गेल्या काही दिवसांमध्ये देशातील करोना रुग्णांची संख्या, तसेच करोनामुळे होणाऱ्या मृतांचे आकडे देखील कमी होऊ लागले आहेत. दिवसाला ४ लाखांपर्यंत गेलेले नव्या करोनाबाधितांचे आकडे आता २ लाखांच्या खाली आले आहेत. तसेच, मृतांचा आकडा देखील अडीच हजारांपर्यंत आला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना देशातील अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर लागू केलेले लॉकडाउनचे निर्बंध वेगवेगळ्या पद्धतीने कमी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये महाराष्ट्रानं ५ गटांमध्ये जिल्हे आणि पालिकांची विभागणी केली आहे. मात्र, इतर राज्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? तिथे लॉकाउन किंवा अनलॉक लावण्यासाठी कोणते नियम करण्यात आले आहेत? जाणून घेऊया!

देशात काही राज्यांनी लॉकडाउनचे निर्बंध कमी केले असले, तरी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा अशा काही राज्यांनी लॉकडाउनचे निर्बंध कायम ठेवण्याचा देखील निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर करोनाची परिस्थिती पाहून हे निर्णय घेण्यात आले आहेत.

दिल्लीत सोमवारपासून अनलॉक सुरू!

देशाची राजधानी दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वीपर्यंत ऑक्सिजन तुटवडा आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या यामुळे भीषण चित्र निर्माण झालं होतं. हे प्रकरण न्यायालयापर्यंत देखील गेलं होतं. मात्र, आता दिल्लीमधील परिस्थिती बदलत असून येत्या सोमवारपासून म्हणजेच ७ जूनपासून दिल्ली सरकारनं अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मॉल, बाजारपेठा आणि कॉम्प्लेक्समधील दुकानं सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत खुली राहू शकणार आहेत. यासाठी सम-विषम पद्धतीचा अवलंब केला जाईल. संबंधित मार्केट असोसिएशनकडून दुकानांना देण्यात आलेल्या तारखांनुसार ही दुकानं खुली राहतील. तसेच, दिल्ली मेट्रो आणि प्रवासी बस सेवा देखील ५० टक्के क्षमतेनं सुरू राहील. हॉटेल्समध्ये बसून जेवण्यास बंदी असेल, मात्र होम डिलिव्हरी आणि टेक अवे सेवा सुरू राहील.

राजधानी दिल्लीत सर्व खासगी कार्यालयांना ५० टक्के कर्मचारी क्षमतेनं काम करण्याची मुभा असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत ही कार्यालये सुरू राहतील.

करोना लाटेला ओहोटी… तब्बल दोन महिन्यानंतर सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

महाराष्ट्रात अनलॉकचे ५ टप्पे!

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांसाठी वेगवेगळे नियम असतील. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असणारे जिल्हे किंवा महानगर पालिका पहिल्या टप्प्यात असतील. या टप्प्यासाठी लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट असेल. पुढे अशाच प्रकारे पाचव्या टप्प्यापर्यंत हे निर्बंध कठोर होत जातील. सध्याच्या घडीला राज्यात एकही जिल्हा किंवा महानगर पालिका पाचव्या टप्प्यात नाही. पाचवा टप्पा हा रेड झोन मानला जाईल.

गुजरातमध्ये कार्यालयांवरचे निर्बंध हटवले!

महाराष्ट्राचं शेजारी राज्य असणाऱ्या गुजरातमध्ये देखील अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ४ जूनपासूनच नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यानुसार, सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या कालावधीमध्ये दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच, हॉटेलमधून रात्री १० वाजेपर्यंत होम डिलिव्हरीची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय, ७ जूनपासून गुजरातमधील सर्व कार्यालयांना नियमित वेळेनुसार काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा निकष!

गंगाकिनारी सापडलेल्या शेकडो मृतदेहांमुळे उत्तर प्रदेशमधील करोनाची परिस्थिती आणि ती हाताळण्याची उत्तर प्रदेशमधील योगी सरकारची पद्धती यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. त्या उत्तर प्रदेशमधील करोनाची आकडेवारी कमी होत असताना सरकारने निर्बंध उठवायला सुरुवात केली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये ६०० हून कमी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असतील, अशा जिव्ह्यांसाठी निर्बंधांमधून सूट जाहीर करण्यात आली आहे. मात्र, नाईट कर्फ्यू आणि शनिवार-रविवारी लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. बुलंदशहर आणि बरेली जिल्ह्यातील निर्बंध मोठ्या प्रमाणावर उठवण्यात आले आहेत. इथे कंटेनमेंट झोन वगळता सोमवार ते शुक्रवार बाजारपेठा आणि दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना २५ जणांची मर्यादा ठेवण्यात आली असून अंत्यसंस्कारांसाठी २० व्यक्तींची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

समजून घ्या : Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?

तामिळनाडूत १४ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवला

तामिळनाडूमध्ये लॉकडाउन १४ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, असं करताना रुग्णसंख्या कमी असणाऱ्या एकूण २७ जिल्ह्यांमधील निर्बंध कमी करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कमी करण्यात आले आहेत, तिथे भाजीपाला, फळ आणि मांसविक्रीसाठी सकाळी ६ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. त्याशिवाय, सरकारी कार्यालयांना ३० टक्के कर्मचाऱ्यांचं बंधन घालण्यात आलं आहे.

बिहारमध्ये ८ जूनपर्यंत लॉकडाउनचे निर्बंध

३१ मे रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संपूर्ण बिहारमधील निर्बंध काही प्रमाणात लवकरच हटवण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, ८ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात लॉकडाउन कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे. कमी केलेल्या निर्बंधांनुसार, अत्यावश्यक वस्तू पुरवणाऱ्या दुकानांना सकाळी ६ ते दुपारी २ पर्यंत मुभा देण्यात येईल.

Mumbai Unlock : महापालिकेकडून ‘ब्रेक द चेन’ मिशन अंतर्गत नियमावली जाहीर

पश्चिम बंगालमध्ये रेस्टॉरंट्सला ३ तास परवानगी

नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या पश्चिम बंगालमध्ये करोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली होती. त्यामुळे प्रचार संपताच लॉकडाउन लागू करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होत असताना या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार, रेस्टॉरंट्स दररोज संध्याकाळी ५ ते ८ अशी ३ तास सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, यासाठी रेस्टॉरंटच्या सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असायला हवं. यासोबतच १५ जूनपासून शॉपिंग मॉल २५ टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राजस्थानमध्ये १० टक्के पॉझिटिव्हिटीची अट

राजस्थानमध्ये पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय बाबींचा वापर या आधारावर निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. जिथे पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजनसारख्या उपचारांच्या दृष्टीने अतीमहत्त्वाच्या बाबींचा वापर ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी काही बाबतीत सूट देण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी दुपारपासून मंगळवारी पहाटे ५ वाजेपर्यंतचा लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. जोपर्यंत राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजारांच्या खाली येत नाही, तोपर्यंत हे निर्बंध लागू असतील. खासगी कार्यालयांना दुपारी २ वाजेपर्यंत २५ टक्के क्षमतेने काम करण्याची मुभा असेल. आंतरजिल्हा प्रवास पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच करता येईल. सामाजिक कार्यक्रम किंवा क्रीडाविषयक गोष्टींना बंदी असेल.

Story img Loader