युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधील युद्ध अद्याप संपलेले नाही. या युद्धात आतापर्यंत दोन्ही बाजूचे शेकडो सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. युद्ध जिंकण्यासाठी हे दोन्ही देश एकमेकांच्या प्रदेशांवर हल्ले करत आहेत. दरम्यान, क्रिमिया भागाला रशियाच्या मुख्य भूमीशी जोडणाऱ्या पुलाची स्फोटात पुन्हा एकदा नासधूस झाली आहे. या स्फोटामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक छोटी मुलगी जखमी झाली आहे. या स्फोटानंतर पुलावरील वाहतूक खोळंबली होती. याच पार्श्वभूमीवर रशियाच्या दृष्टीने क्रिमिया पूल का महत्त्वाचा आहे? पुलावर हल्ला नेमका कोणी केला? यावर नजर टाकू या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी ऑक्टोबर २०२२ मध्ये झाला होता हल्ला

युक्रेनमधील आरबीसी वृत्तसंस्थेनुसार रशियाला क्रिमियाशी जोडणारा रस्ता आणि रेल्वेमार्ग असलेल्या पुलावर दोन स्फोट झाले आहेत. या पुलाला ‘केर्च ब्रीज’ म्हणूनही ओळखले जाते. मागील काही आठवड्यांपासून रशियन सैन्याकडून गमावलेला प्रदेश पुन्हा एकदा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी रशियन सैन्य वेगवेगळ्या कारवाया करत आहे. याच कारवायांना युक्रेनकडून जशास तसे उत्तर दिले जातेय. या सर्व घडामोडी सुरू असतानाच या पुलावर हल्ला करण्यात आला असून त्याची नासधूस झाली आहे. याआधी या पुलावर ऑक्टोबर २०२२ मध्ये हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे पुलाचे मोठे नुकसान झाले होते. काही काळासाठी हा पूल बंद ठेवण्यात आला होता. आता या पुलावर हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे.

नेमके काय घडले?

रशियामधील वॅग्नर या खासगी सैन्याशी संलग्न असलेल्या एका टेलिग्राम चॅनेलवर या स्फोटाबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. याच माहितीचा आधार घेत अल जजिरा या जागतिक पातळीवरच्या माध्यमाने क्रिमिया पुलावर सोमवारी (१३ जुलै) सकाळी ३.०४ (भारतीय वेळेनुसार सकाळी ५.३४ वाजता) आणि सकाळी ३.२० वाजता (भारतीय वेळेनुसार ५.५० वाजता) दोन स्फोट झाले. या घटनेनंतर रशियाच्या पश्चिम भागातील बेल्गोरॉड या प्रदेशाचे गव्हर्नर व्याचेसलाव ग्लॅडकोव्ह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून एक छोटी मुलगी जखमी झाली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ही घटना एक आणीबाणी असल्याचेही ते म्हणाले. मात्र, त्यांनी या स्फोटाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.

काही तासांनंतर वाहतूक सुरळीत

या घटनेचा क्रिमिया २४ ऑनलाईन या वृत्तवाहिनीने एक व्हिडीओ दाखवलेला आहे. या व्हिडीओमध्ये स्फोटानंतरची पुलाची स्थिती दाखवण्यात आली आहे. दोन स्फोट झाले असले तरी तुलनेने पुलाचे कमी नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. पुलाचा कोणताही भाग समुद्रात कोसळलेला नाही. स्फोटानंतर येथे वाहतूक खोळंबली होती. मात्र, काही तासांनंतर ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हल्ला नेमका कोणी केला?

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी या हल्ल्यानंतर रशियाची भूमिका मांडली. त्यांनी या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा दावा केला आहे. तसेच या हल्ल्यामागे ब्रिटन आणि अमेरिकेचाही हात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत; तर दुसरीकडे युक्रेनने या हल्ल्याची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही. आम्हाला डिवचण्यासाठी रशिया असे प्रकार करत आहे, असे युक्रेनने म्हटले आहे. दरम्यान, एसबीयू या युक्रेनच्या गुप्तचर संस्थेच्या हवाल्याने बीबीसीने एक वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार एसबीयू या गुप्तचर संस्थेने नौदलाच्या विशेष पथकाच्या मदतीने हा हल्ला केला आहे.

या पुलाचे महत्त्व काय आहे?

क्रिमिया पूल रशियासाठी फार महत्त्वाचा आहे. संपूर्ण रशिया देश आणि क्रिमिया या भागाला जोडणारा हा पूल एकमेव दुवा आहे. २०१४ मध्ये रशियाने क्रिमिया हा युक्रेनचा प्रांत आपल्या देशात विलीन केला होता. त्यानंतर चार वर्षांनी, २०१८ साली क्रिमियाला रशियाच्या मुख्य भूमीशी जोडण्यासाठी रस्ता आणि रेल्वेमार्गाच्या रूपात हा दुहेरी पूल सुरू करण्यात आला. ३.६ अब्ज डॉलर खर्च करून पुतिन यांचे ज्युडोमधले सहकारी अर्काडी रोटेनबर्ग यांच्या कंपनीने हा पूल उभारला होता. या पुलाच्या माध्यमातूनच रशिया क्रिमियामध्ये इंधन, अन्नधान्य तसेच अन्य साहित्य पुरवत असतो.

रशियन सैनिकांकडून याच पुलाचा वापर

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू झाल्यानंतर या पुलाला जास्तच महत्त्व प्राप्त झाले. या पुलावरूनच रशियन सैनिक शस्त्रास्त्र, वाहने, इंधन घेऊन युक्रेन भूमीत प्रवेश करतात. विशेषत: दक्षिण युक्रेनच्या खेरसन भागात तसेच झापोरिझिया प्रांतात जाण्यासाठी रशियन सैनिक याच पुलाचा वापर करतात.

…तर रशियन सैन्याला अडचणी येण्याच्या शक्यता

दरम्यान, या पुलाचे असेच नुकसान होत राहिल्यास रशियन सैनिकांना शस्त्रे तसेच अन्य बाबींचा पुरवठा करणे अवघड होण्याची शक्यता आहे. दक्षिण युक्रेनमध्ये रशियाचे सैन्य आहे, या सैन्याला गरजेच्या असलेल्या गोष्टी पुरवण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine and russia war attack on crimea bridge know detail information prd