UNESCO tentative list India 2025: युनेस्कोने तात्पुरत्या जागतिक वारसा यादीत भारताच्या सहा नवीन स्थळांचा समावेश केला आहे. सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सोमवारी लोकसभेत याविषयी माहिती दिली. या यादीत समाविष्ट केलेल्या स्थळांमध्ये बुंदेलांचे राजवाडे-किल्ले, छत्तीसगडमधील कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान, प्राचीन व्यापारी मार्गांवरील (मौर्य) अशोककालीन शिलालेख, मुदुमल मेगालिथिक मेन्हिर्स, चौसष्ट योगिनींची मंदिरं आणि उत्तर भारतातील गुप्तकालीन मंदिरांचा समावेश आहे. युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश होणे हे भविष्यात जागतिक वारसा यादीत नामांकन मिळविण्यासाठी आवश्यक पूर्वअट आहे.
मुदुमल मेगालिथिक मेन्हिर्स
तेलंगणाच्या नारायणपेट जिल्ह्यातील मुदुमल गावाच्या नैऋत्येला सुमारे चार किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठाजवळ वसलेले ३,५०० वर्षे जुने मेगालिथिक मेन्हिर्स स्थळ ८९ एकरांमध्ये पसरलेले आहे. येथे सुमारे ८० उंच मेन्हिर्स आहेत. हे मेन्हिर्स १० ते १५ फूट उंच आहेत. याशिवाय प्राचीन समुदायाच्या अंत्यसंस्कार विधींशी संबंधित सुमारे ३,००० सरळ रेषेत लावलेले दगडही येथे आढळतात. हे दगड ओळींमध्ये २०-२५ फूट अंतरावर व्यवस्थित मांडलेले आहेत. हे स्थळ दक्षिण आशियातील मेगालिथिक परंपरेविषयी महत्त्वाची माहिती देते.
नीलुरल्ला तिम्मप्पा
या मेन्हिर्सशिवाय इतर समाधी स्थळे, दगडी वर्तुळे आणि शिलालेख ही या स्थळावर आढळतात. कालांतराने स्थानिक समुदायांनी या दगडांना आपल्या सांस्कृतिक वारशाचा भाग मानले आहे आणि त्यांना धार्मिक श्रद्धांशी जोडले आहे. या मेन्हिर्सना पवित्र मानले जाते आणि स्थानिक लोक त्यांना नीलुरल्ला तिम्मप्पा असे म्हणतात. येथे एक विशिष्ट मेन्हिर देवी येलम्मा म्हणून पूजली जाते. यामुळे या स्थळाचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.
बुंदेलांचे राजवाडे-किल्ले
युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार बुंदेलांचे राजवाडे-किल्ले हे भारतीय राजवाड्यांच्या स्थापत्यशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या वास्तू मध्ययुगीन भारतातील सांस्कृतिक आणि कलात्मक देवाणघेवाण स्पष्टपणे दर्शवतात. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड प्रदेशात वसलेल्या या सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये गढकुंदर किल्ला, राजा महाल, जहांगिर महाल, दतिया पॅलेस, झांसी किल्ला आणि ढुबेला पॅलेस या सहा महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश आहे.
बुंदेला स्थापत्यशास्त्र
हे किल्ले आणि राजवाडे बुंदेला राजपूतांच्या सांस्कृतिक परंपरा, स्थापत्यशैली आणि राजकीय इतिहासाचे प्रतीक आहेत. बुंदेला राजपूतांनी १६ व्या ते १९ व्या शतकादरम्यान भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी मुघल, मराठे आणि ब्रिटीश यांच्याशी केलेल्या संघर्ष आणि युतीद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. निवडलेल्या राजवाडे-किल्ल्यांमधून बुंदेला स्थापत्यशास्त्राची प्रगती स्पष्ट होते. या शैलीत संरक्षणात्मक तंत्र आणि राजेशाही वैभव यांचा अद्वितीय संगम आढळतो.
कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यान
कांगर व्हॅली राष्ट्रीय उद्यानाचे नाव या प्रदेशातून वाहणाऱ्या कांगर नदीवरून ठेवण्यात आले आहे. हे छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर येथे आहे आणि १९८२ मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. हे उद्यान सुमारे २०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेले आहे. येथे मिश्र आर्द्र पानगळीचे जंगल आढळते. यात साल, सागवान (टिक) आणि बांबूची भरपूर झाडे आहेत.
चुनखडीच्या गुहा
येथे आढळणारी बस्तर मैना मानवी भाषा अनुकरण करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. हे राष्ट्रीय उद्यान जैवविविधतेने समृद्ध असून ते भूमिगत चुनखडीच्या गुहांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गुहा स्थलॅक्टाइट आणि स्टॅलॅग्माइट संरचनांमध्ये आहेत. उद्यानात कुटुमसर, कैलाश आणि दंडकतीन विशेष गुहा आहेत. उद्यानात सपाट जमिनीपासून ते खडबडीत उतार, पठारे, खोल दऱ्याखोऱ्या आणि नागमोडी वाहणाऱ्या नद्या आहेत. येथे समुद्रसपाटीपासून ३३८ मीटर ते ७८१ मीटर उंचीपर्यंतचा भूभाग आढळतो.
