-अमोल परांजपे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रशियाने एकतर्फी विलिनीकरण केलेल्या खेरसन प्रांताची त्याच नावाची राजधानी युक्रेन युद्धात कळीचा मुद्दा बनली आहे. युद्धनीतीच्या दृष्टीने या शहराला प्रचंड महत्त्व असण्यामागे अनेक कारणे आहेत. यातील काही कारणे ही मानसिक तर काही धोरणात्मक आहेत. युक्रेनने हे शहर परत ताब्यात घेतले, तर त्याचा रशियाला मोठा फटका बसणार आहे. ही नामुष्की टाळण्याचा पुतिन यांचा प्रयत्न आहे.

खेरसन रिकामे करण्याचे आदेश का दिले गेले?

रशियाधार्जिण्या प्रशासनाने संपूर्ण खेरसन शहराला स्थलांतर करण्याचे आदेश दिले. अर्थात नागरिकांना केवळ रशियात जायचा पर्यायच उपलब्ध आहे. युक्रेनमध्ये जाण्याचे मार्गचा कोणताही मार्ग नाही. या आदेशाचे मुख्य कारण हे दक्षिण आघाडीवर युक्रेन सैन्याची घोडदौड हे आहे. खेरसनचा पाडाव झालाच, तर युक्रेनला केवळ ‘घोस्ट सिटी’ (संपूर्ण रिकामे शहर) जिंकल्याचे समाधान मिळावे, हा रशियाच्या उद्देश असावा.

प्रतिकार न करताच ताबा सोडण्याची तयारी?

एकीकडे नागरिकांना खेरसन सोडण्याचे आदेश देतानाच रशियाच्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनाही माघारी बोलावल्याचा दावा ‘इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर’ या अभ्यास संस्थेने केला. त्यामुळे लढा न देताच खेरसनचा ताबा सोडण्याची रशियाने तयारी केल्याची शंका व्यक्त होत आहे. किंवा खेरसनमध्ये युक्रेनने क्षेपणास्त्र हल्ले वाढवल्यानंतर नुकसान टाळण्यासाठीही हे पाऊल उचललेले असू शकते. मात्र खेरसन युक्रेनने जिंकल्यास त्याचा मानसिक फटका रशियालाच अधिक बसणार आहे.

युद्धात आणखी पीछेहाट झाल्याची रशियावर नामुष्की?

२ लाख ८० हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेले खेरसन शहर युद्धाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात रशियाने जिंकले. २०१४ साली विलीन केलेल्या क्रिमियामधून सैन्य घुसवून रशियाने खेरसन जिंकले होते. अनधिकृतपणे विलिनीकरण केलेल्या चार प्रांतांपैकी (खेरसन, झापोरीझ्झिया, लुहान्स्क आणि डॉनेत्स्क) केवळ हीच प्रांतिय राजधानी रशियाच्या ताब्यात आहे. शहर युक्रेनने जिंकले तर त्याचा रशियाची जनता आणि मुख्यत: पुतिन यांच्या मनोबलावर आघात ठरणार आहे.

खेरसनचे भौगोलिक महत्त्व काय?

खेरसन हे शहर निपा नदीच्या मुखावर वसले आहे. या नदीतूनच क्रिमियाला गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. रशियाने हल्ल्यासाठी जी अनेक कारणे दिली होती, त्यात युक्रेनने नदीचे पाणी अडवल्यामुळे क्रिमियामध्ये पाणीटंचाई होत असल्याचेही एक कारण होते. मात्र आता खेरसनचा ताबा पुन्हा घेतल्यानंतर युक्रेन पुन्हा एकदा नदीचे पाणी अडवून रशियाशासित क्रिमियाची कोंडी करू शकतो.

युक्रेनच्या सैन्याला खेरसनमध्ये मिळणारे यश कशामुळे?

