युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसून संघर्ष आणखी वाढताना दिसत आहे. सध्या युक्रेनच्या एका धाडसी कृत्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. युक्रेन सीमेला लागून असणार्या रशियातील कुर्स्क प्रांतात युक्रेनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. सैनिकांनी सीमा ओलांडली असून रशियाच्या ३० किलोमीटर आत युक्रेनचे सैन्य पोहोचले आहे. याविषयी अचूक माहिती नसून वेगवेगळ्या वृत्तपत्रांद्वारे वेगवेगळी माहिती दिली जात आहे. युक्रेनी सैनिकांनी ब्रिटीश ‘चॅलेंजर २’ या रणगाड्यासह सीमा पार केल्याची माहिती, ब्रिटीश वृत्तपत्रांनी दिली आहे. ‘चॅलेंजर २’ रणगाडे किती जुने आहेत? युक्रेनी सैनिकांनी युद्धात आजवर त्याचा वापर का केला नाही? रणगाड्यांमुळे रशियामध्ये तणावाचे वातावरण का निर्माण झाले आहे? जाणून घेऊ.
यूकेच्या एका लष्करी स्त्रोताने याविषयी माहिती देत सांगितले की, हे रणगाडे कुर्स्क प्रदेशात कीवच्या हल्ल्याचा भाग एक आहेत. या रणगाड्यांसह सुसज्ज असलेल्या कीवची ८२ वी एअर ॲसॉल्ट ब्रिगेड या ऑपरेशनमध्ये केंद्रस्थानी आहे. ब्रिटन संरक्षण मंत्रालयानेही (एमओडी) सांगितले आहे की, युक्रेनला ब्रिटनने पुरवलेली शस्त्रे स्वसंरक्षणासाठी वापरण्याचा अधिकार आहे. परंतु, स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रांचा वापर युक्रेनियन प्रदेशापुरता मर्यादित आहे. मॉस्कोच्या संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या फुटेजमध्ये युक्रेनियन सैन्याने घुसखोरी केलेल्या सुडझा शहराजवळ रशियन कामिकाझे ड्रोनने ‘चॅलेंजर २’ रणगाड्याला धडक दिल्याचे दिसते आणि त्यात रणगाडा नष्ट झाल्याचे दिसते. परंतु, विश्लेषकांनी या फुटेजच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की, रशियन स्त्रोतांनी दावा केल्यानुसार रणगाडा नष्ट झाला नसावा.

हेही वाचा : शेख हसीना यांचे भारतातून बांगलादेशात प्रत्यार्पण होणार? भारताच्या अडचणी वाढणार? प्रत्यार्पण म्हणजे काय?
ब्रिटनचे ‘चॅलेंजर २’ रणगाडे किती जुने आहेत?
‘चॅलेंजर २’ रणगाडे विकर्स डिफेन्स सिस्टीम्स (आता बीएई सिस्टीम्स) द्वारे डिझाइन केलेले आणि तयार केले गेले आहेत. १९९४ मध्ये हे रणगाडे कार्यरत झाले. अगदी तेव्हापासून हे रणगाडे ब्रिटीश आर्मड फोर्सचा आधारस्तंभ ठरत आहे. ‘चॅलेंजर १’ विकसित करून ‘चॅलेंजर २’ हे रणगाडे तयार करण्यात आले आहेत. अनेक मोठ्या संघर्षांमध्ये या रणगाड्यांचा समावेश होता. हे रणगाडे संपूर्ण ब्रिटनमध्ये चार आर्मर्ड रेजिमेंटमध्ये सेवा देत आहेत. प्रत्येक रेजिमेंटकडे ५६ चॅलेंजर २ रणगाडे आहेत. त्यामुळे ब्रिटीश सैन्यामध्ये या रणगाड्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चॅलेंजर २ च्या डिझाइन आणि त्यातील विशेष उपकरणांमुळे युक्रेनियन संघर्षात त्याच्या तैनातीमध्ये आव्हाने निर्माण झाली, तिथे रणगाड्यांना कठोर भूभाग आणि अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

ब्रिटनने १४ रणगाडे देऊनही युक्रेनी सैनिकांनी युद्धात त्याचा वापर का केला नाही?
युक्रेनियन सैन्याने चॅलेंजर २ रणगाड्यांचा वापर आजपर्यंत खूप कमी प्रमाणात केला, मुख्यत्वे त्यांच्या विशिष्ट डिझाइन आणि ऑपरेशनल मर्यादांमुळे. ब्रिटनने युक्रेनला १४ ‘चॅलेंजर २’ रणगाडे दिले होते, परंतु गेल्या उन्हाळ्यात दक्षिण युक्रेनमधील रोबोटिनच्या आसपासच्या लढाईत एक रणगाडा नष्ट झाला. या रणगाड्याचे वजन ७१ टन आहे. हे रणगाडे युक्रेनच्या मऊ मातीत अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. युक्रेनियन ‘चॅलेंजर २’चे क्रू सदस्य यांनी ब्रिटनच्या ‘द सन’शी बोलताना सांगितले, रणगाडयात रायफल एल३० या १२० मिलीमीटर तोफमुळे अनेक आव्हाने उभी होत आहेत. युक्रेनियन मीडियाने वृत्त दिले की, मार्च २०२४ पर्यंत मूळ १४ चॅलेंजर २ रणगाड्यांपैकी फक्त सात रणगाडे लढाऊ स्थितीत आहेत. रणगाड्यांना वारंवार दुरुस्तीची आवश्यकता असते, त्यामुळे याच्या वापराला विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : मानवनिर्मित आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या पनामा कालव्याचे अस्तित्व धोक्यात; कारण काय?
रणगाड्यांमुळे रशियामध्ये तणावाच्या वातावरणाचे कारण काय?
युक्रेनच्या क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन्समध्ये चॅलेंजर २ रणगाड्याच्या वापरामुळे रशिया आणि पश्चिमेकडील तणावाच्या संभाव्य वाढीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. रणांगणावरील यशाला बळकटी देण्यासाठी कीवच्या व्यापक रणनीतीचा एक भाग म्हणून या रणगाड्यांच्या तैनातीकडे पाहिले जात आहे. माजी ब्रिटीश टँक कमांडर हॅमिश डी ब्रेटन-गॉर्डन यांनी याविषयी सांगितले आहे. युक्रेनच्या आग्नेय आणि पूर्वेकडील चार प्रांतांच्या काही भागांवर रशियाने कब्जा केला आहे. परंतु, मुख्य म्हणजे आतापर्यंत रशियाला निर्णायक विजय मिळवता आलेला नाही, हेही तितकेच खरे आहे. या युद्धात दोन्ही बाजूंकडील आणि विशेषतः युक्रेनचे जास्त नुकसान होत आहे. चॅलेंजर २ रणगाडे रशियाच्या युद्ध रणनीतीवर भारी पडू शकतात. या रणगाड्यांमध्ये १२० एमएम गन, दोन ७.६२ एमएम मशीनगन आणि चार क्रूची जागा आहे. त्यामुळे युक्रेनियन शस्त्रागाराची ताकद वाढेल हे नक्की. यामुळेच रशियात तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.