अशोकाचे शिलालेख
येथे आढळणारे प्रमुख खडक इंद्रावती समूहाशी संबंधित आहेत. मृत्तिका प्रकारांमध्ये वालुकामय, लॅटराइट (जांभा) आणि गाळाची जमीन यांचा समावेश आहे. हंगामी आणि बारमाही नद्या या उद्यानाच्या परिसरातून वाहत कांगर नदीला जाऊन मिळतात. त्यामुळे या उद्यानाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते. मध्य प्रदेशातील अशोककालीन शिलालेख सुमारे २,२०० वर्षांपूर्वी कोरले गेले असून ते धर्म, प्रशासन आणि शांततेचे शाश्वत संदेश देत आजही उभे आहेत, असे मध्य प्रदेश पर्यटन विभागाने नमूद केले आहे.
दक्षिणापथावरील शिलालेख
सम्राट अशोकाचे हे शिलालेख प्राचीन दक्षिणापथ व्यापारी मार्गावर आढळतात आणि या वारसास्थळांच्या यादीत एकूण ३४ स्थळांचा समावेश आहे. इ.स.पू. ३ऱ्या शतकातील हे शिलालेख सम्राट अशोकाच्या मोहिमेचा एक भाग होते. या शिलालेखांद्वारे तो आपल्या प्रजेशी संवाद साधत होता आणि बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार करत होता. प्रसिद्ध सांची शिलालेखापासून ते रूपनाथ, गुज्जरा आणि पांगुरारिया येथील कमी परिचित पण तितकेच महत्त्वाचे शिलालेख या स्थळांवर आढळतात. ही ठिकाणे अशोकाच्या विचारसरणीची आणि त्याच्या संदेशाच्या दीर्घकालीन प्रभावाची झलक देतात.
चौसष्ट योगिनी मंदिर
चौसष्ट योगिनी मंदिर मितावली गावात स्थित आहे. हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील पाडोली गावाजवळ ग्वाल्हेरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर आहे. असे मानले जाते की, हे मंदिर १० वे ते ११ वे शतकादरम्यान कलचुरी राजे युवराजदेव यांनी बांधले होते आणि ते एक शक्तिशाली धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. हे मंदिर एकत्तरसो महादेव मंदिर या नावानेही प्रसिद्ध आहे. सुमारे १०० फूट उंच एका एकाकी टेकडीवर वसलेले या मंदिर परिसरातून आजूबाजूच्या शेतजमिनी आणि नर्मदा नदीचे भव्य दृश्य पाहाता येते. मंदिराचे नाव त्याच्या भोवती असलेल्या ६४ लहान मंदिरांवरून पडले आहे. ही ६४ मंदिरे प्रत्येक योगिनीला समर्पित आहेत. योगिनी या देवी पार्वतीच्या दैवी शक्तीची प्रतीके मानली जातात. सुमारे १३० फूट व्यास असलेल्या वर्तुळाकार रचनेमुळे हे मंदिर अद्वितीय आहे. येथे अनेक शिवलिंगे आढळतात. ही शिवलिंगे हिंदू धर्मातील उपासनेतील महत्त्व अधोरेखित करतात.
गुप्तकालीन मंदिरे
गुप्तकालीन मंदिरे ही भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राच्या प्रारंभिक उत्क्रांतीची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. या मंदिरांवर बौद्ध आणि हिंदू प्रभाव यांचा अद्वितीय संगम आढळतो. यामध्ये रचनात्मक गर्भगृह (मुख्य देवस्थान), मंडप (खांबांनी युक्त सभागृह) आणि मुखमंडप (मुख्य प्रवेश पोर्च) यांचा समावेश आहे. या वैशिष्ट्यांनी भारतीय मंदिर स्थापत्यशैलीच्या पुढील शतकांसाठी एक मूलभूत नमुना तयार केला.
६२ तात्पुरती वारसा स्थळे
या नवीन समावेशामुळे भारताकडे आता युनेस्कोच्या तात्पुरत्या वारसा यादीत ६२ स्थळे आहेत. प्रत्येक देशाच्या संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ही स्थाने प्रस्तावित केली जातात. सध्या, भारतातील ४३ स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंदवली गेली आहेत, त्यापैकी ३५ सांस्कृतिक श्रेणीत, सात नैसर्गिक श्रेणीत आणि एक मिश्र श्रेणीत समाविष्ट आहे.
२०२५ मध्ये, भारताने प्रथमच जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीदरम्यान, आसाममधील अहोम राजवंशाच्या मृदस्मारक प्रथेला (मॉइडम्स) प्रतिष्ठित युनेस्को जागतिक वारसा दर्जा देण्यात आला. युनेस्कोच्या संकेतस्थळानुसार चौसष्ट योगिनी मंदिरे ही एक श्रेणीबद्ध नामांकन प्रणाली आहे. यात भारतभर विविध स्थळांचा समावेश केला जातो.