Ultra processed food बदलती जीवनशैली आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे अनेक जण हळूहळू कमी वेळात तयार होणार्या प्रोसेस्ड फूडकडे वळत आहेत; तर काही जण बाहेरच्या जंक फूडला पसंती देत आहेत. अनेकदा आपण वाचले किंवा ऐकले आहे, की जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी चांगले नसते आणि याचा आपल्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो. परंतु, एका अभ्यासातून याविषयी धक्कादायक वास्तक उघड झाले आहे. अलीकडे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (बीएमजे) प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार- अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे आयुर्मान कमी होत असल्याची माहिती समोर आली आहे. एक लाख १५ हजार व्यक्तींच्या डेटाचे परीक्षण करून, हे संशोधन करण्यात आले आहे.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये कुकीज, बर्गर, पिझ्झा आणि फ्रोझन खाद्यपदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ रंग, फ्लेवर, साखर टाकून अधिक चवदार केले जातात; ज्यामुळे लोकांना त्याच्या अतिसेवनाची सवय लागते. अल्ट्रा प्रोसेस्ड फूडमध्ये ज्या गोष्टी टाकल्या जातात, त्यामुळे पदार्थाचे पौष्टिक मूल्य कमी होते. मात्र, या गोष्टींना त्यात समाविष्ट केल्या गेल्यामुळे ‘त्या’ पदार्थांच्या चवीच्या आकर्षणापायी तुम्ही ते पदार्थ वारंवार खात राहता. परिणामत: त्यांची विक्री वाढून, त्या उद्योगांना नफा मिळतो; त्याशिवाय या पदार्थांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचाही अभाव असतो. स्वाभाविकत: त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडत जाते, असे अल्ट्रा प्रोसेस्ड फूडबद्दलचे अनेक गंभीर निष्कर्ष या अभ्यासातून समोर आले आहेत.
हेही वाचा : ‘कॅन्सर’ हे नाव आलं कुठून? प्राचीन काळात कर्करोगावर कोणते उपचार केले जायचे?
आरोग्यावर प्राणघातक परिणाम
-मृत्यूचा धोका : अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांच्या सेवनाचे विश्लेषण केल्यावर, संशोधकांच्या असे लक्षात आले की, ज्या व्यक्ती दररोज अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे सेवन करतात, त्यांचे आयुर्मान हळूहळू कमी होत जाते. या पदार्थांचे कमी सेवन करणार्या व्यक्तींच्या तुलनेत ते जास्त सेवन करणार्या व्यक्तींचा मृत्यू लवकर होत असल्याचे यात सांगण्यात आले आहे.
-मेंदूचे आरोग्य : अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा मेंदूच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे वास्तव या अभ्यासातून समोर आले आहे. अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणार्या व्यक्ती मल्टीपल स्क्लेरोसिस (मेंदू आणि पाठीचा कणा निकामी करणारा आजार), डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) व पार्किन्सन (मेंदूतील पेशी हळूहळू निकृष्ट होतात) यांसारख्या रोगांना बळी पडण्याची शक्यता आठ टक्के अधिक असते.
-विशिष्ट खाद्यपदार्थांचा प्रभाव : काही विशिष्ट अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा आरोग्यावर थेट विपरीत परिणाम होतो. त्यामध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड मांस, पांढरे ब्रेड, साखरयुक्त तृणधान्ये, अल्ट्रा-प्रोसेस्ड नाश्त्याचे पदार्थ, बटाटा चिप्स, साखरयुक्त स्नॅक्स, गोड पेये व सोडा यांसारख्या कृत्रिम गोड पेयांचा समावेश आहे. हे असे पदार्थ आहे की, ज्यांचे सातत्याने सेवन केले जाते.
संशोधकांच्या निष्कर्षात काय?
