अमोल परांजपे

रशिया-युक्रेन युद्धाच्या २००व्या दिवशी, रविवारी आघाडीवरून एक मोठी बातमी आली- रशियाने ताब्यात घेतलेल्या खारकीव्ह भागातील काही महत्त्वाचे तळ युक्रेनच्या सैन्याने परत मिळवले. अवघ्या आठवडाभरात अत्यंत जलद आणि आक्रमक आगेकूच करत युक्रेनच्या फौजांनी हे यश संपादन केले. युक्रेनसाठी राजधानी कीव्हचा पाडाव रोखणे जेवढे महत्त्वाचे होते, तेवढेच खारकीव्हमधील हा भाग ताब्यात घेणे गरजेचे होते. पण यापुढे काय होऊ शकते? 

ईझूममुळे युद्धाला कलाटणी?

खारकीव्ह भागातील ईझूम या शहरावर युक्रेनच्या फौजांनी ताबा मिळवला आहे. रशियाच्या युद्धनीतीच्या दृष्टीने हे ईझूम शहर महत्त्वाचे होते. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात रशियाने या शहरावर ताबा मिळवला आणि तिथे आपला प्रमुख लष्करी तळ उभारला. किंबहुना युद्ध आघाडीवरचा हा रशियाचा सर्वात महत्त्वाचा तळ होता. डोन्बास भागात हल्ले करण्यासाठी या तळाचा वापर रशियाकडून केला गेला. डोन्बास आघाडीवर लढणाऱ्या सैनिकांना रसद पुरवण्याचे कामही या तळावरून होत होते. हे शहर युक्रेनने जिंकल्यामुळे डोन्बासमध्ये लढणाऱ्या सैनिकांना अन्नधान्य, शस्त्रास्त्रे पुरविणे रशियाला जड जाणार आहे.

किपुआन्स्क रेल्वे स्थानकाचे महत्त्व काय?

युक्रेनच्या सैन्याने ईझूम ताब्यात घेण्याआधी खारकीव्हमधील किपुआन्स्क या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाचा ताबा मिळविला. रशियाच्या पुरवठा साखळीतील हा अत्यंत महत्त्वाचा दुवा होता. युक्रेनने किपुआन्स्कवर आपला झेंडा फडकवल्यामुळे हा दुवा निखळला आहे. ईझूम आणि किपुआन्स्कचा पाडाव झाल्यामुळे रशियाच्या सैन्याला माघार घ्यावी लागली आहे. डोन्बासमधील डोनेस्क इथे कुमक वाढवायची असल्यामुळे सैन्य तिथे नेल्याचा दावा रशियन सैन्याच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी त्यात फारसे तथ्य नाही. ही धोरणात्मक माघार नसून घाईघाईत झालेली पीछेहाट आहे. कारण रशियाने ‘पळून’ जाताना बराचसा दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे मागे सोडली आहेत. हे दोन महत्त्वाचे तळ गमावल्याचे परिणाम रशियाला डोन्बासमध्ये भोगावे लागू शकतात.

रशियासाठी डोन्बासचे धोरणात्मक महत्त्व काय?

युद्धाच्या सुरुवातीपासूनच रशियाने पूर्व भागात असलेल्या डोन्बास प्रांतावर लक्ष केंद्रित केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ‘नाटो’कडे जाण्याची तयारी केली आहे. तसे झाल्यास नाटो देशांच्या फौजा युक्रेनमार्गे थेट रशियाच्या सीमेवर येऊ शकतील. व्लादिमीर पुतीन यांचा त्याला विरोध आहे. युरोपीय महासंघ, नाटो आणि रशिया यांच्यादरम्यान एखादा ‘आघातप्रतिबंधक देश’ असावा असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्यांना डोन्बास प्रांत एक तर ताब्यात घ्यायचा आहे किंवा स्वतंत्र करायचा आहे. पूर्व युक्रेनवर ताबा मिळविण्यासाठीच त्यांनी हा युद्धाचा घाट घातला. शिवाय डोन्बासमध्ये रशियन भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. लुहान्स्क आणि डोनेस्क या प्रदेशांमध्ये फुटीरतावादी चळवळ प्रभावी आहे आणि अर्थातच त्याला रशियाचा पािठबा आहे. मात्र आता युद्धाचे पारडे फिरण्याची शक्यता बळावली आहे.

