युक्रेनच्या सीमेवर एक लाखांहून अधिक सैन्य रशियाने जमवल्यामुळे क्रिमियाप्रमाणेच युक्रेनच्या आणखी एखाद्या भूभागावर कब्जा करण्याचा रशियाचा इरादा असावा, अशी चर्चा प्रामुख्याने पाश्चिमात्य माध्यमे आणि नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. रशियाकडून आक्रमणाविषयी एकीकडे वारंवार इन्कार केला जातो. मात्र दुसरीकडे देशाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भाषाही फार सबुरीची दिसत नाहीय. या मुद्द्यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि पुतीन यांच्यात अनेकदा चर्चा झाली, ज्यातून ठोस फलनिष्पत्ती अशी काही झाली नाही. मागील काही दिवसांपासून हा रशिया विरुद्ध अमेरिका संघर्ष चिघळत असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र या संघर्षाचा भारतावरही परिणाम होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिका आणि अमेरिकेचे नाटोमधील सहकारी देशांना रशियाने युद्धाच्या दिशेने वाटचाल सुरु केल्याचं वाटत आहे. त्यासाठीच रशिया तयारी करत असल्याची चर्चा आहे. यूक्रेन मुद्द्यावरुन रशिया विरुद्ध अमेरिका असं वातावरण तापलेलं असतानाच अनेकांना शीत युद्धाचा कालावधी आठवला आहे.
दरम्यान यूक्रेनमधील अधिकाऱ्यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. मात्र पूर्व यूक्रेनमध्ये सैनिकांचा फौजफाटा आणि लष्करी छावण्या दिसत असल्याने येथील नागरिक दहशतीच्या भीती खाली आहेत. आमच्या भविष्याचा निकाल वेगवेगळ्या देशांच्या राजधान्यांमध्ये बसलेले राजकीय नेत्यांच्या हाती आहे. २०१४ पासूनच या भूभागावर रशिया फुटीरतावाद्यांविरोधात लढतोय.

भारतालाही फटका…
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी लाखो सैनिक तैनात केल्याचा उल्लेख करत दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा भूभाग बळकावण्याचा सर्वात मोठा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांची वक्तव्य आणि रशियाने घेतलेली भूमिका पाहता दोन्ही देशांमध्ये युद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. खरोखरच या देशांमध्ये युद्ध झाल्यास त्याचा फटका भारतालाही बसेल. रशियाने यूक्रेनवर हल्ला केल्यास त्यामुळे भारत इकडे आड तिकडे विहीर अशा विचित्र गोंधळामध्ये सापडेल.

चीन आणि रशिया संबंध…
या विषयामधील तज्ज्ञांच्या मते युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर रशियाला सहकारी देशांची गरज असेल. या परिस्थितीमध्ये रशियाला सर्वात मोठं समर्थन हे चीनचं आहे. पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या प्रातिबंधांमुळे चीनही रशियाला मदत करण्यासाठी उत्सुक असल्याचं चित्र आहे. युक्रेनला नाटोचं सदस्यत्व दिलं जाऊ नये या भूमिकेला चीनने पाठिंबा दर्शवला आहे. उत्तर अटलांटिक करार संघटना अर्थात ‘नाटो’मध्ये युक्रेनच्या संभाव्य समावेशावरून रशिया आक्रमक बनलेली आहे. युक्रेन नाटोमध्ये सहभागी झाल्यास या संघटनेची व्याप्ती थेट रशियाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचते. यापूर्वी पोलंड, लिथुआनिया, एस्टोनिया आणि लॅटव्हिया या देशांना नाटोमध्ये सहभागी करून विशेषत: अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, अशी रशियाच्या नेत्यांची आणि विशेषत: पुतिन यांची भावना आहे.

अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशांनी चीनवर प्रतिबंध लावले तर चीन याची भरपाई करण्यासाठी कठोर निर्णय घेऊ शकतो. यामुळे चीन आणि रशियाचे संबंध अधिक दृढ होतील. मात्र यामुळे भारत आणि रशियामधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होतील. मागील अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या रशिया आणि भारताचे संबंध चीनमुळे बिघडू शकतात.

भारताचं रशिया कनेक्शन…
भारताला पुरवल्या जाणाऱ्या लष्करी साहित्यापैकी ६० टक्के साहित्य हे रशियामधून येतं. भारत आणि रशियामध्ये काही काळापूर्वीच अनेक महत्वाच्या संरक्षण करारांवर स्वाक्षऱ्या केल्यात. यामध्ये एस ४०० मिसाइल यंत्रणा आणि एके-२०३ असॉल्ट रायफल्ससंदर्भातील करारांचा समावेश आहे. तसेच पूर्व लडाखमध्ये आधीपासूनच भारत आणि चीन संघर्ष सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला रशिया सोबतच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल असं पाऊल उलण्याची चूक करणं परवडणारं नाहीय.

अमेरिका आणि भारत…
दुसरीकडे अमेरिका सुद्धा भारताचा महत्वाचा सहकारी आहे. अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेने कायमच भारताला पाठिंबा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारत ना अमेरिकेशी वैर घेऊ शकतो ना रशियासोबत. त्यामुळेच हे युक्रेन संकट म्हणजे भारतासाठीही फार आव्हानात्मक प्रश्न ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine conflict explained usa vs russia and impact on india scsg