रशियातून युक्रेनमार्गे युरोपला पाइपद्वारे होत असलेला नैसर्गिक वायूचा पुरवठा नव्या वर्षात थांबला आहे. युक्रेनने रशियाची कंपनी ‘गॅझप्रॉम’बरोबर पुरवठ्याच्या कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रशियातून पाइपलाइनद्वारे युरोपला होणारा पुरवठा थांबविण्यात आला आहे. रशियाचा युक्रेनद्वारे असलेला मार्ग हा नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यामध्ये एकमेव असा राहिला होता. युक्रेनबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर इतर सर्व पाइपलाइनचे मार्ग यापूर्वीच बंद झाले आहेत.

रशियाच्या किती गॅस पाइपलाइन?

रशियातून युरोपला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी यामल-युरोप पाइपलाइन आणि नॉर्ड स्ट्रीम प्रकल्पांतर्गत जर्मनीला पुरवठा करणारी पाइपलाइन अशा मुख्य दोन नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन होत्या. याखेरीज युक्रेनमधून जाणारीही पाइपलाइन होती. स्लोव्हाकिया येथून चेक रिपब्लिक, ऑस्ट्रिया या देशांना या पाइपलाइनने वायूचा पुरवठा होत असे. युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर यामल-युरोप पाइपलाइन यापूर्वीच बंद झाली आहे. बाल्टिक समुद्रातून जाणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनही २०२२ पासून बंद आहे. पाइपलाइनमध्ये झालेल्या विविध ठिकाणी स्फोटांचे त्यासाठी निमित्त ठरले. युक्रेनमधून जाणारी पाइपलाइन नव्या वर्षात बंद झाली आहे. काळ्या समुद्रातून आणखी एक पाइपलाइन जाते. ती मात्र सुरू आहे. तुर्कीये, सर्बिया, इटली या देशांना तिचा फायदा आहे. मात्र, त्यातून होणारा वायूचा पुरवठा इतर पाइपलाइनमधून होणाऱ्या पुरवठ्यापेक्षा बराच कमी आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?

निर्णयाचा फटका कुणाला?

ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया आणि मोल्दोवा या देशांना युक्रेनमधून रशियाचा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबल्याचा प्रामुख्याने फटका बसणार आहे. मोल्दोवामधील काही भागातील रहिवाशांना गरम पाणी आणि हीटरसाठी होणारा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाने विद्युत हिटर वापरण्याचा तसेच खिडक्यांवर जाड पडदे टाकण्याचा सल्ला दिला आहे. स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रिया यांनी यापूर्वीच या संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी पावले उचलली आहेत. राखीव साठा केल्याने आणि संसाधने दुसरीकडे वळविल्याने नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळा येणार नाही, असा दावा ऑस्ट्रियाने केला आहे. स्लोव्हाकियाने पर्यायी मार्गासाठी अधिक दर देण्याची तयारी केली आहे. तेथेही स्थानिक ग्राहकांना चढ्या दराने इंधनखरेदी करावी लागेल. रशियनधार्जिणे मानले जाणारे स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी रशियाकडून होणारा वायूचा पुरवठा थांबल्याचे युरोपीय संघावर गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. युक्रेनला स्लोव्हाकियातून होणारा विद्युत पुरवठाही थांबविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. स्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रियामध्येही इंधन दरवाढीचा धोका आहे.

युक्रेन-रशियाचे काय नुकसान?

रशियातून युरोपला केल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायू पुरवठ्याच्या कंत्राटाचे नूतनीकरण न केल्यामुळे युक्रेनला वर्षाला जवळपास एक अब्ज अमेरिकी डॉलरना मुकावे लागणार आहे. ही नुकसानभरपाई करण्यासाठी युक्रेन स्थानिकांना केल्या जाणाऱ्या वायूच्या पुरवठ्याच्या दरात चार पटींनी वाढ करणार आहे. जवळपास ३.८२ कोटी अमेरिकी डॉलर यातून उभे राहतील. तर, रशियाची कंपनी ‘गॅझप्रॉम’ला गॅसविक्रीतून युरोपकडून मिळणाऱ्या जवळपास पाच अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान होईल. याबाबत युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी युरोपला अमेरिकेने गॅसपुरवठा वाढवावा, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘रशियाची बाजारपेठ कमी होत आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होईल. रशियाचा हा सर्वांत मोठा पराभव आहे. अमेरिकेने युरोपला आणखी नैसर्गिक वायूचा पुरवठा करावा. युरोपीय देशांनी आणीबाणीच्या काळात आता मोल्दोवाला सहकार्य करावे.