संशोधकांच्या निष्कर्षानुसार, अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे जास्त सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये फळे, भाज्या व पौष्टिक अन्नाचे सेवन करण्याची इच्छा कमी होते. धूम्रपानाचे प्रमाण वाढते आणि शारीरिक हालचालही कमी होते. यापूर्वी झालेल्या एका संशोधनात हाय अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे आरोग्यावर होणार्या हानिकारक परिणामांविषयीही माहिती देण्यात आली होती. या संशोधनात अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे वजन वाढणे, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, चिंता, नैराश्य व स्मृतिभ्रंश यांसारख्या विविध विकारदायी परिस्थितींचा धोका वाढत असल्याची माहिती समोर आली होती.
सर्वच अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ शरीरासाठी घातक असतात का?
संशोधकांच्या निष्कर्षानुसार सर्वच अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ घातक नसतात. धान्याच्या ब्रेडसारखे काही पदार्थ आरोग्यासाठी संभाव्यत: फायदेशीर मानले जातात. योग्य आहाराविषयीच्या समोर आलेल्या अशा अनेक अहवालांमुळे आता विविध देशांद्वारे अनेक सार्वजनिक आरोग्य उपक्रम राबविले जात आहेत आणि आहाराविषयीची जागरूकता वाढवली जात आहे. त्यासह कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या ट्रान्स फॅट्सवर बंदी घातली जात आहे, साखरयुक्त जंक फूड्सवर संभाव्य धोक्याच्या इशाऱ्याचे टॅग लावले जात आहेत आणि मुलांच्या आरोग्यास घातक असणार्या खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवरही निर्बंध घातले जात आहेत.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स म्हणजे काय?
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात, खाद्यपदार्थांवर होणार्या प्रक्रियेनुसार चार श्रेणींमध्ये आहाराचे वर्गीकरण केले गेले आहे. त्यात प्रक्रिया न केलेले किंवा कमीत कमी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, स्वयंपाकात वापरण्यात येणारे खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ (प्रोसेस्ड फूड्स) व अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स अशा चार श्रेणींमध्ये खाद्यपदार्थांना विभागले गेले आहे.
-प्रक्रिया न केलेले किंवा कमीत कमी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ : या श्रेणीमध्ये ताजी फळे आणि भाज्या, मसूर, मांस, मासे, अंडी, दूध, साधे दही, तांदूळ, पास्ता, कॉर्नमील, मैदा, कॉफी, चहा, औषधी वनस्पती व मसाल्यांचा समावेश आहे.
-स्वयंपाकात वापरण्यात येणारे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ : यात सामान्यत: स्वयंपाकात वापरले जाणारे घटक आहेत. उदा. स्वयंपाकाचे तेल, लोणी, साखर, मध, व्हिनेगर व मीठ.
हेही वाचा : इस्रोने रचला नवा विक्रम! 3D-प्रिंटेड लिक्विड रॉकेट इंजिनची चाचणी यशस्वी; हे प्रिंटर नक्की कसे काम करते?
-प्रोसेस्ड फूड्स : ताजे भाजलेले ब्रेड, चीज, फ्रोजन भाज्या, बीन्स आणि माशांचा समावेश आहे. हे खाद्यपदार्थ जास्त काळ टिकावेत म्हणजे त्यांची ‘शेल्फ लाइफ’ वाढावी म्हणून त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकले जातता. प्रिझर्वेटिव्ह्जचे प्रमाण तुलनेने कमी असते; परंतु पुढील श्रेणीतील वस्तूंमध्ये जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह्ज असतात.
-अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स : हे खाद्यपदार्थ औद्योगिक पद्धती वापरून उत्पादित केले जातात. हे पदार्थ सहसा किराणा दुकानांत मिळत नाहीत. या पदार्थांमध्ये फ्लेवरिंग्ज, कलरिंग्ज व इमल्सीफायर्स टाकून, हे पदार्थ अधिक चविष्ट केले जातात. अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये सोडा, एनर्जी ड्रिंक्स, चिप्स, कँडीज, फ्लेवर्ड योगर्ट्स (दही), चिकन नगेट्स, सॉसेज, मॅकरोनी, चीज, ब्रेड, वनस्पती दूध, मांस आदी पदार्थांचा समावेश असतो.