचा कायापालट होत येथील कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली. फळबागांचे जाळे, मोठ्या प्रमाणावरील ऊस उत्पादन, त्यावर सुरू झालेले ३३ साखर कारखाने हे सारे या उजनीच्या जिवावरच घडले.
धरणाचे पाणीवाटप कसे?
उजनी धरणाची निर्मिती ही प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात आलेली आहे. यातील मूळ शेती सिंचन आराखडा बारमाही पद्धतीचा होता. यात एक लाख ८० हजार १६७ हेक्टर क्षेत्रास पाणी द्यायचे होते. परंतु ते शक्य नाही असे दिसू लागताच १९८६ साली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात बारमाहीऐवजी आठमाही पीक सिंचन योजना हाती घेत त्यात दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट आदी तालुक्यांना सिंचनासाठी पाणी देण्याचा मार्ग खुला झाला. परंतु सिंचनाच्या योजना नसणे, अपुरा पाणीपुरवठा यामुळे अद्याप या भागापर्यंत हे पाणी पोहोचलेलेच नाही. सोलापूरच्या काही भागांत कृषी क्रांती घडवणाऱ्या या पाण्याची अजून अन्य भागांसाठी गरज असतानाच, आता यातील काही हिस्सा इंदापूर आणि बारामतीला देण्याचा निर्णय घेतल्याने त्यातून नवा वाद जन्माला आला आहे.
सोलापूरला अपुरे पाणी का?
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पडणाऱ्या पावसावर उजनी धरण भरते. ते पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे धरणातील पाणी वापराचे जाहीर प्रकटीकरण होते. हे पाणी अगदी अल्पसे कालव्याद्वारे तर मोठ्या प्रमाणात नदीवाटे सोडले जाते. ज्यावर सोलापूर जिल्ह्यातील विविध पाणी योजनांच्या माध्यमातून शेतीसाठीचे सिंचन केले जाते. तसेच सोलापूर शहरासाठी जलवाहिनी आणि नदीवाटेच पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही गरजा वर्षभराचा अंदाज घेत भागवल्या जातात. प्रत्यक्षात धरण भरले तरी त्यात साठलेला गाळ, उपलब्ध होणारे पाणी आणि वर्षभरात होणारे बाष्पीभवन यामुळे सोलापूरला हे पाणी कमीच पडते. मूळ नियोजनात ठरलेल्या सोलापूरच्या टोकाशी असलेल्या भागापर्यंत अद्याप या धरणाचे पाणी पोहोचलेलेच नाही. यामागे या धरणाच्या पाणी वितरण व्यवस्थेतील अपुरी सिंचन योजना याचेही कारण पुढे येते. या सर्व अभावग्रस्त अवस्थेत या पाण्याला पुन्हा इंदापूर आणि बारामतीकडे फाटे फुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने सोलापूरमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे.
सध्याच्या वादाची पार्श्वभूमी काय?
उजनी धरणाचे बहुतांशी म्हणजे सुमारे ८२ टीएमसी पाणी सोलापूर जिल्ह्यातील वंचित भागासाठी नियोजित असले तरी मूळ उपसा सिंचन योजनाच अर्धवट असल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून बहुसंख्य तालुके अद्याप तहानलेले आहेत. वास्तविक या योजना तातडीने पूर्ण करत सोलापूरच्या तहानलेल्या भागात पाणी पोहोचवणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या दत्ता भरणे यांनी आपला इंदापूर तालुका आणि पक्षनेतृत्वाच्या बारामती तालुक्याला फायद्याची ठरणारी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना शासनाकडून हळूच मंजूर करून घेतली, अशी चर्चा आहे. याची कुणकुण मागील वर्षीच आल्याने त्यावेळेपासूनच याविरुद्ध आंदोलनास सुरुवात झालेली होती. परंतु असा कुठलाही विषय नसल्याचे सांगत त्यावेळी हा प्रश्न शांत केला गेला. दरम्यान, नुकतीच ३४८ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सोलापूरकरांचा संताप बाहेर आला आहे. तहानलेल्या सोलापूरकरांच्या अगोदर हे पाणी पुन्हा एकदा सधन अशा इंदापूर आणि बारामती भागांत वळवण्याच्या या हालचालींवर राजकीय पक्ष-नेत्यांपासून ते सर्वसामान्य जनतेतूनही रोष व्यक्त होऊ लागला आहे.
aejajhusain.mujawar@expressindia.com