नागालँड राज्यातील १९व्या शतकातील नागा मानवी कवटीच्या ब्रिटनमधील लिलावाचा भारतात विरोध करण्यात येत आहे. भारताच्या तीव्र विरोधानंतर आता या नागा मानवी कवटीचा लिलाव मागे घेण्यात आला आहे. ऑक्टोबर ९ रोजी ऑक्सफर्डशायरमधील टेट्सवर्थ येथील प्रख्यात लिलावगृह ‘द स्वान’ने विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंमध्ये शिंग असलेल्या नागा कवटीचादेखील समावेश होता. ही माहिती मिळताच नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ आणि फोरम फॉर नागा रिकन्सिलिएशनच्या (एफएनआर) ईशान्य राज्यातील नेत्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या लिलावात हस्तक्षेप करून ही विक्री थांबवण्याची विनंती केली. अखेर भारताच्या हस्तक्षेपानंतर या कवटीचा लिलाव मागे घेण्यात आला. परंतु, या कवटीच्या लिलावावरून भारतात विरोध का? ‘नागा मानवी कवटी’चे महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.
‘द क्युरियस कलेक्टर सेल’
ऑक्सफर्डशायर लिलावगृहाने बुधवारी ‘द क्युरियस कलेक्टर सेल’मध्ये मानवी अवशेष असलेल्या २० हून अधिक वस्तूंचा समावेश केला होता. त्यामध्ये पुरातन काळातील पुस्तके, हस्तलिखिते, चित्रे आणि मातीची भांडी यांच्याबरोबरच जगाच्या विविध भागांतील कवट्या आणि अवशेषांचा संग्रह होता. १९व्या शतकातील बेल्जियन वास्तुविशारद फ्रँकोइस कॉपेन्स यांच्याकडे सापडलेली नागा कवटीला या लिलावात ६४ क्रमांक देण्यात आला होता. या कवटीची किंमत अंदाजे २.३० लाख रुपये होती, लिलावकर्त्याच्या अंदाजानुसार बोलीसाठी याची सुरुवात ४.३९ लाखांपासून होणार होती. ‘एएफपी’नुसार, लिलावातील इतर अवशेषांमध्ये पापुआ न्यू गिनी, बोर्नियो आणि सोलोमन बेटे, तसेच बेनिन, काँगो-ब्राझाव्हिल, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि नायजेरियासारख्या देशांतील आफ्रिकन वस्तूंचाही समावेश आहे.
हेही वाचा : इस्रायलच्या हल्ल्यात नसराल्लाहचा उत्तराधिकारी हाशेम सफीद्दीन खरंच मारला गेला का? हिजबुलचे पुढे काय होणार?
बेल्जियम, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्समधील खाजगी युरोपियन कलेक्शनमधून या वस्तू मिळवण्यात आल्या होत्या. नागा मानववंशशास्त्रज्ञ डॉली किकॉन यांनी लिलावाचा निषेध केला आणि असे नमूद केले की, अशा कोणत्याही वस्तूची विक्री अस्वीकार्य आहे. “२१ व्या शतकात स्थानिक मानवी अवशेषांचा लिलाव करणे हे दर्शविते की, वसाहतकर्त्यांचे वंशज विशिष्ट समुदायांवर वर्णद्वेष आणि वसाहतवादी हिंसाचार लिलावाचा कायम कसा आनंद घेतात,” असे त्यांनी ‘एएफपी’ला सांगितले. त्यांनी पुढे प्रश्न केला, “जर आपल्याकडे प्राणी आणि पक्ष्यांची ने-आण रोखण्यासाठी कायदे आहेत, तर सरकार लोकांकडून चोरीला गेलेल्या देशी मानवी अवशेषांचा लिलाव का थांबवत नाहीत?”
‘अत्यंत भावनिक आणि पवित्र मुद्दा’
लिलाव करणार्या संस्थेला फोरम फॉर नागा रिकन्सिलिएशन (एफएनआर) कडून टीकांचा सामना करावा लागला. त्यांनी नमूद केले की, वडिलोपार्जित अवशेषांची विक्री अमानवीय आहे. हा मुद्दा आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि पवित्र आहे. मृतांच्या अवशेषांना आदर आणि सन्मान देण्याची आमच्या समाजाची परंपरा आणि प्रथा आहे, असे त्यांनी नमूद केले. बाप्टिस्ट पुजारी आणि एफएनआरचे नेते वती आयर यांनी लंडनला सर्व कवट्या परत करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “ब्रिटीश राजवटीच्या संपूर्ण काळात, नागा लोकांची ओळख ‘असभ्य’ आणि ‘हेडहंटर’ अशी होती. या लिलावावरून तीच ओळख आजही कायम असल्याचे चित्र आहे, जो समाजाचा अपमान आहे.” ते पुढे म्हणाले की, हे अवशेष ब्रिटीश वसाहतवादी शक्तींनी नागांवर केलेल्या हिंसाचाराचे प्रतीक आहेत.
नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे परराष्ट्र मंत्र्यांना पत्र
नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनीदेखील लिलावाचा निषेध केला आणि याचे आदिवासी लोकांविरुद्ध वसाहतवादी हिंसाचार म्हणून वर्णन केले. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली. आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी नमूद केले, “ब्रिटनमध्ये नागा मानवाच्या अवशेषांच्या प्रस्तावित लिलावाचा सर्व वर्गांनी निषेध केला आहे, कारण ही आमच्या लोकांसाठी अत्यंत भावनिक आणि पवित्र बाब आहे. मृतांच्या अवशेषांना सर्वोच्च आदर आणि सन्मान देण्याची आपल्या लोकांची परंपरागत प्रथा आहे.” ‘एफएनआर’ने आग्रह धरला की, नागाच्या वडिलोपार्जित मानवी अवशेषांना प्राधान्याने त्यांच्या भूमीत परत आणले जावे.
मुख्य म्हणजे, नागा समुदाय ऑक्सफर्ड, इंग्लंडमधील पिट रिव्हर्स म्युझियममध्ये ठेवलेल्या वडिलोपार्जित अवशेषांवर पुन्हा हक्क मिळवण्याचा अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. हे अवशेष ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारादरम्यान आणि वसाहती राजवटीच्या काळात गोळा केलेल्या सुमारे ६,५०० नागा वस्तूंच्या संग्रहाचा भाग आहेत, जे एका शतकाहून अधिक काळ संग्रहालयात आहेत. संग्रहालयाच्या संचालिका लॉरा व्हॅन ब्रोखोव्हेन यांनी अशा वस्तूंच्या लिलावाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “या वस्तू त्या समुदायाकडून घेतल्या गेल्या ही वस्तुस्थिती खरोखरच वेदनादायक आहे आणि त्या विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत, ही वस्तुस्थिती अनादरकारक आहे.”