Pakistan Madrassa Attack : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास बॉम्बस्फोटाचे हादरे बसले. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील जिहाद विद्यापीठात नमाज पठणाच्या वेळी कट्टरतावाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या घटनेत मदरसा प्रमुख हमीद उल हक याच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हमीद उल हक हा तालिबानशी संबंधित होता. अफगाणिस्तान, अमेरिका आणि नाटोच्या सैन्याविरुद्ध बंडखोरांचे नेतृत्व करणारा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरनेही याच मदरशामधून प्रशिक्षण घेतले होते. दरम्यान, या मदरशाचे नाव ‘जिहाद विद्यापीठ’ असे का पडले, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९४७ मध्ये मदरशाची स्थापना

दारुल उलूम हक्कानिया हा मदरसा पेशावरच्या उत्तरेकडील शहरापासून सुमारे ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोरा खट्टक येथे आहे. जवळपास चार हजारांहून अधिक विद्यार्थी या मदरशामध्ये मोफत शिक्षण घेतात. त्यांच्या जेवणाची, तसेच राहण्याची मदरशामध्येच सोय करण्यात आली आहे. १९४७ मध्ये शेख अब्दुल हक याने या मदरशाची स्थापना केली होती. त्याने आपले सुरुवातीचे शिक्षण भारतातील दारुल उलूम देवबंद मदशातून घेतले होते. देशात अनेक मदरसे चालवणारी ही सर्वांत मोठी इस्लामिक संस्था आहे.

आणखी वाचा : Chandra Shekhar Azad : ब्रिटिशांना जेरीस आणणाऱ्या उमद्या क्रांतिकाराची गोष्ट

देवबंद विचारसरणीचे धार्मिक शैक्षणिक केंद्र

१८६६ मध्ये भारतातील दारुल उलूम हक्कानिया या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. नंतर ही संस्था सुन्नी इस्लाममधील पुनरुत्थानवादी चळवळीचे एक केंद्र झाली, ज्याचा उद्देश इस्लामच्या मूळ सिद्धांतांकडे जाणे हा आहे. भारताच्या फाळणीनंतर देवबंद चळवळीचे अनुयायी दक्षिण आशियामध्ये पसरले. त्यांनी इस्लाम धर्माचे कठोर शिक्षण देणाऱ्या मदरशांची स्थापना केली. अब्दुल हक याने हे मदरसे विशेषतः पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेनजीक उभारले. अत्यंत कमी कालावधीत दारुल उलूम संस्थेला या प्रदेशात लोकप्रियता मिळाली. देवबंद विचारसरणीचे एक महत्त्वाचे धार्मिक शैक्षणिक केंद्र म्हणून संस्थेची ओळख निर्माण झाली.

धर्माच्या रक्षणासाठी जिहादचा फतवा

१९८० च्या दशकापर्यंत दारुल उलूम हक्कानिया संस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडले. ‘टीआरटी वर्ल्ड’च्या वृत्तानुसार, अब्दुल हकच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा समी उल हक याने १९८८ मध्ये मदरशाचा ताबा घेतला. त्याने मुस्लीम तरुणांना एकत्रित करून धर्माचे रक्षण करण्यासाठी जिहादचा फतवा काढला, ज्यामुळे संस्थेचे कार्य आणि स्वरूप पूर्णपणे बदलून गेले. समी उल हक या संस्थेचा वापर तालिबान नेत्यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून सुरू केला, त्यांना अफगाणिस्तानात सोविएत युनियनविरोधात लढण्यास प्रेरित केले.

अफगाणिस्तानमधील सोविएत आक्रमणाला विरोध

“समी उल हक याने व्यक्तिगत संघर्षाची संकल्पना अनेकांच्या डोक्यातून काढून टाकली. त्याने संस्थेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष अफगाणिस्तानमधील सोविएतांविरोधात लढण्यावर केंद्रित केले, असे GEO न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी झरघून शाह यांनी टीआरटी वर्ल्डला सांगितले. विशेष बाब म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अफगाणिस्तानमधील सोविएत आक्रमणाला विरोध करणाऱ्या बंडखोरांची भरती आणि पालन-पोषण करण्यासाठी या संस्थेचा वापर केला.

मुल्ला उमर आणि जलालुद्दीन हक्कानीचे प्रशिक्षण

दारुल उलूम हक्कानियाच्या सर्वांत माजी विद्यार्थ्यांमध्ये तालिबानचे संस्थापक मुल्ला उमर व जलालुद्दीन हक्कानी यांचा समावेश होता, ज्यांनी अमेरिकन लोकांना ओलीस ठेवण्यासाठी तालिबानची लष्करी शाखा हक्कानी नेटवर्कची स्थापना केली. जटिल आत्मघाती हल्ले करणे आणि लक्ष्यित हत्या करणे हे या शाखेचे मुख्य उद्देश होते. अल-कायदाच्या दक्षिण आशिया शाखेचे नेतृत्व करणाऱ्या असीम उमर यानेही याच मदरशामधून प्रशिक्षण घेतले आहे.

‘जिहाद विद्यापीठ’ असे नाव का पडले?

काही दशकांपासून पाकिस्तानी मदरशांनी अतिरेकीवादाचे केंद्र म्हणून काम केले आहे. या मदरशांमध्ये कट्टरपंथी ज्वलंत भाषणे करून हजारो निर्वासितांना प्रशिक्षण दिल जाते. कट्टरपंथी आणि अतिरेकी विचारसरणीमुळे, तसेच त्यातून निर्माण झालेल्या तालिबानी लढवय्यांच्या संख्येमुळे पाकिस्तानातील दारुल उलूम हक्कानिया या मदरशाला ‘जिहाद विद्यापीठ’ असे नाव पडले आहे.

हेही वाचा : Amir Khusrau : कव्वालीचे जनक म्हणून अमीर खुसरो यांना कशी मिळाली ओळख?

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, “सोविएत युनियन अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर मदरशाने १९९० च्या मध्यात काबूल ताब्यात घेतलेल्या तालिबानी नेत्यांशी आपले संबंध कायम ठेवले. २००१ मध्ये अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानमधील तालिबानची सत्ता उलथवून टाकली, तेव्हा दारुल उलूम हक्कानिया मदरशाने अनेक बंडखोरांना जन्म दिला. या बंडखोरांनी अमेरिकेच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या सरकारविरोधात लढा सुरू केला”, असे अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ल्यांत वाढ

दरम्यान, अतिरेकी कारवायांमुळे समी उल हक याला तालिबानचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१८ मध्ये त्याच्या हत्येनंतर त्याचा मुलगा हमीद उल हक याने मदरशाची संपूर्ण जबाबदारी घेतली. शुक्रवारी कट्टरतावाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात त्याचाही मृत्यू झाला. इस्लामाबाद येथील संशोधन गट ‘सेंटर फॉर रिसर्च अँड सिक्युरिटीच्या मते, गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक आत्मघातकी हल्ले झाले, ज्यामध्ये १६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानच्या भूमीवर आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांना मुळापासून उखडण्यात काबूलचे राज्यकर्ते अपयशी ठरले, असा आरोप इस्लामाबादने केला आहे. या आरोपांचे तालिबान सरकारने खंडन केले आहे