Evolution of Adolescence: दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे… हे गाणं किशोरावस्थेचं उत्तम उदाहरण आहे. किशोरावस्था किंवा पौगंडावस्था मानवी जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे. कथा, कादंबऱ्यांतून या वयाचे लालित्यपूर्ण वर्णन करण्यात येते. तर या वयात येणाऱ्या समस्या किंवा प्रश्न यांची चर्चा होताना दिसते. परंतु मानवी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत हा टप्पा कधी गाठला गेला आणि त्या अवस्थेकडे कसे पाहिले गेले ह्याचा नवीन संशोधनाच्या माध्यमातून घेतलेला हा आढावा.
अश्मयुगीन मुलांनी किशोरावस्थेत कधी प्रवेश केला?
मानवी इतिहास हा वेगवेगळ्या कालखंडात विभागला गेला आहे. हिमयुग मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड आहे. याच कालखंडाशी संबंधित मुलांचे सांगाडे संशोधकांना सापडले आहेत. १०,००० ते ३०,००० वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या या किशोरवयीन मुलांच्या सांगाड्याच्या विश्लेषणातून अभ्यासकांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. या कालखंडातही किशोरावस्था प्राप्त होण्याचे वय आजच्या मुलांप्रमाणेच होते. असे असले तरी काही मुलांना कुमारावस्था उशिराने प्राप्त झाली आहे. हे कदाचित तत्कालीन भटक्या धोकादायक जीवनशैलीमुळे घडले असावे असे मत संशोधक व्यक्त करतात.
इटली, रशिया आणि झेकिया (झेक प्रजासत्ताक) येथील सात पुरातत्त्वीय स्थळांवरून सापडलेल्या १३ किशोरवयीन व्यक्तींच्या सांगाड्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केला. १२ सप्टेंबर २०२४ रोजी ‘जर्नल ऑफ ह्युमन इव्होल्यूशन मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात या संशोधनाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. संशोधकांनी मॅच्युरेशन मार्कर्स वापरून या कालखंडातील अश्मयुगीन मुलांच्या विविध किशोरवयीन टप्प्यांचे अंदाज वर्तवले आहेत. जन्म झाल्यावर बाल्यावस्थेत शरीरात प्रौढांपेक्षा सुमारे दुपटीने अधिक हाडे असतात. या हाडांची हळूहळू वाढ होते आणि १८ ते २५ या वयोगटात ती एकत्र जुळून येतात. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रज्ञ हाडांचा वापर करून किशोरवयीन अवस्थेच्या विविध टप्प्यांची ओळख पटवू शकले. यामध्ये किशोरवयीन वाढीचा मोठा टप्पा, मासिक पाळीची सुरुवात (जेव्हा हाडे जुळायला सुरुवात होते) तसेच लैंगिक प्रौढत्व गाठण्याचा आणि सर्व हाडे पूर्णपणे जुळण्याचा कालावधी यांचा समावेश आहे.
आनुवंशिक आराखडा
हिमयुगातील १३ व्यक्तींपैकी ११ जणांनी किशोरावस्थेचा टप्पा गाठला होता हे संशोधक निश्चित करू शकले. त्यांनी शोधले की, या प्राचीन किशोरवयीन मुलांमध्ये वाढीचा मोठा टप्पा १३ ते १६ वर्षे या वयोगटात आला. जो अन्नासाठी भटकंती करणाऱ्या समूहांमध्ये १२.५ ते १४ वर्षे या वयोगटाशी साधर्म्य दाखवतो. हिमयुगीन किशोरवयीन मुलांनी प्रौढत्व १६ ते २१ वयोगटात गाठले. प्राचीन काळातील काही किशोरवयीन मुलांनी पाश्चात्त्य समाजातील किशोरवयीन मुलांच्या तुलनेत प्रौढत्व साधारणतः १६ ते १८ वर्षांदरम्यान गाठले. या शोधनिबंधाच्या प्रमुख लेखिका आणि युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग येथील बायोआर्किओलॉजिस्ट मेरी लुईस यांनी ‘लाइव्ह सायन्सला ईमेलद्वारे सांगितले की, प्राचीन होमो सेपियन्सदेखील आपण ज्या किशोरवयीन वाढीच्या टप्प्यांमधून जातो त्याच टप्प्यांतून गेले असतील हे फारसे आश्चर्यकारक नाही. परंतु, त्यांनी किशोरवयात प्रवेश साधारणतः १३.५ वर्षे वयाच्या आसपास केला, हे आश्चर्यकारक आहे. यावरून असे लक्षात येते की, मानवी लैंगिक परिपक्वतेच्या प्रारंभासाठी हे वय ‘आनुवंशिक आराखडा’ (genetic blueprint) म्हणून ठरलेले असावे.
