अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने भारतातून पलायन केल्यानंतरही दक्षिण मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीट परिसरात त्याची दहशत कायम होती. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला २००३ मध्ये दुबईत अटक झाली. त्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तेव्हापासून भेंडीबाजारमधील त्याच्या घराबाहेर हस्तकांची गर्दी असायची. या परिसराला एका किल्ल्याचे स्वरूप आले होते. या परिसरात १७ मे २०११ रोजी गोळीबार करून दाऊद टोळीला इशारा देण्यात आला होता. त्यात इक्बाल कासकरचा अंगरक्षक आणि चालक आरिफ उर्फ सय्यद अबूबकर उर्फ बेल ठार झाला होता. दाऊदच्या घराखाली झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा घेतलेला हा आढावा…

नेमकी घटना कशी घडली ?

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकरचा भाऊ इकबाल कासकर राहत असलेल्या दक्षिण मुंबईतील घराखाली १७ मे २०११ रोजी रात्री गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात इकबालचा चालक ठार झाला, तसेच त्याचा अन्य एक साथीदार जखमी झाला. गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. जमावाने हल्ला करणारे सय्यद मुस्तफा अली (२९) व इंद्र बहादूर खत्री (२७) या दोघांना पकडले आणि पायधुनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. ही घटना १७ मे २०११ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास बोहरी मोहल्ला, पाकमोडिया स्ट्रीट येथे घडली. दोन हल्लेखोरांनी इकबालच्या मोटरगाडीजवळ जाऊन गोळीबार केला. इकबालचा चालक आरिफ उर्फ सय्यद अबूबकर उर्फ बेल गोळीबारात ठार झाला. तसेच, या हल्ल्यात अन्य एक साथीदार तारीफ जखमी झाला. त्याला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जे. जे. रुग्णालयाने रात्री १० वाजता आरिफला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या मानेवर आणि पाठीवर गोळ्या लागल्या होत्या. दाऊदचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डांबर गल्लीमध्ये हा गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली. भारतात असताना दाऊद त्याच घरात वास्तव्यला होता.

दाऊदचा भाऊ इक्बालच्या हत्येचा कट?

पाकमोडिया स्ट्रीटवर गोळीबार झाला त्यावेळी इक्बाल कासकर तेथे उपस्थित नव्हता. या हल्ल्यात ठार झालेला आरिफ उर्फ सय्यद अबूबकर उर्फ बेल जोगेश्वरी परिसरात राहायचा. मारेकऱ्यांना आरिफला मारायचे असते तर ते जोगेश्वरीतही शक्य होते. पण पाकमोडिया स्ट्रीटवरील दाऊदच्या बालेकिल्ल्यात शिरून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार केवळ दाऊदला इशारा देण्यासाठी करण्यात आला होता. त्यात आरिफ ठार झाला. गोळीबाराची ही घटना त्यावेळी सर्वत्र चर्चेचा विषय बनली होती.

छोटा राजनचा सहभाग?

गुन्हे शाखेच्या तपासानुसार, नवी मुंबईतील सीवूड परिसरात राहणारा उमैद – उर – रहमान या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. रहमाननेच हल्लेखोरांना शस्त्रे पुरवली असावीत, असा पोलिसांचा संशय होता. हा गोळीबार छोटा राजनच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप होता. रहमानने नेपाळी नागरिक बिष्टच्या मदतीने खत्रीची ओळख करून दिली, असे पोलिसांनी सांगितले. बिष्टने खत्रीला नेपाळहून मुंबईत आणले आणि नंतर तो शहर सोडून पळून गेला, असा आरोप होता. छोटा राजनचे २०१५ मध्ये बाली येथून प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याच्याविरोधातील ७१ प्रकरणे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्यात आली होती. न्यायालयाने या खटल्यात २०१५ मध्ये बिलाल मुस्तफा सय्यद, इंद्रा खत्री आणि अब्दुल रशाद शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर डी. के. राव, उमैद – उर – रहमान, रहमानचे सावत्र वडील आसिफ जान आणि सय्यद अदनान यांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

छोटा राजनबाबत काय निकाल दिला?

इक्बाल कासकर याच्या अंगरक्षकाचा २०१२ मध्ये झालेल्या खून प्रकरणातून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) स्थापन विशेष मोक्का न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजनची निर्दोष सुटका केली. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजनची या प्रकरणातून निर्दोष सुटका केल्याचा निकाल जाहीर केला. तसेच, तपशीलवार आदेश नंतर उपलब्ध केला जाईल, असेही विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. राजन सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात बंदिस्त असून निकालासाठी त्याला दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली जात असल्याची माहिती न्यायालयाने त्याला दिली. तसेच, तो अन्य गुन्ह्यांत किंवा प्रकरणांत अटकेत नसल्यास त्याची तातडीने सुटका करण्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते. आरिफ अबुबकर सय्यद उर्फ बेल हा इक्बाल कासकरचा अंगरक्षक आणि चालक होता. दोन आरोपींनी १७ मे २०११ रोजी दक्षिण मुंबईत गोळ्या झाडून त्याचा खून केला. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार सय्यदचा खून राजनच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा आरोप होता. त्यामुळे, राजन याच्याविरोधात भारतीय दंड संहिता, मोक्का आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खून आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपांतर्गत खटला चालवण्यात आला. राजनविरोधात इतर खटले सुरू असल्यामुळे त्याला अद्याप तुरुंगातच राहावे लागणार आहे.

Story img Loader