झापोरीझ्झिया आणि खेरसन प्रांतांमध्ये युक्रेन सैन्य मुसंडी मारत आहे. यामागे रशियाच्या सैन्याची पुरवठा साखळी विस्कळित झाल्याचे मुख्य कारण मानले जात आहे. क्रिमिया पुलावर झालेल्या स्फोटामुळे तिथून मिळणारी रसद कमी झाली. त्यामुळे निपा नदीवर असलेल्या पुलांवरून वाहतूक होत होती. मात्र अमेरिकेने पुरवलेल्या ‘हिमार्स’ क्षेपणास्त्रांचा मारा करून युक्रेनने यातले बरेच पूल पाडले. बोटींवरही अशाच पद्धतीने हल्ले करून रशियाच्या सैन्याची रसद घटवली.

सैन्याची पीछेहाट झाल्याने रशियाला किती फटका?

लुहान्स्क, डॉनेत्स्क, झापोरीझ्झिया आणि खेरसन या प्रांतांचा घास घेतल्यानंतर पुतिन यांना ओडेसा आणि मिकोलिएव्ह या प्रांतांकडे लक्ष वळवता आले असते. हे प्रांतही ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनचा काळ्या समुद्राशी संबंध पूर्ण तोडणे शक्य होते. याचा फटका युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला बसला असता आणि युक्रेनमध्ये अंतरविरोध वाढला असता. शिवाय मोल्डोवामधील ट्रान्सिस्टिया या फुटिरतावादी प्रांताशी रशियाचा थेट जमिनीवरून संपर्क जोडला गेला असता. खेरसनमधून माघार घ्यावी लागत असल्यामुळे रशियाचे हे मनसुबे उधळले गेले आहेत.

रशियाच्या पराभवामुळेही युरोप चिंतेत का?

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात रशियाला मिळत असलेल्या विजयामुळे अमेरिका आणि युरोपीय महासंघ चिंतेत होते. कारण राजधानी कीव्हसह युक्रेनचा पाडाव झाला असता तर व्लादिमीर पुतिन आपले पुढले ‘लक्ष्य’ निश्चित करून त्या दिशेने हालचाली करण्याची शक्यता होती. मात्र आता रशियाचे सैन्य पाठ दाखवू लागल्यावर युरोपला वेगळीच चिंता सतावत आहे. क्रिमिया पुलावरील स्फोटानंतर रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर आकाशातून आग ओकली. जवळजवळ दीड आठवडा क्षेपणास्त्रांचा मारा करून पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या. खेरसनच्या पराभवाचा बदला म्हणून पुतिन काय करतील, याचा अंदाज नसल्याने युक्रेनची मित्रराष्ट्रे चिंतेत आहेत.

रशियाला‘डर्टी बॉम्ब’च्या वापराची भीती की धमकी?

ब्रिटन, फ्रान्स, तुर्कस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी रविवारी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. यामध्ये युक्रेनचे सैन्य खेरसनमध्ये ‘किरणोत्सारी स्फोटकां’चा वापर करण्याची शक्यता आहे, असा दावा शोईगू यांनी केला. त्यांनी अण्वस्त्र असा शब्द वापरला नसला तरी त्यांना तेच अभिप्रेत असावे हे निश्चित. ब्रिटनने हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला.

युक्रेन अण्वस्त्र वापरण्याची शक्यता का नाही?

एकतर युक्रेन हे अ‌ण्वस्त्रधारी राष्ट्र नाही आणि खेरसन हा त्यांचाच प्रांत असल्यामुळे तिथे किरणोत्सारी स्फोटके वापरण्याची शक्यताही नाही. मात्र शोईगू यांचे हे विधान बचावात्मक अण्वस्त्रहल्ल्यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी केले नाहीये ना, अशी शंका संरक्षणतज्ज्ञांना आहे. क्रिमिया पुलावरील स्फोट कुणी केला, हे सिद्ध होण्यापूर्वीच रशियाने ‘बदला’ घेतला, हा इतिहास ताजा आहे. ‘कोंडीत सापडलेला शत्रू अधिक घातक असतो’ अशी एक इंग्रजी म्हण आहे. पुतिन यांच्याबाबत युरोप-अमेरिकेला हीच भीती आहे.