हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “जोपर्यंत विवाह योग्य विधींसह आणि योग्य स्वरूपात केला जात नाही तोपर्यंत कायद्याच्या कलम ७(१) नुसार त्याला मान्यता दिली जाऊ शकत नाही”. कलम ७ मधील उप-कलम (२) असे सांगते की, या संस्कारामध्ये सप्तपदी समाविष्ट आहे. वर आणि वधूने एकत्रित सप्तपदी चालल्यानंतर विवाह संपूर्ण होतो. त्यामुळे विवाहासाठी सप्तपदी बंधनकारक आहे. एकूणच सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाहाला संस्कार म्हटले आहे आणि सप्तपदीला बंधनकारक ठरवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंदू धर्मातील संस्काराची नेमकी व्याख्या काय? आणि विवाह संस्कार हा का महत्त्वाचा मानला गेला हे जाणून घेणे समयोचित ठरावे.
विश्लेषण: जहांगीर हे नाव आलं कुठून? त्या मागचा इतिहास काय सांगतो?
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नक्की काय म्हटले आहे?
हिंदू विवाह हा एक ‘संस्कार’आहे आणि हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या अंतर्गत योग्य विधी केल्याशिवाय विवाहाला मान्यता दिली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विवाह संस्था ही भारतीय समाजाची मूल्ये जपणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. त्यामुळे त्या व्यवस्थेला योग्य तो दर्जा देणे आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने १९ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशात अधोरेखित केले. सर्वोच्च न्यायालयाने आठवण करून दिली की “(हिंदू) विवाह हा ‘गायन’, ‘नृत्य’, ‘वाइनिंग आणि डायनिंग’ किंवा अवाजवी दबाव आणून हुंडा किंवा भेटवस्तूंची मागणी आणि देवाणघेवाण करण्याचा प्रसंग नाही. किंवा व्यवहारही नाही. विवाह हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे. विवाहानंतर दोन व्यक्ती कायमस्वरूपी एकत्र येतात. हिंदू विवाह हा मोक्षाचा मार्ग मानला जातो.
Adolf Hitler: नरेंद्र मोदी सरकारने मान्य केलेल्या ‘आर्यां’चे हिटलरलाही आकर्षण होते, नेमकं कारण काय?
संस्कार म्हणजे काय?
संस्कार हा शब्द ‘सम’ हा उपसर्ग आणि कृ हा धातू यांच्यापासून तयार झालेला आहे. मराठी विश्वकोशात म्हटल्याप्रमाणे ‘सम् +कृ’ चा व्युत्पत्त्यर्थ ‘चांगले रूप देणे’, ‘शुद्ध करणे’, ‘सुंदर करणे’, ‘पवित्र करणे’ असा बहुविध आहे. जैमिनीय सूत्रांत यज्ञात करावयाची शुद्धीकरणाची एक क्रिया म्हणून संस्कार ही संज्ञा आली आहे. संस्कार म्हणजे ज्या क्रियेनंतर एखादी वस्तू किंवा व्यक्ती एखाद्या विशिष्ट कार्यास उपयुक्त ठरते अशी व्याख्या शबराचार्यानी दिली आहे (धर्मशास्त्राचा इतिहास- पा. वा. काणे). संस्काराच्या योगाने नवीन गुण उत्पन्न होतात आणि तपाच्या योगाने असलेले दोष नाहीसे होतात असे तंत्रवार्तिकात म्हटले आहे. मनुष्याच्या अभ्युदयासाठी सुप्त गुणांच्या विकासासाठी संस्कारांची आवश्यकता असते.
जन्म ते मृत्यू संस्कारांची साखळी
हिंदू धर्मात मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक संस्कारांचा समावेश होतो. संस्कारांची संख्या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळी सांगितलेली आहे. थोडक्यात ज्या क्रियेच्या योगाने मनुष्याच्या ठिकाणी सद्गुणांचे विकसन आणि संवर्धन होते, त्या क्रियेला संस्कार असे म्हणतात. अशी व्याख्या पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी संस्कृती कोशात दिली आहे. जीवनात संस्कारांना फार महत्त्व आहे. ते माणसाच्या शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतराचे द्योतक ठरतात. संस्कारामुळे माणसाला योग्य तो सामाजिक दर्जा प्राप्त होतो. संस्कारात अनेक प्रारंभिक विचार, धार्मिक क्रियाकलाप, त्यांच्या बरोबरीने येणारे काही नियम व आचरण पद्धती यांचा समावेश आहे. या सर्वांचा उद्देश केवळ औपचारिक देह संस्कार इतकाच नाही. तर संस्कारार्ह व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा परिष्कर, शुद्धी आणि पूर्तता एवढा आहे.
