मारिओपोल या वेढल्या गेलेल्या बंदराच्या शहराला रशियाच्या ताब्यात देण्याची मागणी युक्रेननं फेटाळून लावली आहे. या शहरामध्ये अनेक नागरिक हे अपुऱ्या अन्नपुरवठ्यासहीत, पाण्याशिवाय आणि वीजपुरवठ्याशिवाय अडकून पडले आहेत. असं असतानाही युक्रेनने हे शहर रशियाच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याने रशियाने या ठिकाणी नरसंहाराप्रमाणे मोठं मानवी संकट निर्माण होईल अशा पद्धतीची धमकी दिलीय. पण रशिया या शहरासाठी एवढा कडवा संघर्ष का करत आहे? या शहराला एवढं महत्व का आहे हे अनेकांना ठाऊक नाहीय. सध्या युक्रेनविरोधातील युद्ध या शहरामध्ये निर्णायक वळणावर आलंय, त्याच पार्श्वभूमीवर या शहराचं दोन्ही बाजूला सैन्यांसाठी असणाऱ्या महत्वासंदर्भातील हा तपशील…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

> रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धसंघर्ष अजूनही संपलेला नाही. दोन्ही देशांमधील तणाव वाढत असून रशियाकडून युक्रेमधील नागरी वस्त्या तसेच नागरिकांना लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, रशियाने मारियोपोल शहरातील एका शाळेवर बॉम्बहल्ला केल्याचा दावा युक्रेनने केलाय. या हल्ल्यात पूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली असून ४०० लोकांनी शाळेत आश्रय घेतला होता, असंदेखील युक्रेन प्रशासनाने सांगितलं आहे.

> दुसरीकडे युक्रेनमधील कीव्ह, मारियोपोल अशा महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवण्याचा रशियन फौजा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी रशियन सैनिकांकडून युक्रेमधील मारियोपोल तसेच कीव्ह या शहर परिसरात बॉम्बहल्ले तसेच गोळीबार सुरु आहेत. 

> रशियाकडून देण्यात आलेला अल्टीमेटम उलटून गेला आहे. मारिओपोल या शहराला रशियन सुरक्षा दलांनी सर्वाबाजूने वेढले आहे.

> युक्रेनच्या अंतर्गत मंत्र्यांचे सल्लागार वादिम देनिसेन्को यांनी या ठिकाणी दोन्ही बाजूच्या सैन्यांमध्ये मोठं युद्ध झाल्याचं सांगितलं आहे.
आम्ही या ठिकाणी शरण येणार नाही असं पूर्वीच रशियाला कळवलं आहे असं युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी सांगितलं आहे.

> मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठ्या शहराला रशियन फौजांनी चारही बाजूंनी वेढा घातलाय. या शहरामधील वीजपुरवठा खंडित करण्यात आलाय. पाण्याचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे.

> हा महत्वाच्या शहराला ताब्यात घेण्यासाठी मार्चच्या सुरुवातीपासूनच रशियाकडून मारिउपोलचा पाणीपुरवठा बंद करण्याबरोबरच वीजपुरवठाही बंद करण्यात आलाय. विशेष म्हणजे एकीकडे मूलभूत सेवा खंडित करण्यासोबतच दुसरीकडे सातत्याने या शहरावर हवाई हल्ले रशियाकडून केले जात आहेत.

> शहरावर सातत्याने बॉम्ब वर्षाव होत असल्याने स्थानिकांना शहर सोडता येत नाहीय, असं युक्रेनमधील स्थानिक प्रशासनाने म्हटलंय.

> मारिउपोल या अझोव्ह समुद्रावरील मोठय़ा शहराला रशियन फौजांनी घेरले असल्याचे ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने युद्ध सुरु झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्येच जाहीर केलं होतं.

> मारिउपोल शहरामध्ये बहुतांश लोक हे रशियन बोलणारे आहेत. मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये हे शहर ताब्यात घेणं हे रशियाच्या मुख्य उद्देशांपैकी एक आहे.

> मारिउपोल ताब्यात घेतल्यास रशियाला क्रिमियापर्यंतचा मार्ग अधिक सुरक्षित करता येणार आहे. त्यामुळेच हे शहर ताब्यात घेण्यासाठी पुतिन साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर करत आहेत.

> २४ फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनवर सुरु केलेल्या हल्ल्यांमध्ये सर्वाधिक बॉम्ब वर्षाव झालेल्या शहरांमध्ये मारिउपोलचा समावेश आहे.

> या शहरामध्ये सध्या चार लाख नागरिक अडकून पडले आहेत. दोन्ही बाजूच्या चर्चांमधून या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे अनेकदा प्रयत्न झाले पण ते या ना त्या कारणाने अयशस्वी ठरले.

> मारिउपोलसाठी सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियाच्या नौदलातील प्रमुख अधिकारी मरण पावल्याचा दावा या शहरातील महापौरांनी टेलिग्रामवरुन केलाय.

> मारिउपोलसाठी रशिया संघर्ष करत असतानाच शुक्रवारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पोलंडचा दौरा करणार असून युक्रेन युद्ध हा त्यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

> या युद्धावर काही तोडगा काढता येतोय का?, कशाप्रकारे पोलंडमार्गे युक्रेनला मदत करता येईल याचा आढावा बायडेन घेणार आहेत.

> युरोपमधील सर्वात मोठया पोलाद कारखान्यांपैकी एक असलेल्या अझोवस्ताल कारखान्यावर नियंत्रणासाठी युक्रेनी व रशियन फौजांध्ये याच शहरामध्ये तुंबळ युद्ध झाले.

> युक्रेनवरील आक्रमण सुरू ठेवण्याची किंमत रशियाला ‘येत्या अनेक पिढ्यांपर्यंत’ मोजावी लागेल, असा इशारा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी दिला.

> रशिया युक्रेनमधील शहरांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही युक्रेनच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.

> यामध्ये मारिउपोल आधी ताब्यात घेतल्यास युक्रेनला सागरी मदत मिळणं जवळजवळ अशक्य होणार असल्याने या शहराला ताब्यात घेण्यास रशियाकडून प्रथम प्राधन्य दिलं जातं आहे.

> रशिया जाणूनबुजून ‘एक मानवी संकट’ निर्माण करत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रात्री एका दूरसंदेश भाषणात केला आणि आणखी रक्तपात टाळण्यासाठी आपल्याला भेटण्याचे आवाहन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना केले.

> रशियाने २०१४ साली युक्रेनमधून क्रिमिया खालसा केल्याच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पुतिन यांनी त्यांच्या देशाच्या लष्करी दलांची प्रशंसा केली. ‘मेड इन द यूएसएसआर’ यासारखी देशभक्तीपर गाणी या वेळी गायली गेली. ‘युक्रेन आणि क्रिमिया, बेलारूस आणि मोल्दोवा, हे सर्व आमचा देशच आहेत,’ अशी या गाण्याची सुरुवात आहे. ‘बऱ्याच काळापासून आम्ही अशा प्रकारचे ऐक्य पाहिले नव्हते,’ असे पुतिन यांनी आनंदाने घोषणा देणाऱ्या लोकांना उद्देशून सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine refuses to surrender mariupol why this costal city is important for russia and putin scsg
Show comments