हेही वाचा >>>विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?

युरोपमध्ये आधीपासूनच तयारी

रशियाच्या पाइपलाइनद्वारे केला जाणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबेल, या संकटाची चाहून युरोपला यापूर्वीच लागली होती. गेल्या पाच वर्षांत रशियातून युरोपमध्ये पाइपलाइनद्वारे करण्यात आलेल्या वायूच्या पुरवठ्यात सातत्याने घट नोंदविली गेली आहे. युक्रेनमधून युरोपला करण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायू पुरवठ्याचा कराराचे २०२० मध्ये नूतनीकरण झाले. तत्पूर्वी २०१८ मध्ये रशियातून युरोपला विक्रमी नैसर्गिक वायूचा पुरवठा केला गेला. या वर्षात २०१ अब्ज घनमीटर वायू रशियातून युरोपला गेला. मात्र, नंतर याचे प्रमाण कमी झाले. २०२३ मध्ये हेच प्रमाण १५ अब्ज घनमीटरवर आले. त्यामुळे युरोपचा रशियातून होणारा वायूपुरवठा थांबणार, याची जाणीव युरोपातील देशांना यापूर्वीच होती आणि त्यांनी तशी पावलेही उचलली होती.

वस्तुस्थिती आणि भूराजनीती

भौगोलिकदृष्ट्या युरोपला रशिया जवळ आहे. पाइपलाइनद्वावरे गॅसपुरवठा थांबला असला, तरी लिक्विड नॅचरल गॅस (एलएनजी) मालवाहतुकीद्वारे युरोपमध्ये येतच आहे. युरोपला एलएनजीचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये रशिया सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. याखेरीज, पाइपलाइनद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद झाल्याचा फटका रशियापेक्षा युरोपीय देशांना अधिक बसेल, असा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. रशिया इतरही बाजारपेठा धुंडाळत आहे. युरोपीय देशांनी अमेरिका, कतार, नॉर्वे हे देश रशियाला पर्याय म्हणून स्वीकारले असले, तरी युरोपीय देशांचे रशियावरील अवलंबित्व संपलेले नाही.

पुढे काय?

महासत्तांच्या चढाओढीत युक्रेनी जनता भाजून निघत आहे. तसेच, गॅसच्या बाबतीतील राजकारणामुळे काही देशांना चढ्या दरांचा सामना करावा लागू शकतो. खुद्द युद्धग्रस्त युक्रेनमध्ये या दरांमध्ये मोठी वाढ करण्याचे नियोजन आहे. तत्कालीन सोव्हिएत संघ आणि अमेरिकेतील शीतयुद्धात सारे जग होरपळले. आताचे युक्रेन युद्ध आणि त्यामुळे होणारे राजकारण शीतयुद्धाचा दुसरा अंक ठरू नये. शीतयुद्धाचा अंत सोव्हिएत संघाच्या विघटनात झाला. विस्तार आणि आकाराने रशिया आजही मोठा असून, अमेरिकेच्या वर्चस्वनीतीला पुतिन यांचा विरोध आहे. रशियातून पाइपद्वारे युरोपला होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबल्याचे परिणाम तूर्तास मोठे नसले, तरी अशा भूराजनीतीची वाट निसरडी असते. शह-काटशह करताना अणुयुद्धाचा भडका उडणार नाही, याची काळजी महासत्तांनी घेणे गरजेचे आहे.

prasad.kulkarni@expressindia.com