rare rainfall hit Sahara Desert जगातील सर्वात शुष्क सहारा वाळवंटात ऐन उन्हाळ्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दशकांनंतर पूर, पाण्याची तळी साचलेली पहायला मिळाली. त्याविषयी….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सहारा वाळवंटात नेमका किती पाऊस?

सहारा हे जगातील सर्वात मोठे आणि कमी उंचीवरील उष्ण वाळवंट आहे. उत्तर आफ्रिका प्रदेशाचा जवळजवळ सर्व भाग सहाराने व्यापला आहे. सहाराचे एकूण क्षेत्रफळ ९० लाख वर्ग किमी इतके आहे. मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत सहा महिने तिथे उन्हाळा असतो. जगातील सर्वाधिक म्हणजे ५८ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद सप्टेंबर १९२२ मध्ये सहाराअंतर्गतच लिबियातील अल् अझीझीया येथे झाली आहे. यंदा मोरोक्कोतील वाळवंटात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस झाला. पाम वृक्ष आणि वाळूच्या ढिगाऱ्यातून निळ्याशार पाण्याचे लोट वाहताना दिसले. अनेक वर्षांनंतर वाळवंटात पाण्याची तळी साचलेली दिसली. सप्टेंबर महिन्यात केवळ दोनच दिवस पडलेल्या पावसामुळे मोरोक्कोची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. ती २५० मिमी इतकी असते. पण यंदा मोरोक्कोच्या अनेक भागांत अल्प काळात १०० मिलीमीटरहून जास्त पाऊस पडला आहे. मोरोक्कोची राजधानी रबातच्या दक्षिणेकडे ४५० किलोमीटर अंतरावरील टैगौनाइट या गावात २४ तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे मोरोक्कोत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मोरोक्कोच्या वाळवंटातून वाहात आलेल्या पाण्यामुळे अल्जीरियामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अल्जीरियाला आपत्कालीन स्थिती जाहीर करावी लागली होती.

हेही वाचा >>> स्कूलबसची सुरक्षा ऐरणीवर; थायलंडच्या दुर्देवी घटनेनंतर दक्षिण आशियात ठरतोय काळजीचा विषय

सहारामध्ये उन्हाळ्यात पाऊस का पडला?

सहारातील काही पर्वतीय प्रदेश वगळता कोठेही वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३० मिमीपेक्षा अधिक होत नाही. उत्तर सहारात बहुतेक वेळेस हिवाळ्यात पाऊस पडतो. कधीकधी ऑगस्टमध्ये वादळी पाऊस पडतो. मध्य सहाराचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ मिलीमीटर आहे. पूर्वेकडील व पश्चिमेकडील विस्तृत प्रदेशांत वर्षाला केवळ २० ते ५० मिमी पाऊस पडतो. काही प्रदेशात तर कित्येक वर्षांपासून पाऊसच पडलेला नाही. मोरोक्को सहाराच्या पश्चिम भागात आहे. मोरोक्कोच्या बहुतेक भागात गेल्या सहा वर्षांपासून दुष्काळ पडला होता. या काळात शेती सोडून लोकांनी स्थलांतर केले होते. अन्नधान्यांसह लोकांना पिण्याचे पाणीही रेशनिंग दुकानांतून पुरवावे लागले होते. या पार्श्वभूमीवर सहा वर्षांनंतर सात आणि आठ सप्टेंबर रोजी आलेल्या एका वादळामुळे सहारा वाळवंटाच्या वायव्य भागात मुसळधार पाऊस झाला.

अतिवृष्टीमुळे सहारातील हवामान बदलणार?

‘नासा’च्या उपगृहांनी टिपलेल्या छायाचित्रांतून, गेली ५० वर्षे कोरडे पडलेले प्रसिद्ध इरिकी सरोवर पाण्याने भरलेले आढळून आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याची उपलब्धता वाढली आहे. हवेत आर्द्रता वाढली आहे. तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडण्याच्या घटना वाढल्यास हवामानात मोठा बदल होऊ शकतो. भविष्यात वादळांची संख्या वाढून पर्जन्यवृष्टीत आणखी वाढ होऊ शकेल, असा अंदाजही मोरोक्कोच्या हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे सहाराच्या एकूण वातावरणातच मोठा बदल घडून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा >>> पुतिन घेणार इराणच्या राष्ट्राध्यक्षांची भेट; पश्चिम आशियातील युद्धात रशिया इराणची बाजू का घेतोय? ही मोठ्या युद्धाची तयारी आहे का?

अतिवृष्टीचा सहारावर कोणता परिणाम?

पहिल्यांदा निसर्गाचा प्रकोप म्हणून या पावसाकडे पाहिले गेले. पण, आता निसर्गाची कृपा म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. पावसामुळे काही भागांच वाळवंट हिरवेगार झाले आहे. मनुष्य आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. पाम झाडांची वाढ वेगाने होऊ लागली आहे. शेतीसाठी किंवा सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे. वाळवंट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची पावले तलाव, हिरवळीकडे वळत आहेत.

सहारा वाळवंट पुन्हा हिरवेगार होणार?

‘नासा’ने समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या फोटोमधून दिसते, की सहारा वाळवंटातील मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबियाच्या वाळवंटात हिरवळ वाढली आहे. अनेक ठिकाणी गवत, झाडे – झुडपे वाढताना दिसतआहेत. सहारा वाळवंटाचा फोटो पहिल्यांदाच हिरव्या छटा दाखवत आहे. कोलंबियाच्या क्लायमेट स्कूल आणि ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूटने सहारातील हिरवळ आशादायक असल्याचे म्हटले आहे. सहारा पाच हजार वर्षांपूर्वी  झाडे – झुडपे, वनस्पती आणि तलावांनी व्यापला होता. जेरुसलेमच्या हिब्रु विद्यापीठाच्या पृथ्वी विज्ञान संस्थेचे प्राध्यापक मोशे आर्मोन यांनी म्हटले आहे, की आजवर कोरडी पडलेली सरोवरे, तळी आता पाण्याने भरली आहेत. सहाराच्या भूमध्य रेषीय क्षेत्रात प्रचंड पाऊस झाला आहे. हा पाऊस सहाराचे हवामान बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो. सहारामध्ये उष्णकटिबंधीय हवामान निर्माण होऊ शकते. ही एका कटिबंधातून दुसऱ्या कटिबंधात जाण्याच्या प्रवासाची सुरुवात ही असू शकते.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unusual summer rain and deluge in sahara desert change the fortunes of saharan countries print exp zws