रशियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या युक्रेनने १७ डिसेंबर रोजी एका बॉम्बहल्ल्यात रशियाच्या अण्वस्त्र, रासायनिक अस्त्र आणि जैविक अस्त्रप्रमुख जनरल इगोर किरिलॉव यांना ठार केले. हा हल्ला अर्थातच प्रत्यक्ष रणभूमीवर झाला नाही. मॉस्कोमध्येच किरिलॉव यांच्या निवासस्थानाजवळ बॉम्बस्फोट घडवून घातपाती मार्गाने त्यांना संपवण्यात आले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर इतक्या वरिष्ठ जनरलचा युद्धात प्रतिहल्ल्यात मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ. कुर्स्क या रशियाच्या प्रांतात मुसंडी मारण्याचे धाडस युक्रेनने दाखवले, त्यापेक्षाही ही कारवाई अधिक धाडसी होती असे बोलले जात आहे. या कारवाईचे प्रत्युत्तर रशिया अर्थातच देईल. ते किती विध्वंसक असेल यावर या युद्धाची पुढील दिशा ठरू शकते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनरल इगोर किरिलॉव कोण?

जनरल किरिलॉव हे रशियाच्या आण्विक, रासायनिक आणि जैविक अस्त्र बचाव दलाचे प्रमुख होते. आण्विक, रासायनिक किंवा जैविक हल्ला झाल्यास प्रतिसाद देण्याची जबाबदारी त्यांच्या दलावर असते. किरिलॉव हे तंत्रज्ञ होते आणि अस्त्रे विकसनातही त्यांचे योगदान असे. युक्रेन युद्धात रशियाच्या प्रचाराची जबाबदारीही ते सांभाळत होते. त्यांनी काही भन्नाट आरोपही केले होते. अमेरिकेने असे ड्रोन विकसित केले आहेत, ज्यातून संसर्गित डास फवारले जातील असे ते एकदा म्हणाले होते. युक्रेनमध्ये आवदिवका शहरात रासायनिक अस्त्रे बनवणारा कारखाना आढळला, असाही दावा त्यांनी केला होता, जो तथ्यहीन होता. खुद्द किरिलॉव यांच्यावरच क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून रासायनिक पदार्थांचा वापर युक्रेनमध्ये केल्याचा आरोप होता. क्लोरोपिक्रिन या वायूचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर ब्रिटननेही बंदी घातली होती.  

हेही वाचा >>>विश्लेषण: बांगलादेश युद्धविजयाशी संबंधित नवा वाद काय?

युक्रेनने हत्या कशी घडवली?

मॉस्कोतील एका उपनगरात किरिलॉव यांच्या निवासस्थाना जवळ एका स्कूटरमध्ये बॉम्ब दडवण्यात आला होता. त्याचा दूरनियंत्रकाद्वारे स्फोट घडवण्यात आला. किरिलॉव आणि त्यांच्या  सहायकाचा या बॉम्बच्या स्फोटात मृत्यू झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की जवळच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत बॉम्बच्या धक्कालहरींनी नुकसान झाले. किरिलॉव या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते. किरिलॉव यांनी युक्रेनमध्ये चार हजारांहून अधिक वेळा रासायनिक अस्त्रांचा वापर केला असा युक्रेनचा आरोप आहे. किरिलॉव यांच्या विरोधात सोमवारी एसबीयू या युक्रेनच्या गुप्तहेर आणि दहशतवादविरोधी तपास संस्थेने खटला चालवला आणि त्यांना दोषी घोषित केले. 

‘एसबीयू’ युक्रेनची ‘मोसाद’?

या धाडसी हल्ल्यामुळे एसबीयू ही युक्रेनची गुप्तहेर संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेप्रमाणेच शत्रूचा काटा काढण्यासाठी घातपाती मार्ग अवलंबण्याबद्दल मोसाद ओळखली जाते. किरिलॉव यांची हत्या ही एसबीयूची पहिलीच कारवाई नाही. १२ डिसेंबर रोजी मिखाइल शात्स्की या रशियन शास्त्रज्ञाची मॉस्कोतच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शात्स्की हे रशियाच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाशी संबंधित होते आणि रशियासाठी कृत्रिम प्रज्ञेवर (एआय) आधारित ड्रोन विकसित करत होते. १३ नोव्हेंबर रोजी क्रायमिया या रशियाव्याप्त युक्रेनच्या प्रांतात वॅलेरी त्रांकोवस्की या वरिष्ठ रशियन नौदल अधिकाऱ्याची कारबॉम्ब स्फोटात हत्या झाली. तीदेखील एसबीयूनेच घडवली असा संशय आहे. त्रांकोवस्कीने युक्रेनच्या नागरी वस्त्यांवर क्रूझ क्षेपणास्त्रे डागली, असा युक्रेनचा त्याच्यावर आरोप होता. २०२२मध्ये रशियातील एक कडव्या राष्ट्रवादी नेत्याच्या मुलीची – दारिया दुगिना – हत्या कारबॉम्ब स्फोटातच झाली. या हत्येमागे एसबीयूचा हात असल्याचा संशय आहे. रणांगणावर अनेक ठिकाणी पराभव होत असले, तरी रशियन लक्ष्यांवर अशा प्रकारे हल्ले करण्याचे धोरण युक्रेनने सोडून दिलेले नाही हेच ताज्या घटनेवरून दिसून येते. 

हेही वाचा >>>लैंगिक छळ प्रतिबंधक ‘पॉश’ कायदा राजकीय पक्षांना लागू होणार? हा कायदा पुन्हा चर्चेत येण्याचे कारण काय?

रशियाचा प्रतिसाद कसा असेल?

इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याची अशा प्रकारे हत्या झाल्याने रशिया हादरला असेल हे निश्चित. इगोर किरिलॉव हे रासायनिक अस्त्रांच्या वापरामुळे बऱ्यापैकी बदनाम व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे रशियाला त्याविषयी खळखळाट करता येणार नाही. या घटनेची योग्य ती दखल घेतली जाईल, युक्रेनच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाला लक्ष्य केले जाईल, अशी गर्भित धमकी रशियाचे माजी अध्यक्ष आणि सध्या रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले दिमित्री मेदवेदेव यांनी म्हटले आहे. किरिलॉव यांच्या हत्येमुळे प्रतिबंधित अस्त्रांचा (आण्विक, रासायनिक, जैविक) वापर रशियाला करता येणार नाही. कारण यातून युक्रेनच्या कारवाईला नैतिक बळच मिळेल. त्याऐवजी रशियाचा रेटा जेथे अधिक आहे, तेथे तो तीव्र केला जाईल. शिवाय हायपरसॉनिक प्रकारातील क्षेपणास्त्रांचा वापर वाढवला जाईल, अशी शक्यता आहे. अर्थात हा प्रतिसाद युक्रेनने गृहित धरला असेल. 

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukraine surgical strike on the head of russia nuclear forces print exp amy