मानसिक युद्धातरशियाचा पराभव?

युद्ध हे दोन पातळय़ांवर लढले जाते. एक तर प्रत्यक्ष रणांगणावर आणि दुसरे शत्रूच्या मनात. खारकीव्हमधील युक्रेनच्या यशामुळे रशियाच्या मानसिकतेवर आघात झाला असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे युक्रेनचे मनोबल मात्र उंचावले आहे. झेलेन्स्की यांनी ‘रशियाचे सैन्य पाठ दाखवून पळून गेले,’ अशा आशयाचे विधान करून आपल्या देशवासीयांना आश्वस्त केले आहे. केवळ रशियाला थोपवून धरण्याचीच नव्हे, तर प्रत्यक्ष युद्धभूमीवर धूळ चारण्याचीही आपली क्षमता आहे, हे युक्रेनच्या सैन्याने दाखवून दिले आहे. रशियाच्या सैन्यातील समन्वयाचा अभावही या पराभवास कारणीभूत ठरल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यतेचा अभाव?

‘लष्करी शिस्त’ असा मराठीत वाक्प्रचार आहे. पण रशियाच्या लष्करात या शिस्तीचीच कमतरता नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुतीन यांचे खंदे समर्थक असलेले चेचेन्यामधील नेते रमझान कादिरोव्ह यांनी रशियाच्या सैन्यदलास घरचा आहेर दिला आहे. रशियाच्या माघारीनंतर त्यांनी टेलिग्रामवर एक ध्वनिफीत टाकली आहे. यात ‘रशियाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे खारकीव्हमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले,’ असे ते म्हणाले. ‘प्रत्यक्ष युद्धभूमीवर काय सुरू आहे, ते पुतिन यांना कदाचित माहिती नसेल. वेळ आली तर मला थेट मॉस्कोशी बोलून परिस्थिती सांगावी लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. या विधानांमुळे रशियाच्या सैन्यामध्ये शिस्तीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रशियाचे सैन्य प्रतिहल्ला करणार?

रशियाने खारकीव्हच्या काही भागांतून माघार घेतल्याचे मान्य केले आहे. त्याच वेळी सैन्याची पुन्हा जमवाजमव करण्यासाठी ही माघार असल्याचा दावाही करण्यात आला आहे. अर्थातच, ही शक्यता नाकारता येत नाही. तात्पुरती माघार घेऊन पुढे आलेल्या युक्रेनच्या सैन्याला घेराव घालणे किंवा प्रतिहल्ला चढवणे ही रशियाची रणनीती असू शकते. किंबहुना डोन्बासमध्ये संपूर्ण पराभव स्वीकारण्यापूर्वी रशिया एक शेवटचा प्रयत्न निश्चित करेल, असे मानले जात आहे. अशा वेळी युक्रेनच्या फौजा त्याचा कसा प्रतिकार करतात, त्यावर युद्धाचे भवितव्य अवलंबून असेल.

युक्रेन युद्ध निर्णायक टप्प्यावर?

सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरू असलेले युक्रेन युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आले आहे. युक्रेनने अमेरिका आणि युरोपच्या आर्थिक, लष्करी मदतीच्या बळावर गमावलेले प्रांत परत मिळविण्याचा सपाटा लावला आहे. यात युक्रेनला यश आले तर ती एके काळची महासत्ता असलेल्या रशियासाठी मानहानीकारक घटना ठरेल, तर अमेरिका-युरोपला थेट रशियाच्या सीमेपर्यंत धडक देता येईल. पण रशियाला डोन्बास स्वतंत्र करण्यात यश आले तर त्याचा युक्रेनपेक्षा पाश्चिमात्य राष्ट्रांनाच अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.amol.paranjpe@expressindia.com