जागतिक महासत्ता असलेली अमेरिका सध्या नव्या संकटात सापडली आहे. या संकटामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनही गोंधळात पडले आहे. अमेरिकेतील अंड्यांच्या वाढत्या किमती हा एक चर्चेचा विषय ठरत आहे. अंड्यांच्या वाढत्या किमतींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेकडे वळत आहे. एकेकाळी अगदी स्वस्त दरात मिळणारी अंडी अचानक इतकी महाग कशी झाली, याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अंडी महागण्याचे नेमके कारण काय? एकूणच अमेरिकेतील परिस्थिती काय? त्याविषयी जाणून घेऊ.

अमेरिकेत जानेवारीपासून अंड्यांच्या किमती ३१० टक्क्यांनी वाढल्या आहेत. १.२१ डॉलर्स म्हणजेच प्रति डझन १०० रुपये इतकी असणारी अंड्यांची किंमत आता जवळजवळ पाच डॉलर्स म्हणजेच ४२५ रुपयांहून अधिक झाली आहे. अंड्यांची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने अमेरिकेत गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे. देशभरातील सुपर मार्केट एक तर रिकामे किंवा तिथे अंड्यांचा कमी प्रमाणात साठा उपलब्ध आहे. काही दुकानांनी ग्राहक खरेदी करू शकतील अशा अंड्यांच्या कार्टनच्या संख्येवरही मर्यादा घातल्याचे चित्र आहे.

अचानक उद्भवलेल्या अंड्यांच्या कमतरतेचे कारण काय?

अंड्यांच्या कमतरतेचे मूळ कारण एव्हियन फ्लू आहे. याला बर्ड फ्लू म्हणूनही ओळखले जाते. बर्ड फ्लूने अमेरिकेतील सर्व पोल्ट्री फार्ममध्ये कहर केला आहे. सर्वत्र हा आजार वेगाने पसरत असल्याचे चित्र आहे. २०२२ पासून या विषाणूमुळे जवळजवळ १७ कोटी कोंबड्या, टर्की व इतर पक्षी मारले गेले आहेत. त्यामुळे देशातील एकूणच अंडी उत्पादनावर खूप मोठा विपरीत परिणाम झाला आहे. या संकटामुळे शेतकऱ्यांना किमान तीन कोटी पक्षी मारावे लागल्याने पुरवठ्यावर तीव्र स्वरूपाच्या मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

अमेरिकेत जानेवारीपासून अंड्यांच्या किमती ३१० टक्क्यांनी वाढल्या आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

खरे तर, अमेरिकेच्या कृषी विभागाने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या वर्षीच २.१ कोटींहून अधिक अंडी देणाऱ्या कोंबड्यांना मारण्यात आले आहे. त्यातील बहुतेक कोंबड्या ओहायो, उत्तर कॅरोलिना व मिसूरीतील होत्या. विभागाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये १.३२ कोटी अतिरिक्त पक्ष्यांना मारण्यात आल्याचा आणि त्यांची संख्या कमी केल्याचा अहवालही दिला होता. परिणामी, अंडी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना किमान तीन कोटी पक्षी मारावे लागले आहेत आणि पुरवठ्यात मोठी घट झाली आहे.

अंडी देण्यासाठी कमी कोंबड्या उपलब्ध असल्याने पुरवठ्यात नाट्यमयरीत्या घट झाली आहे. अर्कांसस विद्यापीठातील पोल्ट्री तज्ज्ञ जादा थॉम्पसन यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेला सांगितले, “जर अंडी घालण्यासाठी पक्षी नसतील, तर आपल्याकडे पुरवठ्याची कमतरता भासते आणि त्यामुळेच पुरवठा व मागणी यांत असंतुलन पाहायला मिळते. परिणामस्वरूपी किमती वाढतात.”

अमेरिकन ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये अंड्यांच्या किमती १२ टक्क्यांनी वाढल्या आणि मागील वर्षीच्या तुलनेत जवळजवळ ५९ टक्क्यांनी वाढल्या. किमतींमध्ये झालेल्या या वाढीचा मोठा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे किराणा दुकानदारांसाठीही किमती वाढवण्यात आल्या आहेत आणि रेस्टॉरंट्समधील अंडी असणाऱ्या मेनूच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे अमेरिकेतील काही लोक कोंबड्याही भाड्याने देऊ लागले आहेत.

सरकारचे म्हणणे काय?

ट्रम्प प्रशासनाने या संकटाला तोंड देण्यासाठी अंड्यांच्या किमती कमी करण्याकरिता एक अब्ज डॉलर्सची योजना आखली आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करणे, लसीच्या इतर पर्यायांवर संशोधन करणे, तसेच ब्राझील, तुर्की व दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमधून अंड्यांच्या आयातीला पाठिंबा देणे आदी बाबी समाविष्ट आहेत. त्याबरोबरच अमेरिकेने अंडी आयातीसाठी लिथुआनिया, डेन्मार्क, फिनलंड, स्वीडन व नेदरलँड्सबशीही संपर्क साधला आहे. सध्या या देशांशी त्याबाबत चर्चा सुरू आहे.

अंडी देण्यासाठी कमी कोंबड्या उपलब्ध असल्याने पुरवठ्यात नाट्यमयरीत्या घट झाली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

बाजारपेठेतील प्रवेशाच्या समस्यांमुळे फिनलंडने ही विनंती नाकारली आहे आणि त्यामुळे अमेरिकेने अतिरिक्त पुरवठ्यासाठी लिथुआनियाकडे विनंती केली असल्याची माहिती आहे. अमेरिकेने ब्राझिलियन अंड्यांची आयातदेखील मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. पूर्वी प्रामुख्याने ही अंडी पाळीव प्राण्यांच्या अन्नासाठी वापरली जात होती. ब्राझिलियन अ‍ॅनिमल प्रोटीन असोसिएशनच्या मते, फेब्रुवारीमध्ये ब्राझीलमधून केली गेलेली आयात मागील वर्षाच्या तुलनेत ९३ टक्क्यांनी वाढली होती.

टंचाईच्या काळात नवनवीन उपाय

अंड्यांच्या किमती वाढत असून, या संकटामुळे काही अनपेक्षित गोष्टीदेखील पाहायला मिळाल्या आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास अतिशय लोकप्रिय असलेला सौंदर्यप्रसाधन ब्रँड ‘द ऑर्डिनरी’ने चक्क अंड्यांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीने अंडी प्रति डझन ३.३७ डॉलर्स या दराने विकली आहेत.

एका प्रमोशनल इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये, ब्रँडने ‘सामान्य किमतीला अंडी’ अशी जाहिरात केली आहे आणि त्या जाहिरातीत अंड्यांचे एक कार्टन प्रदर्शित केले आहे. ब्रँडद्वारे विकले जाणारे अंड्याचे कार्टन हे हे न्यूयॉर्क शहरात निवडक ठिकाणीच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या निर्णयामुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळत आहे. काही वापरकर्त्यांनी ब्रँडच्या कल्पकतेचे कौतुक केले आहे; तर काहींनी ब्रँडवर व्हिगन प्रमाणपत्र असूनही अंडी विकल्याबद्दल टीका केली.