मासिक पाळीचे वय
परंतु, हिमयुगातील किशोरवयीन आणि आधुनिक किशोरवयीन यांच्यातील एक मोठा फरक मासिक पाळीच्या सुरुवातीच्या (menarche) वयाच्या अंदाजात दिसून येतो. संशोधकांना मिळालेल्या सांगाड्यात मुलींची संख्या कमी आहे. या कालखंडातील फक्त पाच सांगाडे मुलींचे आहेत. त्यावरून निष्कर्ष काढण्यात आला की, मासिक पाळीची सुरुवात वयाच्या १६ ते १७ वर्षात झालेली नसावी. आधुनिक अमेरिकेतील लोकसंख्येमध्ये मासिक पाळीची सरासरी सुरुवात वयाच्या ११.९ वर्षी होते. मात्र, शिकार करणाऱ्या समूहांमध्ये हा टप्पा उशिरा गाठला जातो. जो साधारणतः १३ ते १७ वर्षे असा असतो. “आजकाल मुलं वयात लवकर येतात असा एक सामान्य गैरसमज आहे,” असे ब्रिटिश कोलंबियामधील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिक्टोरियामधील पॅलिओलिथिक पुरातत्त्वशास्त्रज्ञ एप्रिल नोवेल यांनी लाइव्ह सायन्सला सांगितले. “पण आपल्याला असे दिसते की आजच्या किशोरवयीन मुलांमध्ये हा दिसणारा बदल गेल्या हजारो वर्षांपासून होत आहे,” त्यांच्या हिमयुगीन नातेवाईकांप्रमाणे आधुनिक मुलांनीही त्याच वयात किशोरावस्था प्राप्त केली आहे. आपल्या पूर्वजांच्या अभ्यासातून आपल्याला आजच्या काळातील किशोरवय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
अधिक वाचा: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?
Achondroplastic dwarfism
पुरातत्त्वशास्त्रज्ञांसाठी प्राचीन काळातील किशोरवयीन आणि किशोरवयाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कारण यामुळे या प्रक्रियेतील वैयक्तिक विविधता समजून घेता येते आणि भूतकाळातील समाजात किशोरवयाला असलेले सांस्कृतिक महत्त्व देखील स्पष्ट होते, असे नोवेल म्हणाल्या. उदा., किशोरवयीन मुलांशी त्यांच्या समुदायांनी वेगळ्या प्रकारे वागणूक ठेवली होती का हे समजून घेण्यास याचा उपयोग होतो. इटलीमधील रोमिटो या स्थळावर सापडलेल्या एका व्यक्तीचे प्रकरण हे Achondroplastic dwarfism चे आतापर्यंतचे सर्वात प्राचीन ज्ञात उदाहरण आहे. संशोधकांना असे आढळून आले की, ही व्यक्ती साधारणतः १६ वर्षांची किशोरवयात असतानाच मृत्यू पावली होती. मात्र, तिचा विकास त्या कालखंडातील इतर मुलांच्या तुलनेत काहीसा मागे होता. तिची उंची सुमारे ३.३ ते ४.२५ फूट (१ ते १.३ मीटर) होती आणि किशोरावस्था प्राप्त न झाल्यामुळे तिच्या समुदायाने तिला बालक म्हणून लेखले असावे. त्यामुळेच त्या व्यक्तीला एका वृद्ध स्त्रीच्या बाहुपाशात दफन केले गेले असावे, असे मत अभ्यासकांनी आपल्या लेखात नमूद केले आहे.