संस्कार हा गृह्यसूत्रांचा विषय
वैदिक साहित्यात संस्कार हा शब्द आढळत नाही. ब्राह्मण ग्रंथांमध्येही तो शब्द नाही. परंतु त्यात विवाह, उपनयन यांसारख्या काही संस्कारांचे वर्णन केल्याचे आढळते. संस्कार कल्पनेचा विस्तार आणि त्यांची संख्या याविषयी गृह्यसूत्रात बरीच चर्चा करण्यात आली आहे. संस्कार हा गृह्यसूत्रांचा खास विषय आहे. गृह्यसूत्रांमध्ये विवाहापासून प्रारंभ करून समावर्तनापर्यंतच्या संस्कारांचे निरूपण केलेले आहे. गृह्यसूत्रांमध्ये अंत्येष्टीचा संस्कारांमध्ये समावेश नाही. गौतम धर्मसूत्र हे सर्वात प्राचीन असून त्यात ४८ संस्कार सांगितलेले आहेत. कालांतराने हे संस्कार कमी कमी होत शेवटी त्यांची संख्या १६ वर आली.
प्रमुख १६ संस्कार
प्रमुख १६ संस्कारांमध्ये गर्भाधान, पुंसवन, सीमंतोन्नयन, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन, चूडाकर्म, कर्णवेध, उपनयन, वेदारंभ, केशांत, समावर्तन, विवाह, विवाहाग्नीचा स्वीकार आणि अग्निहोत्र या प्रमुख संस्कारांचा समावेश होतो. (धर्मशास्त्राच्या विविध ग्रंथ आणि आवृत्त्यांमध्ये १६ संस्कारांमध्ये काही बदलही आढळतो, मात्र १६ ही संख्या सर्वत्र कायम आहे. ) पुंसवन आणि सीमंतोन्नयन हे गर्भिणीचे संस्कार आहेत. प्रथम गर्भधारणेच्या वेळीच करावयाचे असतात. प्राचीन काळी मुलांप्रमाणे मुलींचेही संस्कार होत असतं. परंतु कालांतराने मुलींचे संस्कार मागे पडत गेले. पत्नी या नात्याचा विवाहसंस्कार इतकाच चालू राहिला. मुलांच्या समंत्रक संस्कारापैकी उपनयन चालू आहेत. नामकरण, निष्क्रमण, अन्नप्राशन हे संस्कार होतात पण ते लौकिक स्वरूपाचे असतात (संस्कृतीकोश: महादेवशास्त्री जोशी).
विवाह संस्कार
हिंदू १६ संस्कारांमध्ये विवाह हा संस्कार महत्त्वाचा मानला गेला आहे. या संस्कारात विवाह इच्छूक पुरुष आणि स्त्री ब्राहमण, इष्टमित्र आणि अग्नीच्या साक्षीने पती- पत्नी म्हणून संबंध प्रस्थापित करतात. त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. पाणिग्रहण, उपमय असे प्रतिशब्द देखील विवाहासाठी वापरले जातात. पाणिग्रहण म्हणजे वराने वधूचा पत्नी होण्यासाठी हात धरणे. उपमय म्हणजे वधूच्या जवळ जाणे किंवा तिचा स्वीकार करणे. परिणय म्हणजे वधूला हाती धरून अग्नीभोवती प्रदक्षिणा घालणे. विवाह किंवा उद्वाह म्हणजे वधूच्या पित्याच्या घरून आपल्या घरी नेणे. मानवी समाजातील सर्व संस्थांमधील ही मुख्य संस्था आहे. सोळा संस्कारांमध्ये विवाह ही संस्था केंद्रस्थानी आहे.
स्त्री- पुरूष संबंध नियमन
विवाहामुळे स्त्री व पुरुष या दोघांमधील संबंधांचे नियमन होते. त्याचप्रमाणे होणाऱ्या अपत्यांचा सामाजिक संबंधही ठरतो. कुटुंबसंस्था ही विवाह संस्थेवर अवलंबून असते. म्हणूनच विवाहसंस्कारांवर सामाजिक नीतिचा प्रभाव पडला आहे. विवाह संस्कारासाठी जेवढ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, तेवढ्या अन्य कोणत्याही संस्कारात घ्याव्या लागत नाहीत. किंबहुना विवाह संस्कारात जे मंत्र उच्चारले जातात, तेही पावित्र्य निदर्शकच आहेत. हिंदू धर्मात धर्म, अर्थ, काम, मोक्ष चार पुरुषार्थ महत्त्वाचे मानले जातात. त्यांच्या पूर्ततेच्या कार्यात विवाह या संस्काराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.