उत्तर प्रदेशमधील दहशतवादविरोधी पथकाने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे अटक केली. हा कर्मचारी रशियाची राजधानी मॉस्कोमधील भारतीय दूतावास कार्यालयात कार्यरत असून, त्याने भारतीय लष्कराशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे म्हटले जात आहे. सत्येंद्र सिवल, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याच पार्श्वभूमीवर सत्येंद्र सिवल नेमका कोण आहे? त्याच्यावर काय आरोप आहेत? त्याने पाकिस्तानला कोणकोणती माहिती दिल्याचा आरोप केला जातोय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्येंद्र सिवल कोण आहे?

सतेंद्र सिवल (२६) हा मूळचा उत्तर प्रदेशामधील हापूर जिल्ह्यातील शाहमहिउद्दीनपूर या गावातील रहिवासी आहे. तो मॉस्कोतील भारतीय दूतावासात मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून २०२१ पासून कार्यरत आहे. सिवलने भारताची काही गोपनीय कागदपत्रे मिळविण्यासाठी त्याच्या पदाचा गैरवापर केल्याचा दावा केला जातोय. २०१८ साली तो नोकरीवर रुजू झाला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ‘द प्रिंट’ला दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीलाच त्याला मॉस्को येथे पोस्टिंग मिळाली होती.

सिवल याच्यावर नेमके आरोप काय?

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेकडून भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळी प्रलोभने दिली जात होती. भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय माहितीच्या बदल्यात पैसे देण्याचे आश्वासन आयएसआयकडून दिले जात होते. आयएसआयला मिळालेल्या काही गुप्त माहितीमुळे भारताच्या अंतर्गत, तसेच बाह्य सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असे एटीएसने म्हटले आहे.

दूतावासातून गोपनीय कागदपत्रे मिळविल्याचा आरोप

आयएसआयकडून प्रलोभन दिले जात असलेल्यांमध्ये सिवल याचाही समावेश होता. तसेच भारताची गुप्त माहिती पुरविणाऱ्यांपैकी तो प्रमुख होता, असा दावा केला जातोय. त्याने मॉस्कोतील भारतीय दूतावासातून काही गोपनीय कागदपत्रे मिळवली होती, असा दावा केला जातोय. पैशांच्या लोभामुळे तो असे करण्यास प्रवृत्त झाल्याचे म्हटले जात आहे.

१० ते १२ संवेदनशील कागदपत्रे आयएसआयला पाठवली?

एनडीटीव्हीने दिलेल्या वत्तानुसार आरोपी सिवलने कथितपणे भारताचे संरक्षण मंत्रालय, भारताचे विदेश मंत्रालय आणि लष्कराची धोरणात्मक माहिती आयएसआयला दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार- सत्येंद्र सिवल याने साधारण १० ते १२ संवेदनशील कागदपत्रे आयएसआयला कथितपणे पाठवली आहेत. त्याने काही महत्त्वाच्या बैठकांचीही माहिती पुरविल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर प्रदेशच्या एटीएसने सिवलला कसे अटक केले?

आयएसआयकडून भारतीय परराष्ट्र खात्यातील काही अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे. अधिकाऱ्यांना प्रलोभन देऊन, त्यांच्याकडून गुप्त माहिती मिळवली जात आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसला मिळाली होती. एटीएसने इलेक्ट्रॉनिक आणि गुप्तचर सूत्रांच्या मदतीने या अधिकाऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. “पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना प्रलोभन दाखविण्यात येत आहे”, अशी आम्हाला माहिती मिळाली होती. भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती मिळविण्यासाठी हे केले जात होते. त्यामुळे भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,” असे उत्तर प्रदेशच्या एटीएसने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सिवल २७ जानेवारीला घरी आला

सूत्रांच्या माहितीनुसार- सिवल २७ जानेवारी रोजी आपल्या घरी आला होता. त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मेरठ फिल्ड युनिटच्या विशेष पथकाने समन्स पाठवले होते. समन्सदरम्यान सिवलला अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्याने काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. तसेच त्याने हेरगिरी केल्याचे मान्य केलेले आहे.

सिवलकडून गुन्ह्याची कबुली?

उत्तर प्रदेश एटीएसच्या एका अधिकाऱ्याने याबाबत ‘द प्रिंट’ला अधिक माहिती दिली आहे. “सिवल २०२१ सालापासून गुप्त माहिती पुरवीत होता. त्यामुळे आम्ही त्याला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. तो या गुन्ह्यात सामील असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही याबाबत त्याची सखोल चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे,” असे या अधिकाऱ्याने सांगितले. सिवलविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ अ, तसेच ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधीही अशा प्रकारची कारवाई झाली आहे का?

गेल्या सात महिन्यांतील सिवल हा भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील तिसरा अधिकारी आहे; ज्याला आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अशाच एका कर्मचाऱ्याला नोव्हेंबर २०२३ मध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. द ट्रिब्युनच्या वृत्तानुसार पाकिस्तानी गुप्तहेरांना गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. मला तो हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचे समोर आले होते. समाजमाध्यमावर त्याची एका महिलेशी ओळख झाली होती. ही महिला स्वत:ला कोलकात्याची असल्याचे सांगत होती.

कंत्राटी कर्मचाऱ्यावर अटकेची कारवाई

गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात गाझियाबाद पोलिसांनी नवीन पाल नावाच्या व्यक्तीवर अटकेची कारवाई केली होती. ही व्यक्ती भारतीय परराष्ट्र खात्यात कंत्राटी कर्मचारी होता. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. पालने जी-२० परिषदेशी निगडित गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप करण्यात आला होता. हनी ट्रॅपच्या माध्यमातून गुप्त माहिती देण्यास प्रवृत्त केल्याची कबुली स्वत: पाल याने दिली आहे. पाल ज्या महिलेच्या संपर्कात आला होता, त्या महिलेची पोलिसांनी अधिक चौकशी केली. या महिलेचा आयपी अॅड्रेस हा कराचीचा असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.