आपल्या विद्यार्थ्यांना ‘निवडणुकीत सुशिक्षित उमेदवारांनाच मत द्या’, असे आवाहन करणाऱ्या एका शिक्षकाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शिक्षकाने केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी या शिक्षकावर, तसेच हा शिक्षक शिकवत असलेल्या ‘अनअकॅडमी’ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर सडकून टीका केली. तर काही लोकांनी या शिक्षकाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अनअकॅडमी या संस्थेने संबंधित शिक्षकाला कामावरून काढले आहे. याच पार्श्वभूमीवर हा शिक्षक कोण आहे? या शिक्षकाने नेमके काय विधान केले होते? अनअकॅडमी या संस्थेने असा निर्णय का घेतला? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणावर एक नजर टाकू या.
करण सांगवान असे ‘अनअकॅडमी’ने कामावरून काढून टाकलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने आपल्या ऑनलाईन शिकवणीदरम्यान शिकलेल्या उमेदवाराला मत द्या, असे विधान केले होते. केंद्र सरकारने नुकतेच फौजदारी कायदे बदलले आहेत. त्याऐवजी भारतीय न्याय संहिता (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (बीएस-२०२३) हे नवे कायदे आणण्याचे प्रस्तावित आहे. याच पार्श्वभूमीवर सांगवान यांनी वरील विधान केले होते.
करण सांगवान नेमके काय म्हणाले होते?
फौजदारी कायदे बदलल्यामुळे माझ्या सर्व नोट्सची किंमत शून्य झाली आहे, असे करण सांगवान म्हणाले. “रडावे की हसावे हे मला समजत नाहीये. कारण- कायद्याशी संबंधित मी अनेक नोट्स तयार केल्या होत्या. या नोट्स तयार करण्यासाठी मला बराच वेळ द्यावा लागला होता. मात्र, पुढच्या वेळी तुम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून जो शिकलेला उमेदवार आहे, त्यालाच मतदान करा. फक्त नाव बदलणे माहिती असलेल्यांना निवडून आणू नका. काळजीपूर्वक विचार करा,” असे करण सांगवान म्हणाले होते.
‘अनअकॅडमी’ने सांगवान यांना कामावरून काढले
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमाध्यमांवर नव्या वादाला तोंड फुटले. सांगवान यांनी वरील वक्तव्य करताना कोणत्याही नेत्याचे वा पक्षाचे स्पष्टपणे नाव घेतले नव्हते. मात्र, सांगवान यांना केंद्रातील मोदी सरकारलाच लक्ष्य करायचे होते, असा दावा अनेक जण करीत आहेत. अनेकांनी सांगवान यांच्या विधानाला पाठिंबा दिला आहे. मात्र, या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘अनअकॅडमी’ने सांगवान यांना कामावरून काढले आहे. सांगवान यांनी करार आणि आचारसंहितेचाही भंग केला आहे, असे ‘अनअकॅडमी’ने म्हटले आहे.
‘अनअकॅडमी’ने काय स्पष्टीकरण दिले?
“आम्ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्याचा एकमेव उद्देश असणारी शिक्षण संस्था आहोत. हा उद्देश पूर्ण व्हावा यासाठी आमच्याकडे अत्यंत कडक अशी आचारसंहिता आहे. विद्यार्थ्यांना नि:पक्षपाती शिक्षण मिळावे म्हणून आमच्या शिक्षकांना या आचारसंहितेचे पालन करावे लागते. आम्ही जे काही करतो, त्याच्या केंद्रस्थानी आमचे विद्यार्थीच आहेत. वर्ग हे आपली वैयक्तिक मते सांगण्यासाठीचे व्यासपीठ नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे आम्हाला करण सांगवान यांना दूर करावे लागत आहे. त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय,” अशी प्रतिक्रिया ‘अनअकॅडमी’चे सहसंस्थापक रोमन सैनी यांनी दिली.
“हा निर्णय म्हणजे भाषणस्वातंत्र्याची गळचेपी”
दरम्यान, या निर्णयानंतर अनअकॅडमी या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरही अनेक स्तरांतून टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांसह अनेक सामान्य नागरिकांनी करण सांगवान यांच्यावर केलेली कारवाई अयोग्य आहे, अशी भूमिका घेतली आहे. हा निर्णय म्हणजे भाषणस्वातंत्र्याची गळचेपी आहे, असे विरोधकांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधी हे अशिक्षित नसावेत : अरविंद केजरीवाल
सांगवान यांच्यावरील कारवाईनंतर आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एखाद्या शिक्षित उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असे कोणी सांगत असेल, तर त्याच्यावर कारवाई करणे अयोग्य आहे, असे मत व्यक्त केले आहे. “शिक्षित लोकांना मतदान करा, असे म्हणणे गुन्हा आहे का? कोणी अशिक्षित असेल, तर मी त्या व्यक्तीचा आदरच करतो; मात्र लोकप्रतिनिधी हे अशिक्षित नसावेत. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा काळात अशिक्षित उमेदवार आधुनिक भारत घडवू शकत नाही,” असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
“… म्हणजेच मोदी अशिक्षित आहेत, हे भाजपाने मान्य केले”
त्यानंतर राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते प्रशांत कनोजिया यांनीदेखील सांगवान यांच्यावर सत्य बोलल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया दिली. “सांगवान यांनी फक्त अशिक्षित लोकांना मतदान करू नका, असे विधान केले आहे. हे विधान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला आहे, असे भाजपाला वाटत आहे. म्हणजेच मोदी अशिक्षित आहेत, हे भाजपाने मान्य केले आहे. मोदी यांनी नाव बदलण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही, हे मान्य करायला हवे का?” अशी प्रतिक्रिया कनोजिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटच्या माध्यमातून दिली आहे.
“कणा नसलेले लोक शैक्षणिक संस्था चालवत आहेत”
काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीदेखील सांगवान यांना कामावरून काढून टाकल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. “कणा नसलेले लोक शैक्षणिक संस्था चालवत आहेत, हे जाणून दु:ख होत आहे. जे लोक दबावाला घाबरतात, ते चांगले नागरिक घडवू शकत नाहीत तसेच अन्यायाविरोधात उभे राहू शकत नाहीत,” असे श्रीनेत म्हणाल्या आहेत.
“सांगवान यांच्यावर केलेली कारवाई दुर्दैवी”
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार दिपेंदर सिंह हुड्डा यांनीदेखील सांगवान यांच्यावरील कारवाई दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तर अशिक्षित लोकांना मतदान करू नका, हा विचार पक्षपाती कसा समजला जाऊ शकतो, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाच्या नेत्या तथा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.
सांगवान लवकरच आपली भूमिका मांडणार
दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर सांगवान यांनी स्वत:चे यूट्युब चॅनेल सुरू केले आहे. तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे माझ्या काही विद्यार्थ्यांनाही अडचणीचा सामना करावा लागला. मलाही बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले आहे,” असे सांगवान म्हणाले आहेत. तसेच लवकरच या वादावर मी माझी भूमिका मांडणार आहे, असेही सांगवान यांनी सांगितले आहे.