ब्रिटनमध्ये हुजूर पक्षाची (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) १४ वर्षांची सत्ता नाट्यमयरीत्या संपुष्टात आली आहे. देशातील अनेक जटिल प्रश्न सोडविण्यात आलेले अपयश, सातत्याने नेतृत्वबदल, पक्षांतर्गत मतभेद, पक्षफुटी अशा अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या या पक्षाला ब्रिटनच्या जनतेने सत्तेतून खाली खेचले. त्याच वेळी त्रिशंकू सभागृह न ठेवता बदल घडविण्याचे आश्वासन देणाऱ्या मजूर पक्षाला (लेबर पार्टी) स्पष्ट बहुमत देत संधी दिली. या निकालाची कारणे, परिणाम यांचा आढावा…

आजवरचा सर्वांत वाईट निकाल…

गेल्या पाच वर्षांत अनेक नकोसे विक्रम नोंदविणाऱ्या हुजूर पक्षाने निवडणुकीतही आतापर्यंतच्या सर्वांत वाईट पराभवाची नोंद केली आहे. ६५० सदस्यांच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजूर पक्षाने ४००पेक्षा जास्त जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. टेन, डाऊनिंग स्ट्रीट या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानातून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना गाशा गुंडाळावा लागणार असून मजूर पक्षाचे नेते सर कीर स्टार्मर ब्रिटनचे पुढले पंतप्रधान असतील, हे निश्चित झाले आहे. हुजूर पक्षाची कामगिरी काही मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तविलेल्या अंदाजांइतकी खराब झाली नसली, तरी तब्बल २१८ सदस्य गमावत आजवरच्या सर्वांत मोठ्या पराभवाची नोंद पक्षाने केली आहे. स्टार्मर यांनी हुजुर पक्षाची १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली असली, तरी १९९७ साली त्यांच्या पक्षाचे नेते टोनी ब्लेअर यांचा विक्रम (४१८ जागा) मोडण्याची त्यांची संधी थोडक्यात हुकली आहे.

Economic decline state government Sharad Pawar Vijay Wadettiwar criticize the government
आर्थिक घसरणीवरून राज्य सरकार लक्ष्य! शरद पवार, विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Ratan Tata Successful businessman with social consciousness
रतन टाटा : सामाजिक जाणीव राखणारा यशस्वी उद्योगपती
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
tamil nadu Politics
विश्लेषण: तमिळनाडूच्या राजकारणात आणखी एक सुपरस्टार! एमजीआर, जयललिता, कमलहासन यांची गादी विजय चालवणार का?
dgp Rashmi Shukla
रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी विरोधकांकडून का होतेय? झारखंड पोलीस महासंचालकांचा संदर्भ काय?
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला
Assets soar of Maharashtra cabinet ministers
पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?

हेही वाचा : टिळा वा तत्सम धार्मिक प्रतीकांना मनाई; लष्कराने सैनिकांना का करून दिली गणवेश नियमांची आठवण?

स्टार्मर, सुनक यांच्या प्रतिक्रिया काय?

सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला ३२६चा आकडा पार केल्यानंतर ब्रिटनच्या मावळत्या आणि भावी पंतप्रधानांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. सुनक यांनी पराभव मान्य करत मजूर पक्ष आणि स्टार्मर यांचे अभिनंदन केले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितल्यामुळे ते हुजूर पक्षाचे नेतेपदही आगामी काळात सोडतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. स्टार्मर यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केल्याचेही सुनक यांनी जाहीर केले. पंतप्रधानांच्या प्रतिक्रियेनंतर काही मिनिटांतच स्टार्मर यांनी पाठिराखे आणि माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही करून दाखविले. ब्रिटनमध्ये या क्षणाला बदल घडणे सुरू झाले आहे,” असे ते म्हणाले.

स्पष्ट बहुमत, तरी ५ वर्षांत ३ पंतप्रधान!

सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे प्रस्थापितविरोधी लाटेचा पक्षाला फटका बसला. मात्र हे एकमेव कारण नाही. १४ वर्षांच्या राजवटीत, विशेषत: अखेरच्या पाच वर्षांत सरकारची कामगिरी कायम टिकेच्या केंद्रस्थानी राहिली. आर्थिक आघाडीवर पीछेहाट, गृहनिर्माणाचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, स्थलांतरितांचे प्रश्न अशा अनेक आघाड्यांवर हुजूर नेत्यांची कामगिरी सुमार म्हणावी अशीच राहिली. पाच वर्षांच्या कार्यकाळात पक्षाने ३ नेते आणि पर्यायाने तीन पंतप्रधान दिले. बोरीस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. लिझ ट्रस या सर्वात कमी काळ पंतप्रधान राहिल्या आणि नंतर देशाची धुरा सुनक यांच्याकडे आली. एका अर्थी, बहुमत असूनही नेतृत्वात अस्थैर्य असे काहीसे चित्र गेल्या पाच वर्षांत निर्माण झाले. या धरसोडीच्या राजकारणात हुजूर पक्षातील गट-तट समोर आले. त्याआधीच्या कार्यकाळात ‘ब्रेग्झिट’साठी जनमत चाचणी, त्यानंतर नेतृत्वबदल, पक्षात फूट असे चित्र होते. मात्र जॉन्सन यांनी तेव्हा पक्षाला तारून नेले. सुनक यांनी मुदतपूर्व निवडणुका जाहीर करून खेळलेला जुगार मात्र फसला. २०१८ साली निगेल फराज यांनी पक्ष फोडून स्थापन केलेल्या अतिउजव्या ‘रिफॉर्म यूके’ पक्षानेही या निवडणुकीत हुजूर पक्षाला धक्का दिला.

हेही वाचा : विश्लेषण: नवी मुंबईच्या पाण्यावरच ‘हल्ला’ करण्याची वेळ मोरबे प्रकल्पग्रस्तांवर का आली?

छोट्या पक्षांची कामगिरी कशी राहिली?

‘रिफॉर्म’ पक्षाला २०१९च्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नव्हती. यावेळी मात्र पक्षाचे किमान चार सदस्य हाऊस ऑफ कॉमन्समध्ये दिसतील. त्याच वेळी अनेक जागांवर आपले उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा दावा खरा असेल, तर हुजूर पक्षाच्या एवढ्या दारूण पराभवामागे ‘रिफॉर्म’ने खाल्लेली मते असू शकतात. युरोपातील अन्य देशांप्रमाणेच ब्रिटनमध्येही उजवी विचारसरणी मूळ धरत असल्याचे हे द्योतक आहे. मजूर आणि हुजूर पक्षांनंतर ‘लिबरल डेमोक्रॅट’ हा पक्ष सभागृहात तिसऱ्या स्थानी असेल. पक्षाचे ५२ सदस्य निवडून आले असून २०१९च्या तुलनेत त्यात ४५ची वाढ झाली आहे. त्याच वेळी स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही असलेल्या ‘स्कॉटिश नॅशनल पार्टी’ची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यांचे संख्याबळ ४४वरून सातपर्यंत खाली घसरले आहे.

हेही वाचा : विश्लेषण: राज्यात दूध दराचा प्रश्न का चिघळला?

स्टार्मर यांच्यापुढील आव्हाने कोणती?

मजूर सरकारसमोर अर्थातच सर्वांत मोठे आव्हान असेल, ते आर्थिक आघाडी सांभाळण्याचे… महागाई, घरांच्या वाढलेल्या किंमती, बेरोजगारी हे प्रश्न सोडविण्यास स्टार्मर यांना प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी आगामी काळात ब्रिटनमध्ये करवाढीची शक्यता नाकारता येत नाही. मजूर पक्षाची भूमिका ‘ब्रेग्झिट’विरोधी होती. आता पुन्हा युरोपीय महासंघात परतणे शक्य नसले, तरी संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न होऊ शकेल. स्थलांतरितांचे प्रश्न सोडविण्यासही प्राधान्य द्यावे लागेल. आपल्याकडे नेतृत्व आल्यानंतर मजूर पक्ष बदलल्याचा दावा स्टार्मर करीत आहेत. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पूर्ण बहुमत असल्यामुळे त्यांना हे सिद्ध करण्याची पुरेपूर संधी आहे.

amol.paranjpe@expressindia.com