युक्रेनने रशियाच्या ताब्यातील भागांवर पहिल्यांदाच लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला आहे. मंगळवार-बुधवारच्या रात्री हे हल्ले क्रिमियामध्ये असलेल्या रशियन लष्कराचा हवाई तळ आणि इतर काही भागांवर करण्यात आले आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. वॉशिंग्टनने गुप्तपणे युक्रेनला लांब पल्ल्याची आर्मी टॅक्टिकल क्षेपणास्त्र प्रणाली (ATACMS) पाठवली आहे, असंही पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनने रशियन लष्करी हेलिकॉप्टर असलेल्या क्रिमियामधील एअरफील्डला लक्ष करण्यासाठी ATACMS सिस्टमचा वापर केला होता. जो बायडेन यांनी यंदा फेब्रुवारीमध्ये ATACMS युक्रेनला पाठवण्यास मान्यता दिली होती. गेल्या महिन्यात ही शस्त्रे युक्रेनच्या शस्त्रागारात पोहोचली असून, ही बाब गुप्त ठेवण्यात आली होती. ATACMS ही खूप शक्तिशाली प्रणाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ATACMS ची क्षमता किती?

ATACMS ही अमेरिकेवर आधारित शस्त्रास्त्र निर्माता लॉकहीड मार्टिनने तयार केलेली सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र प्रणाली आहे. ही जमिनीवरून हवेत मारा करणारी तोफखाना शस्त्र प्रणाली आहे. लांब पल्ल्याच्या हल्ल्याची क्षमता, दारूगोळा साठवण्याची क्षमता आणि शस्त्र प्रणालीची गतिशीलता ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे.

कार्यक्षेत्र: ATACMS ची एक मध्यम पल्ल्याची आवृत्ती आहे, ज्याला ब्लॉक १ म्हणतात. ATACMS ब्लॉक १ ची रेंज १६५ किलोमीटर आहे. युक्रेनला गेल्या वर्षी ही क्षेपणास्र प्रणाली प्रदान करण्यात आली होती आणि ऑक्टोबरमध्ये लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा वापर केला गेला होता. दुसरीकडे ATACMS ब्लॉक १ अची कमाल रेंज ३०० किमी आहे. खरं तर हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारची युद्धसामग्री वाहून नेत आहे, त्यानुसार त्याची मारक क्षमता ठरते. ते फक्त एक वारहेड घेऊन जात असेल, त्याचे वजन १६० किलोग्रॅम असू शकते. जर ते क्लस्टर युद्धसामग्रीने सुसज्ज असेल तर ते ३०० किमी दूर असलेल्या लक्ष्यांवर मारा करू शकते. लांब पल्ल्याचा ATACMS ब्लॉक १ अ सध्याच्या लष्करी तोफा, रॉकेट आणि इतर क्षेपणास्त्रांच्या रेंजच्या पलीकडे लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे.

क्लस्टर युद्धसामग्री: यात डिस्पेंसर आणि त्यावर लोड केलेले सबम्युनिशन्स असतात. सबम्युनिशन्स सामान्यतः ग्रेनेड किंवा प्रत्येकी २० किलोपेक्षा कमी वजनाची इतर शस्त्रे असतात. डिस्पेंसर लक्ष्य साधून सबम्युनिशन्स सोडतो आणि जे बाहेर पडताना पसरतात. क्लस्टर युद्धसामग्रीमुळे होणारा स्फोट एकल किंवा मोठ्या स्फोटापेक्षा खूप मोठे क्षेत्र व्यापतो.

हेही वाचाः विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?

गतिशीलता: ATACMS क्षेपणास्त्रे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम (HIMARS) आणि M270 मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टम (MLRS) प्लॅटफॉर्मवरून डागली जातात. ही दोन्ही लाँचिंग सिस्टीम मोबाईल ऑटोमॅटिक सिस्टीम आहेत. HIMARS रीलोड करण्यासाठी फक्त दोन मिनिटे लागतात. एमएलआरएस एका मिनिटापेक्षा कमी वेळात जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे डागू शकते.

युक्रेन रशियन प्रदेशांना लक्ष्य करण्यासाठी ATACMS वापरू शकत नाही

रशियाच्या आत खोलवर असलेले प्रदेश आता अत्याधुनिक प्रणालीच्या आवाक्यात असूनही युक्रेन या स्थानांवर हल्ले करण्यासाठी त्याचा वापर करू शकत नाही. युक्रेनने केवळ युक्रेनमध्येच या शस्त्रांचा वापर करण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे ते रशियामध्ये त्याचा वापर करू शकत नाहीत. या शस्त्रांचा वापर रशियामधील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकत नाही, असे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी घोषणा केली की, अध्यक्ष बायडेन यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा टीमला ATACMS पाठवण्याचे आदेश दिले असून, ते युक्रेनियन हद्दीत वापरले जाणार आहेत. युक्रेनने रशियन हद्दीत खोलवर हल्ला केला तर मॉस्को संतापेल आणि संघर्ष वाढवेल, अशीही बायडेन प्रशासनाला चिंता सतावत आहे. हीच परिस्थिती टाळण्यासाठी गेल्या वर्षी जो बायडेन प्रशासनाने लांब पल्ल्याच्या ऐवजी मध्यम श्रेणीची क्षेपणास्त्र पाठवली होती. रशियाने युद्धात केलेल्या प्रगतीमुळे अमेरिकेला आपले मत बदलण्यास प्रवृत्त केले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने जुन्या ATACMS ची जागा घेतली आहे.

ATACMS क्षेपणास्त्रांच्या हस्तांतरणास बायडेन प्रशासनाने गुप्तपणे मंजुरी दिली

आधी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेने लांब पल्ल्याच्या ATACMS क्षेपणास्त्र देणे बऱ्याच दिवसापासून टाळले होते. युक्रेनने आपल्या बाजूने त्याची मागणी लावून धरली होती. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सूचनेनंतर बायडेन प्रशासनाने यापूर्वी ते पाठविण्यास नकार दिला होता. युक्रेनियन हद्दीत वापरण्यासाठी लांब पल्ल्याच्या ATACMS क्षेपणास्त्रांच्या हस्तांतरणास बायडेन प्रशासनाने गुप्तपणे मंजुरी दिली. पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल गॅरॉन गार्न यांच्या म्हणण्यानुसार, ATACMS क्षेपणास्त्रांचा १२ मार्च रोजी जाहीर केलेल्या ३०० दशलक्ष डॉलर मदत पॅकेजमध्ये शांतपणे समावेश केला गेला आणि या महिन्याच्या सुरुवातीला ही क्षेपणास्त्र युक्रेनला दिली गेली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine russia war takes a new turn us missiles attack russian military bases vrd